रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या अधिक | पुढारी

रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक कशी करावी? जाणून घ्या अधिक

मुदत ठेव, म्युच्युअल फंडस्, शेअर्समध्ये गुंतवणूक, बॉण्ड, रोखे, सोने, रिअल इस्टेट यांसारखे असंख्य गुंतवणूक पर्याय सध्या उपलब्ध असल्यामुळे गुंतवणूकदारांसाठी अनेक सुसंधी आहेत.

गुंतवणूकदारांसाठीच्या बहुतांश पर्यायांमध्ये आपण जमेल तेवढी गुंतवणूक करू शकतो. एसआयपीसारखा पर्याय यासाठी उत्तम ठरतो. पण, एसआयपीप्रमाणे दरमहा हजार-दोन हजार रुपये गुंतवून एखादी मालमत्ता खरेदी करता येऊ शकते, याची अनेकांना कल्पना नसेल किंवा जागेचे दर गगनाला भिडलेले असताना हे कसे शक्य आहे, असाही विचार मनात येईल; परंतु हजार-दोन हजार रुपये दरमहा गुंतवू इच्छित असणार्‍या एक लाख जणांनी एक संस्था स्थापन करून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करता येऊ शकते. यासाठी एका तज्ज्ञाची नेमणूक करणे आवश्यक ठरते.

प्रत्येकी 1000 रुपये या हिशेबाने एक लाख जणांचे दहा कोटी रुपये होतात. तेवढ्या पैशांमधून रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे सहज शक्य आहे. अशा संस्थांना रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (रिट) असे म्हणतात. अशा संस्था भारतामध्ये आधीपासूनच अस्तित्वात आहेत.

  •  2019 मध्ये भारतातील पहिल्या रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना झाली असली तरी अमेरिका युरोपमध्ये अशा संस्था खूप जुन्या असून, त्या लोकप्रिय आहेत. अमेरिकेमध्ये 100 पेक्षा जास्त रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट आहेत आणि ते सगळे मिळून तेथील लोकांचे जवळपास 1 लाख कोटीपेक्षा जास्त रुपये सांभाळतात.
  •  रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट ही एक अशी कंपनी आहे, जी खूप मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करते. या प्रॉपर्टी बर्‍याचदा मोठ्या मोठ्या शहरातील सर्वांत मोक्याच्या जागी असणारे मॉल्स, कमर्शिअल कॉम्प्लेक्स, बिझनेस आणि आयटी पार्क्स या प्रकारच्या असतात. त्यांची किंमत अर्थातच काही कोटींमध्ये असते. या सर्व मालमत्ता विकत घेऊन मोठ्या मोठ्या कंपनींना भाडेतत्त्वावर दिल्या जातात. त्यामुळे मिळणारे दर महिन्याचे भाडे आणि कालानुरूप वाढणारी मालमत्तेची किंमत अशा दोन प्रकारांनी गुंतवणूकदारांना परतावा मिळू शकतो. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटमध्ये एक ट्रस्ट असतो आणि त्या ट्रस्टची एक असेट मॅनेजमेंट कंपनी असते. त्या कंपनीअंतर्गत आपल्या पैशांंची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होत असते. त्याचप्रकारे रिअल इन्व्हेस्टमेंट ट्रस्टची स्थापना केली जाते. त्या ट्रस्टअंतर्गत कंपनी आपली गुंतवणूक रिअल मार्केटमध्ये गुंतवत असते. यातून मिळणारे भाडे किंवा जमिनीची वाढलेली किंमत या साहाय्याने झालेले उत्पन्न असते, ते त्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना देणे बंधनकारक असते. म्युच्युअल फंड प्रमाणेच रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टना सेबीच्या नियमावलीप्रमाणे काम करावे लागते. या कंपनीमध्ये गुंतवणूक करणार्‍यांचा पैसा कशा पद्धतीने रिअल इस्टेट प्रॉपर्टीमध्ये गुंतवला जातो, या सगळ्यांवर सेबीचे संपूर्ण लक्ष असते. या ट्रस्ट 90 टक्के तयार असलेलीच मालमत्ता विकत घेऊ शकतात. या कंपन्यांना गुंतवणूकदारांचे किती पैसे कोणकोणत्या मालमत्तेत गुंतवलेले आहेत, त्या मालमत्तांची सध्याची किंमत आणि त्यातून मिळणारे भाडे आदी सर्व माहिती वार्षिक अहवालातून द्यावी लागते.

या ट्रस्टमध्ये गुंतवणूक करण्यासाठी फक्त एक डिमॅट अकाऊंट लागते. या कंपन्यांचे शेअर्स हे शेअर बाजारात नोंदणीकृत असतात. ते आपल्याला विकत घेता येतात. या मालमत्तांमधून मिळणारे भाडेतत्त्वावरील उत्पन्न गुंतवणूकदारांना डिव्हिडंड स्वरूपात दरवर्षी द्यावे लागते. मालमत्तेची किंमत वाढत जाते, त्यानुसार या संस्थेच्या शेअरची किंमत वाढत जाते.

रुचिर थत्ते 
(लेखक एनआयएसएम प्रमाणित गुंतवणूक तज्ज्ञ आणि शेअर मार्केट गुंतवणूक कर सल्लागार आहेत.)

Back to top button