मुदत ठेव आणि वाढते व्याजदर | पुढारी

मुदत ठेव आणि वाढते व्याजदर

आरबीआयने रेपो रेटच्या दरात मे महिन्यांपासून आतापर्यंत 190 बेसिस पॉईंटने वाढ केली. परिणामी बँकेनेदेखील मुदत ठेवीच्या दरात वाढ केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून व्याज दरात वाढ होत असून हे व्याज दरवाढीचे चक्र पुढेही चालू राहील, असे वातावरण तयार झाले आहे.

नजीकच्या काळात व्याजदर हा सध्याच्या दरापेक्षा निश्चितच अधिक असेल. अशा वेळी हमखास परतावा देणार्‍या ठेवीत पैसे कधी ठेवायचे किंवा किती ठेवायचे यावरून गुंतवणूकदार संभ्रमात राहू शकतात.

भारतात ठोक महागाईचा दर सप्टेंबर महिन्यात पाच महिन्यांच्या उच्चांकी 7.4 टक्केवर पोहोचला. देशातील प्रमुख बँकांचे कडक पतधोरण आणि रुपयावर वाढता दबाव पाहता, केंद्रीय बँकेच्या पतधोरण समितीने रेपो रेटमध्ये वाढवण्याचा पर्याय निवडला.

सध्याच्या काळात बहुतांश बँकांकडून एक वर्षाच्या ठेवीवर 5.7 टक्के व्याजदर दिले जात आहे. त्याचवेळी 364 दिवसांच्या सरकारी सिक्युरिटी म्हणजेच ट्रेझरी बिलावर मात्र 7.02 टक्के व्याज मिळत आहे. आगामी काळातही बँकेत पैशाचा ओघ सुरू राहावा यासाठी ठेवीवरील व्याजदरवाढीचा ट्रेंड राहू शकतो. मात्र व्याजदरवाढीच्या स्पर्धेमुळे बँकांची वैयक्तिक वाढ आणि ध्येयप्राप्तीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, मुदत ठेवीचे व्याजदर हे अजूनही सकारात्मक पातळीवर दिसून येत नाहीत. सप्टेंबर महिन्यातील ग्राहक मूल्य निर्देशांक (सीपीआय) हा 7.4 टक्के आहे. म्हणून अनेक बँकांच्या मुदत ठेवीचे व्याजदर हे अजूनही नकारात्मक पातळीवर आहेत. मुदत ठेवीवरील व्याज करपात्र असल्याने त्यातून मिळणारे उत्पन्न हे कमीच राहणारे आहे.

व्याज दरावर लक्ष ठेवा

येत्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांचे ध्येय हे दीर्घकाळासाठी चांगले व्याजदर हातात कसे पडेल, असे असायला हवे. अर्थात, बँकेकडून सध्या दीर्घकाळाच्या गुंतवणुकीवर फारसे समाधानकारक व्याज दिले जात नाही. कारण ठराविक काळापुरती बँकांकडून चांगले व्याज ऑफर होत आहे. म्हणून कमी कालावधीसाठीच्या ठेवीवर चांगले व्याज असेल, तर त्याची गुंतवणूकदारांनी संधी साधायला हवी. उदा. काही बँकांकडून 700 ते 750 दिवसांसाठी 7 टक्के व्याज दिले जात आहे. मुदत ठेवीचा विचार करणार्‍या मंडळींनी अशा प्रकारच्या विशिष्ट काळाचा विचार करायला हवा. ज्यांच्याकडे पुरेसा निधी आहे, त्यांनी सर्व पैसा एकाचवेळी मुदत ठेवीत अडकून ठेवू नये. त्यांनी टप्प्या टप्प्यात पैसे ठेवीत ठेवावे. कारण आगामी काळातही व्याजदरात आणखी वाढ होणार आहे. सद्य:स्थितीत चार-चार महिन्याला आपोआप नूतनीकरण (ऑटो रिन्यूअल) होणार्‍या मुदत ठेवीचा पर्याय निवडावा. अचानक व्याजदर वाढत असेल तर हा पर्याय थांबवावा, असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांनी उच्च व्याजदर देणार्‍या कॉर्पोरेट मुदत ठेवीचा विचार करावा, असा सल्ला दिला आहे.

