भारतीय कंपन्यांसमोर स्पर्धा कमीच | पुढारी | पुढारी

भारतीय कंपन्यांसमोर स्पर्धा कमीच | पुढारी

डॉ. वसंत पटवर्धन

येत्या नव्या वर्षात क्रूड पेट्रोलचे जागतिक भान प्रतिबॅरल 60 डॉलर्स राहतील, असा अंदाज आहे. तांदूळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने भारताला चांगले परदेशी चलन मिळेल.

गेल्या आठवड्यात महत्त्वाच्या अशा फार घडामोडी राजकीय व आर्थिक क्षेत्रात घडल्या नाहीत. 2018-19 च्या अर्थसंकल्पात जी आर्थिक तूट धरली होती त्याच्या 1.14  पट तूट पहिल्या नऊ महिन्यातच झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ओ. एन. जी. सी., इंडियन ऑईल कार्पोरेशन, हिंदुस्थान  पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ड्रेजिंग कॉर्पोरेशन, ऑईल इंडिया अशा कंपन्यांकडून अंतरिम लाभांश घेऊन अर्थमंत्रालय यापुढील काळात तूट वाढणार नाही याची खबरदारी घेईल. 

गेल्या काही महिन्यांत तेलंगणा, मध्यप्रदेश या राज्य सरकारने शेतीवरील कर्जे माफ केल्याचे जाहीर केले पण बँकांतून अजून त्यासाठी रकमा भरल्या गेलेल्या नाहीत. अशा रकमा मार्च 31  पूर्वी जर बँकांना मिळाल्या तर त्यांचे ताळेबंद सुधारलेले दिसतील.

सरकारने नुकतीच नवीन ई-कॉम पॉलिसी जाहीर केली आहे. त्यामुळे भारतातील कंपन्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून फारशी स्पर्धा होणार नाही. बुधवारी 26 डिसेंबरला हे धोरण जाहीर केले गेले होते. व्यापार क्षेत्रात परदेशी गुंतवणुकीचा सहभाग कितपत असावा याचा त्यात विचार केला गेला आहे. अ‍ॅमेझॉनसारख्या कंपन्या त्यामुळे जीवघेणी स्पर्धा करू शकणार नाहीत. फ्लिपकार्टने याबाबत काहीच प्रतिक्रिया व्यक्‍त केलेली नाही. मात्र या क्षेत्रात आता नव्या कंपन्यांना आता आपले बस्तान बसवता येणार नाही. 

संख्या लॅबोरेटरीजने भारतीय बनावटीचा पहिला चिपसेट बाजारात आणला आहे. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. येत्या फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात शेतकर्‍यांसाठी बरीच प्रलोभने असतील. तेलंगणा राज्यानी याबाबत जी धोरणे आखली आहेत त्याचेच अनुकरण इतर राज्येव केंद्र सरकार करतील. बी बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरांची  मजुरी याबाबत सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. आर्थिक धोरणापेक्षा त्याला राजकीय डूबच जास्त असेल. नीती आयोग उत्पादन खर्च व धान्यांच्या किंमती यातील फरक भरून काढण्यासाठी अनुदान देण्याचे धोरण सांगेल. पंतप्रधानांनी नुकतीच भाजपचे अध्यक्ष अमित शहा, अर्थमंत्री अरुण जेटली आणि कृषिमंत्री राधामोहन  सिंह यांची भेट घेऊन शेतकर्‍यांच्या दुर्गतीबद्दल चर्चा केली आहे. शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनावरच राजस्थान व मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसने निवडणुका जिंकल्या आहेत. 

टाटा समूहाने आपल्या सर्व कंपन्यांची पुनर्रचना  करण्यासाठी 70 हजार कोटी रुपये गुंतवण्याचे ठरविले आहे. आपल्या कर्मचार्‍यांना नव्या वर्षाचा संदेश देताना जागतिक अर्थव्यवस्थेला जरी मोठ्या प्रमाणावर धक्के बसणार असले तरी टाटांचा समूह त्याला तोंड देईल अशी आशा व्यक्‍त केली आहे.

सुुझुकी मोटारसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या सुझुकी मोटर्स कॉर्पोरेशनच्या पोट कंपनीने 2019 चे नवीन मॉडेल जाहीर केले आहे. ‘आया बुसा’ या नावाने ते ओळखले जाईल. जगभरात हे मॉडेल आधीच प्रसिद्ध आहे.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बुधवारी  26 तारखेला सर्व बँकांच्या युनियन्सचा जो एकत्रित फोरम आहे त्यांनी संप जाहीर केला होता. सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे 1 लाख शाखा व कार्यालये त्या दिवशी बंद होती. त्यातील 10 लाख कर्मचार्‍यांनी त्यात भाग घेतला होता. बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक यांच्या एकत्रिकरणाला विरोध करण्यासाठी आणि नवीन वेतनवाढीसाठी हा संप होता. सुमारे 32 लाख चेक्सचे क्‍लिअरिंग त्यादिवशी होऊ शकले नव्हते. त्यांची रक्‍कम 23 हजार कोटी रुपये इतकी होती. बँक ग्राहकांच्या अंगवळणी आता हा वार्षिक संप पडलेला आहे. 

कच्छच्या रणातील मिठागरे लावणार्‍या शेतकर्‍यांसाठी येस बँकेने मदतीचा हात पुढे केला आहे. सौर पंपांसाठी विशेषतः ही मदत असेल. गुजरातमध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी त्यांना दिलेले 2285 कोटी रुपयांचे आश्‍वासन अपुरे आहे असे सांगितले आहे. 

येत्या नव्या वर्षात क्रूड पेट्रोलचे जागतिक भान प्रतिबॅरल 60 डॉलर्स राहतील असा अंदाज आहे. तांदूळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर होणार असल्याने भारताला चांगले परदेशी चलन मिळेल. छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर तांदूळ होतो. तिथे 1750 रु. क्‍विंटलऐवजी दर क्‍विंटलला 2500 रुपया भाव जाहीर झाला आहे. 2017 मध्ये मोठ्या प्रमाणावरील नद्यांच्या पुरामुळे बांगलादेशामधील तांदूळाचे उत्पादन घटले होते. बांगला देश जून 2019 पर्यंत 7 लाख टन तांदूळाची आयात करणार आहे. फेब्रुवारीपासून ही आयात सुरू होईल. व्हिएतनाममधूनही तांदूळ एका टनाला 385 डॉलर या भावाने आयात होणार आहे. मात्र व्हिएतनामचा तांदूळ चीनकडून फारसा आयात केला जाणार नाही.

वरील सर्व जागतिक व राष्ट्रीय घटनांचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्यामुळे त्यांचा इथे परामर्श घेतला आहे. शेअर्सबाबतचा परामर्श आता घेताना, पिरामल एंटरप्राईझेस, बजाज फायनान्स, येस बँक, जिंदाल स्टील अँड पॉवर, जिंदल स्टेनलेस (हिस्सार) यात गुंतवणूक करण्याबद्दल सतत लिहिले आहेच. 2019 हे वर्ष सार्वत्रिक निवडणुकीचे असले तरी वरील शेअर्सची वाटचाल जोमानेच होईल. निवडणुकीमुळे विशिष्ट शेअर्स वाढतील असे नसले तरी प्रचारासाठी वाहनांचा भरपूर वापर होणार असल्याने  मारुती, अशोक लेलँड, टाटा मोटर्स यांची विक्री वाढेल व शेअर्स वर जातील.

Back to top button