लक्ष्मीची पावले : पोलाद क्षेत्रात उत्साह नसला तरी… | पुढारी

लक्ष्मीची पावले : पोलाद क्षेत्रात उत्साह नसला तरी...

गेल्या शुक्रवारी हा लेख लिहीत असताना निर्देशांक व निफ्टी अनुक्रमे 36343 व 10855 होते. हा लेख प्रसिद्ध होण्यापूर्वीच वाचकांनी अर्थसंकल्प बघितलेला असेल. त्यामुळे लेखातील शेअर्सबद्दल दिवसभरात बर्‍याच घडामोडी झाल्या असतील.

दिवाण हौसिंग फायनान्सबद्दल एका माध्यमातून सनसनाटी माहिती प्रसिद्ध झाल्यामुळे तो शेअर भरपूर उतरला आहे. त्यामुळे या शेअरमधून बाहेर पडणे इष्ट ठरेल. अर्थसंकल्पापूर्वी वस्तुसेवा कराचा महसूल बराच कमी झाल्याची वार्ता होती. त्यामुळे बाजारात थोडीशी नैराश्याची भावना होती. वस्तुसेवाकर महसुलात जवळजवळ 1॥ लाख कोटी रुपये कमी  जमा झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच गेल्या दहा महिन्यांत सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे अपेक्षित निर्विवेशन झाले नव्हते. त्यातच निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प खर्‍या अर्थाने चार महिन्यांसाठीच होता. निवडणुकीनंतर येणारे सरकार पुन्हा आपला अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर करेल. अर्थव्यवस्थेसाठी  पुढील वर्ष निकटच राहील असे दिसते. सकल राष्ट्रीय उत्पन्‍नातील वस्तुसेवाकराची टक्केवारी सुमारे पाऊण टक्क्याने कमी झाली आहे. आतापर्यंत वस्तुसेवाकर 8.71 लक्ष कोटी रुपये वसूल झाला आहे असे विधान अर्थसंकल्पापूर्वी, स्टेट बँकेचे अर्थ सल्‍लागार सौम्यकांती घोष यांनी व्यक्‍त केले होते. त्यातच राज्याला  वस्तुसेवाकरातील जी रक्‍कम द्यायची असते त्यातही वाढ झाली होती. 

स्टेट बँकेने सध्या थकीत कर्जदारांना नादारीत काढण्याच्या हालचाली वाढवल्या आहेत. त्याचा अपेक्षित  परिणाम झाल्याने अनेक कर्जदार, कर्जाची पुनर्रचना करून घेण्यासाठी विनंत्या करीत आहेत. कित्येकांना बँक जर व्याजात आणि मुद्दलात सूट देत असेल तर कर्जे फेडण्याची तयारी दाखवली आहे. अशी सूट 40 टक्क्यांपर्यंत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे. न्यायालयेही कर्जदारांना झुकते माप देण्याच्या मनःस्थितीत असतील असे वाटते. विशेषतः ज्या मोठ्या बारा कर्जदारांना ((Dirty Dozen) सुमारे 4000 कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत. त्यांच्याबद्दल बँका वसुलीसाठी जास्त उत्सुक आहेत. सुमारे 816 न्यायालयीन दाव्यांबाबत तडजोड होण्याची शक्यता आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार देशातील नागरी विभागात बेरोजगारी बरीच वाढली आहे. रोजगार वाढवण्याच्याबद्दल सरकारचा जो दावा आहे तो वादाच्या भोवर्‍यात सापडत आहे. त्या वृत्तपत्राच्या अंदाजाने नागरी विभागातील बेरोजगारी पुरुषांमध्ये 1847 टक्के तर स्त्रियांमध्ये 27.2 टक्के आहे. ग्रामीण विभागात ही टक्केवारी अनुक्रमे 17.4 टक्के व 13.6 टक्के आहे. निश्‍चलनीकरणामुळे (Demonetinetion)  वाढल्याचे विरोधकांचे व अर्थतज्ज्ञांचे मत आहे. 

शेअरबाजारातील गुंतवणुकीचा विचार करता येस बँक, स्टरलाईट टेक्नॉलॉजीज, डिशमन कार्बोजेन, ब्रिगेड एन्टरप्राइजेस, नवीन फ्लोराइन हे शेअर्स विचारार्ह वाटतात. या आठवड्यात ग्राफाईट इंडियाचे डिसेंबर तिमाहीचे आकडे प्रसिद्ध होणार असल्यामुळे हा शेअर निर्वेशकांचे लक्ष वेधून घेत आहे. 6 फेब्रुवारीपर्यंत तो विकण्याची घाई करू नये. गेल्या शुक्रवारी तो 572 रुपयांपर्यंत चढला होता. त्याआधी तो शुक्रवारी सुरुवातीला 622 रुपयांपर्यंतही वर गेला होता. 

हेगही गेल्या शुक्रवारी 2632 रुपयाला उघडून नंतर तो 2475 च्या आसपास स्थिरावला.

के. पी. आय. टी. टेक्नॉलॉजीज सध्या 112 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. या शेअरचा गेल्या वर्षातील उच्चांकी भाव 314 रुपये होता व नीचांकी भाव 104 रुपये होता. रोज बर्‍याच मोठ्या प्रमाणावर  त्यात व्यवहार होत आहे. हा शेअर सध्या घेतल्यास वर्षभरात त्यात 40 टक्के भाववाढ मिळू शकेल. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर 7.34 पट दिसते.  पोलाद क्षेत्रामध्ये सध्या जरी फारसा उत्साह नसला तरी कल्याणी स्टील्सचा विचार करायला हरकत नाही. सध्या हा शेअर 200 रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. या भावाला किं/उ गुणात्तर 7.7  पट दिसते. गेल्या वर्षातील कल्याणी स्टील्सचा उच्चांकी भाव 348 रुपये होता व नीचांकी भाव 194 रुपये होता. कंपनीचे 2018  तिमाहीचे आकडे 8 फेब्रुवारीला प्रसिद्ध होणार आहेत.

वित्तीय तूट भरून काढण्यासाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान  पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्यांना सरकार अंतरिम लाभांश द्यायला भाग पाडू शकेल. राणा कपूर यांनी येस बँक 31 जानेवारीला सोडली आहे. त्यांच्याजागी तात्पुरते  प्रमुख वित्त अधिकारी म्हणून अजयकुमार यांची नेमणूक संचालक मंडळाने केली आहे. रिझर्व्ह बँकेने अशा तात्पुरत्या नेमणुकीला मान्यता दिली आहे. 

Back to top button