सध्या स्मॉल फायनान्स बँक आणि मध्यम श्रेणीतील बँकांकडून मोठ्या बँकांच्या तुलनेत चांगले व्याजदर दिले जात आहेत. एवढेच नाही, तर सहकारी बँकांकडूनदेखील ग्राहकांना चांगले व्याजदर ऑफर केले जात आहेत.

स्मॉल फायनान्सच्या बँकांतील ठेवींना विमा कवच असते. पण, या ठेवीत एकूण गुंतवणुकीपैकी पंधरा टक्के रक्कम ठेवावी. मुदत ठेव करताना बँकेची पत जाणून घेतली पाहिजे. पाच लाखांपर्यंत ठेवींना विमा कवच असते म्हणून विमा संरक्षणाची मर्यादा असलेल्या रकमेपर्यंतच ठेवी असाव्यात, जेणेकरून कष्टाचा पैसा पुन्हा मिळण्याची हमी राहील. याशिवाय पैसे काढण्याची सुलभता आणि पेनल्टी याचेही आकलन करायला हवे.

मुदत ठेवीत चढउतार ठेवा

मुदत ठेवीच्या व्याजदराची बदलती साखळी सध्या गोंधळात टाकणारी असल्याने गुंतवणूकदारांनी ‘शिडीची रणनीती’ म्हणजेच चढउताराचे धोरण स्वीकारायला हवे. ठराविक काळानंतर पैसे ठेवण्याची भूमिका घ्यावी. यानुसार आपल्या हाती खेळते भांडवल राहील. तसेच एकाच ठेवीत पुन्हा गुंतवणूक करण्याबाबतही सजग राहावे. ठराविक अंतरानंतर ठेवी केल्यास त्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी सारखा राहत नाही. कालावधी वेगळा राहिल्यानेे व्याजदर वाढीचा लाभ मिळतो. तसेच कमी व्याजात केलेल्या गुंतवणुकीची भरपाई करता येते. या रणनीतीने व्याजदर सरासरी (अ‍ॅव्हरेजिंग) करता येते. काही पैसा बाजूला राखून ठेवावा आणि बाजारावर लक्ष ठेवायला हवे. व्याजदराशिवाय ‘कम्पाउडिंग फ्रिक्वेन्सी’चा देखील विचार करायला हवा. कमी कालावधीची फ्रिक्वेन्सी ही चांगला परतावा देण्यास मदत करते.

मुदत ठेवीला पर्याय

मुदत ठेवीशिवाय बाँडस्मधील गुंतवणुकीवरदेखील चांगला परतावा मिळत आहे. दीड हजार कोटींच्या नॅशनल हायवे इन्व्हेस्टमेंट ट्रस, नॉन कन्व्हेर्टेबल डिबेंचर्स इश्यू (एएए मानांकित) यांच्या अर्धवार्षिक योजनेवर 7.90 टक्के व्याजदर आहे (सहा महिन्यांसाठी 3.90 टक्के व्याज). याशिवाय एचडीएफसीकडून दहा वर्षांचे एएए बाँड उपलब्ध असून, त्यावर 8.07 टक्के व्याज आहे. त्याचा यिल्ड 8.02 टक्के आहे. एए आणि एए प्लस मानांकित बाँडवर गुंतवणूकदारांना 8.5 टक्के ते 10.5 टक्क्यांपर्यंत परतावा दिला जात आहे. तुम्ही तीन ते पाच वर्षांच्या काळासाठी गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर भांडवली नफादेखील मिळतो. रेटिंग असणार्‍या बाँडचा विचार करायला हवा. गुंतवणूक करताना रेटिंग चांगली असू शकते; परंतु अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यात बदल होऊ शकतो. कंपनीचा आकार, व्याप्ती आणि व्यवसाय तसेच कर्जाची पातळी याचे आकलन केल्यास कंपनीची स्थिती समजतेे. डेब्ट म्युच्युअल फंड, पीएसयू फंडदेखील गुंतवणूकदारांना 6.4 ते 7.5 टक्के व्याजदर देत आहे. याशिवाय 2027 -2032 या काळात मॅच्युअर होणार्‍या टार्गेट मॅच्युरिटी फंडाचादेखील विचार करायला हवा. यावर 7.14 ते 7.55 टक्क्याने व्याज आहे. डेब्ट म्युच्युअल फंडच्या दीर्घकालीन नफ्यावर मिळणारे ‘इंडेक्सेशन बेनिफट’ हा कर भरल्यानंतरही चांगला परतावा पदरात टाकतो.

संतोष घारे,सनदी लेखपाल

Back to top button