अर्थवार्ता | पुढारी

अर्थवार्ता

* गत सप्ताहात निफ्टी व सेन्सेक्समध्ये एकूण अनुक्रमे 468.55 अंक व 1573.91 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक अनुक्रमे 16220.6 अंक व 54481.84 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये व सेन्सेक्समध्ये प्रत्येकी 2.97 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गत सप्ताहात सुमारे तीन महिन्यांनंतर प्रथमच ब्रेंट क्रूड (खनिज तेल) 100 डॉलर प्रती बॅरल किमतीच्या खाली गेले. सप्ताहाअखेर ब्रेंट क्रूडचा भाव 104 डॉलरच्या जवळपास होता.

* देशातील आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर. कंपनीचा निव्वळ नफा मागील वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 5.21 टक्के वधारून 9008 कोटींवरून 9478 कोटी झाला. कंपनीचा एकूण महसूल 16.2 टक्के वधारून 52758 कोटी झाला. ऑपरेटिंग मार्जिन 2.4 टक्के घटून 23.1 टक्के झाले. स्थिर चलन महसूल वृद्धीचा (कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू ग्रोथ) विचार करता यामध्ये 15.5 टक्क्यांची वाढ झाली.

* देशात लवकरच येऊ घातलेल्या 5-जी नेटवर्कसाठी अदानी उद्योग समूहाचादेखील अर्ज लिलावाच्या अखेरच्या दिवशी सर्वांना धक्का देत अदानी उद्योग समूहाची दूरसंचार क्षेत्रात उडी. याद्वारे पुढे जाऊन अदानी उद्योगसमूह खासगी नेटवर्क उभारून ग्राहकांना व्हॉईस आणि डाटाच्या सुविधा देऊ शकतील. यापूर्वी 2010 मध्ये रिलायन्सने ‘इन्फोटेल ब्रॉडबँड’ खरेदी करून याच मार्गाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला होता.

* महिंद्रा कंपनीने विजेवर चालणार्‍या गाड्यांच्या प्रकल्पासाठी 1925 कोटी उभे केले. यासाठी ब्रिटिश इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट कंपनीशी करार. आर्थिक वर्ष 2027 पर्यंत 2 लाख इलेक्ट्रीक गाड्या विकण्याचे कंपनीचे उद्दिष्ट.

* एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेड कंपनीच्या एकत्रीकरणास रिझर्व्ह बँकेची मंजुरी. एचडीएफसी लिमिटेडचे समभागधारक एचडीएफसी बँकेत 41 टक्क्यांचे हिस्सेदार असतील. एचडीएफसी लिमिटेडच्या समभागधारकांना प्रत्येक समभागाच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे 1.68 समभाग मिळणार. विलीनीकरणपश्चात एचडीएफसी बँकेचे भांडवल बाजारमूल्य तब्बल 16.9 लाख कोटींपर्यंत पोहोचेल. यानंतर ही बँक जगातील सर्वात मोठ्या 10 बँकांपैकी एक बँक बनेल. तसेच देशातील दुसर्‍या क्रमांकाची मोठी कंपनी होईल.

* केंद्रीय आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा (ईडी)ने चीनची मोबाईल बनवणारी कंपनी ‘व्हीवो’वर छापे. ‘व्हीवो’ने 62,476 कोटी रुपये अवैधरीत्या भारताबाहेर नेले. भारतातील कर चुकवण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलल्याचा ‘व्हीवो’ कंपनीवर आरोप. कंपनीच्या भारतातील उलाढालीच्या सुमारे 50 टक्के रक्कम कर चुकवून भारताबाहेर नेल्याचे ईडीचे प्रतिपादन. ईडीने कंपनीची 119 बँकांची खाती गोठवली. त्याचप्रमाणे 73 लाखांची रोख रक्कम तसेच 2 किलो सोने ताब्यात घेतले.

* जून महिन्यात भारताची निर्यात मागील वर्षीच्या तुलनेत 16.8 टक्के वाढून 37.94 अब्ज डॉलर्स झाली तसेच आयात 51 टक्के वधारून तब्बल 63.6 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. यामुळे जून महिन्यात भारताची व्यापारतूट आजपर्यंतच्या विक्रमी पातळीवर म्हणजे 25.63 डॉलर्सपर्यंत पोहोचली. खाद्यतेलाची वाढलेली किंमत तसेच खनिज तेल 120 डॉलर प्रती बॅरलच्या पुढे गेल्याने आयात किमतीमध्ये वाढ झाली.

* वाहन विमा नियमांमध्ये ‘आयआरडीएआय’ या सरकारी नियामक संस्थेकडून बदल. यापुढे वाहनाचा एकूण वापर आणि वाहन चालकांची गुणवत्ता यांचा विचार करून विमा कंपन्यांकडून ‘ओन-डॅमेज’ वाहन विमा आकारला जाणार. यासाठी तंत्रज्ञान सुलभ विमा ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार.

* टाटा पॉवर कंपनी क्षमतावृद्धीसाठी पुढील पाच वर्षांत 75 हजार कोटी खर्च करणार. यापैकी 10 हजार कोटींची गुंतवणूक याच आर्थिक वर्षात केली जाणार. पर्यावरणपूरक ऊर्जानिमितीचा हिस्सा पुढील पाच वर्षांत एकूण क्षमतेच्या 60 टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट. याच उद्योग समूहाची दुसरी महत्त्वाची कंपनी ‘टाटा मोटर्स’चे या आर्थिक वर्षात 50 हजार विजेवर चालणार्‍या गाड्या विकण्याचे उद्दिष्ट. उद्योग समूहाचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची माहिती.

* शेअर बाजारात कंपन्यांकडून समभाग पुनर्खरेदीला (शेअर बायबँक) उधाण. 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत विविध कंपन्यांकडून 24,827 कोटींच्या समभागांची बाजारातून पुनर्खरेदी. यापैकी एकट्या टीसीएसने 18 हजार कोटींची समभाग पुनर्खरेदी केली, तर बजाज ऑटोने 2500 कोटींची समभाग पुनर्खरेदी करण्याचा निर्णय जाहीर केला. मागील वर्षी पहिल्या सहा महिन्यांत केवळ 13241 कोटींची समभाग पुनर्खरेदी झाली होती.

* परदेशी उड्डाणसेवा पुरवणार्‍या भारतीय विमान वाहतूक कंपन्यांसाठी लागणार्‍या इंधनासाठी तेल विपणन कंपन्यांना खरेदीवर उत्पादन शुल्कात 11 टक्क्यांची सवलत देण्यात आली. 1 जुलैपासून सवलत लागू मागील महिन्यांत विमानांच्या इंधनामध्ये 16 टक्क्यांची किंमतवाढ झाली होती. यावर दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे पाऊल उचलण्यात आले.

* शुक्रवारच्या सत्रात रुपया चलन डॉलरच्या तुलनेत 13 पैसे कमजोर होऊन 79.26 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंद झाले. रुपयाला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँकेने परदेशी गुंतवणूकदारांच्या भारतातील गुंतवणुकीसाठी नियम सुलभ केले होते. परंतु यामुळे रुपया चलनात निर्माण झालेली मजबुती अल्पकाळ ठरली. 1 जुलै रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परदेशी चलन गंगाजळी 5 अब्ज डॉलर्सनी घटून 588 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली.

Back to top button