वारंवार क्रेडिट कार्ड बदलताय? | पुढारी | पुढारी

वारंवार क्रेडिट कार्ड बदलताय? | पुढारी

सत्यजित दुर्वेकर

क्रेडिट कार्डचा वापर प्रचंड वाढल्याने कंपन्यांत स्पर्धा वाढली आहे. अधिकाधिक ऑफरचा मारा करून ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी सतत काहीना काही योजना क्रेडिट कार्ड कंपन्या आखत असतात. दिवसभरात क्रेडिट कार्डसाठी चार ते पाच फोन येतात. मूव्ही तिकीट, कॅशबॅक आणि अन्य आकर्षक ऑफरच्या लालसेपोटी आपण कोणताही विचार न करता क्रेडिट कार्ड घेण्यासाठी उत्साही होतो. अशा वेळी जुन्या कार्डचे काय करायचे, असा प्रश्‍न मनात घोळत राहतो. मग ते कार्ड बंद करून नव्याने कार्ड घेतले जाते. एकामागून एक कार्ड बदलण्याची सवय ही आपल्या आर्थिक तब्येतीवर परिणाम करणारी आहे. तज्ञांच्या मते, वारंवार कार्ड बदलल्याने किंवा बंद केल्याने क्रेडिट स्कोरमध्ये घसरण होते. अशावेळी गरजेनुसार आणि खर्चानुसार क्रेडिट कार्डची निवड करणे महत्त्वाचे ठरते. चांगल्या क्रेडिट स्कोरच्या बळावर आपण वाजवी दरात गृहकर्ज, मोटार कर्ज, वैयक्तिक कर्ज मिळवू शकतो. कंपन्यांच्या फसव्या आमिषाला बळी पडून कार्ड घेणे हे आपल्यासाठी हानीकारक आहे, हे लक्षात ठेवावे. 

क्रेडिट हिस्ट्रीवर परिणाम

पैसाबाजार डॉट कॉममध्ये पेमेंट प्रॉडक्टसचे प्रमुख साहिल अरोरा यांच्या मते, कमी कालावधीत कार्डसाठी सतत अर्ज करणे ही बाब नुकसानकारक ठरू शकते. प्रत्येक नवीन अर्जाच्या वेळी क्रेडिट ब्यूरो आपल्याकडून व्यवहाराची हिस्ट्री मागते. अशा वेळी क्रेडिट ब्यूरो सततच्या अर्जावर नकारात्मक प्रभाव पाडते आणि प्रत्येकवेळी पतमानाकनात घसरण करते. अशा स्थितीत आपल्याला सतत कार्ड बदलण्याच्या सवयीला आळा घालायला हवा.ऑफरनुसार कार्ड बदलण्याचे टाळावे.  

दुसर्‍या कार्डचे बिल भरणा शेवटचा पर्याय

एका कार्डमधून दुसर्‍या काडचे बिल भरले जाते. या पद्धतीतून कार्डधारकाचा फायदा होतो. कारण एका ठराविक काळापर्यंत त्यावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. या बिलाला आपण हप्त्यातही परावर्तीत करू शकतो. अर्थात इएमआयसाठी आपल्याला मूळ कार्डच्या बँकेशी संपर्क साधणे गरजेचे आहे. 

सजगतेने कार्ड वापरा

एकापेक्षा अधिक कार्ड असणे फायद्याचे आहे, मात्र त्याचा वापर सजगतेने करायला हवा. प्रत्येक कार्डवर सवलत, रिवार्ड पॉइंटस, कॅशबॅक वेगवेगळे असतात. अधिक कार्ड असल्यास खर्चाची विभागणी होते. एकापेक्षा अधिक कार्ड वापरणे देखील जोखमीचे असते. बिल भरण्याची तारीख नेहमीच लक्षात राहिल, असे नाही. जास्तीत जास्त दोन कार्ड असणे हिताचे ठरते आणि ऑटो पेचा पर्याय दिल्यास आपण संभाव्य दंडापासून वाचू शकतो. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ राखतच क्रेडिट कार्ड घ्यावे.

अधिक कार्डाने क्रेडिट स्कोरमध्ये सुधारणा

अनेक क्रेडिट कार्ड राखल्याने क्रेडिट स्कोरमध्ये देखील सुधारणा होते, असे सांगितले जाते. बँका देखील क्रेडिट लिमिटच्या 30 टक्क्यांपर्यतचा खर्च चांगला मानतात. मात्र क्रेडिट ब्यूरो अशाही कार्डधारकांना चांगला स्कोर देते. अनेक कार्डच्या मदतीने आपण अधिकाधिक रिवार्ड पॉइंट मिळवू शकता. 

Back to top button