निवृत्तीचे नियोजन करताना… | पुढारी | पुढारी

 निवृत्तीचे नियोजन करताना... | पुढारी

जगदीश काळे

नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. याही पूर्ण वर्षात कोरेानाचे सावट राहणार आहे. अशा वातावरणातही आपल्याला बचतीचा विचार करावा लागणार आहे. कर बचत करण्याच्या  उद्देशाने किंवा भविष्याला सुरक्षित करण्याच्या द़ृष्टीने आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निवृत्तीचे नियोजन करण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टींचे आकलन करण्याची गरज आहे. 

बहुतांश मंडळी आरामदायी जीवन जगण्यासाठी लवकर निवृत्त होण्याचा विचार करतात किंवा स्वप्न पाहतात. परंतु त्यापैकी खूपच कमी लोकांना अपेक्षेप्रमाणे जगता येते. निवृत्तीची योजना अपयशी ठरण्यामागे अनेक कारणे आहेत. म्हणून बचत निवृत्ती योजनांकडेे लक्ष दिल्यास आणि चुका टाळल्यास निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी चांगला धनसंचय करणे शक्य आहे. 

बचतीसाठी नियोजन : नागरिकांनी दर महिन्यांला आपल्या उत्पन्नातील किमान दहा ते पंधरा टक्के पैसे निवृत्तीसाठी वाचवणे गरजेचे आहे. जर आपण वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार करत असाल आणि मोठा निधी उभारण्याचे नियोजन करत असाल, तर ही रक्कम पुरेशी आहे. परंतु आपल्याला वयाच्या 50 व्या वर्षीच नोकरी सोडायची असेल तर पुढील 25 ते 30 वर्षे घर चालवण्यासाठी मोठा निधी उभारण्याची गरज आहे. याचाच अर्थ असा, आपल्याला निवृत्तीसाठी उत्पन्नातून अधिकाधिक रक्कम बाजूला काढून ठेवणे गरजेचे आहे. योजनेनुसार बचत केली नाही, तर निवृत्तीची योजना यशस्वी होणार नाही. 

योग्य ठिकाणी बचत : निवृत्तीसाठी बचत करणार्‍या मंडळींना निधीची सुरक्षितता हा मोठा प्रश्न किंवा चिंता असते. मात्र जर आपण खूपच सजग राहून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अडचण येऊ शकते. एक शंभर टक्के डेट बेस्ड निवृत्ती योजना ही आपल्या अपेक्षेप्रमाणे आणि गरजेनुसार ग्रोथ करणार नाही. परिणामी, वयाच्या 50 व्या वर्षी गुंतवणूकदार अडचणीत येऊ शकतो.

शेअर बाजाराकडे दुर्लक्ष : शेअर बाजारात सरसकट गुंतवणूक करावी, असे नाही. कारण शेअर बाजार हा जोखमीचा आहे. मात्र निवृत्ती योजनेसाठी पोर्टफोलिओ निश्चित करताना महागाईला मागे टाकण्यासाठी शेअरचा विचार करावा लागेल. निवृत्तीच्या वयाजवळ पोचल्यानंतर आपल्याला शेअर बाजारातील गुंतवणूक कमी करता येते. जर आपण वयाच्या 50 व्या वर्षी काम करण्याचे थांबवत असेल, तर इक्विटी एक्स्पोजर 10 टक्क्यांपेक्षा कमी ठेवू नये. 

कमी काळासाठी म्युच्युअल फंड : गुंतवणुकीसाठी शिस्त असणे गरजेचे आहे. केवळ सहा ते आठ महिन्यांसाठी नाही, तर अनेक वर्षांसाठी गुंतवणूक करणे गरजेचे आहे. जी मंडळी पाच महिन्यांसाठी एकाच म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतील आणि त्यातही तीन एसआयपी मिस होत असतील, तर लवकर निवृत्त होण्याच्या स्वप्नाला तिलांजली द्यावी लागेल. या कारणामुळे प्रॉव्हिडंड फंडमध्ये गुंतवणूक महत्त्वाची मानली जाते आणि दीर्घकाळ बचतीसाठी हा एक चांगला पर्याय मानला जातो. 

नोकरी बदलल्यानंतर पीएफ काढणे : प्रत्येक वेळी नोकरी बदलताना सुरक्षित योजनेतून पैसे काढणे ही बाब निवृत्ती योजनेवर पाणी फेरणारी आहे. नोकरी बदलताना प्रॉव्हिडंड फंडच्या खात्यातून रक्कम काढणे किंवा त्याला नवीन कंपनीकडे स्थानांतरित करणे हा पर्याय असतो. युवा मंडळी नोकरी बदलताना ही रक्कम काढून घेण्याच्या मोहात पडतात आणि तो पैसा अनावश्यक गोष्टींसाठी वापरला जातो. निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी असणारा पैसा अकारण गोष्टींसाठी खर्च करणे हे भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी योग्य नाही. 

चुकीचा ताळेबंद : जर आपण गरजेच्या गोष्टींचे चुकीच्या पद्धतीने ताळेबंद करत असाल, तर निवृत्तीचे लक्ष्य गाठण्यात अपयश येऊ शकते. बहुतांश मंडळी निवृत्तीच्या गरजांचे आकडेमोड करताना महागाई दरांचा विचार करत नाहीत. जर आपले वय 30 असेल आणि आपला मासिक खर्च हा 75 हजार रुपये असेल व 8 टक्के महागाई दर असेल, तर आपला खर्च वयाच्या 50 व्या वर्षी 35 लाख रुपये राहू शकतो. निवृत्तीचे लक्ष्य निश्चित करताना 8 टक्क्यांच्या लाँग टर्म इन्फ्लेक्शन रेटचा विचार करायला हवा. 

एसआयपी योग्य मार्ग : सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)च्या माध्यमातून गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय आहे. एसआयपीच्या माध्यमातून पैसा उभा करण्यासाठी एसआयपीची सवय लावून घेणे गरजेचे आहे. एकच ध्येय समोर ठेवून आपण एसआयपीच्या मदतीने गुंतवणूक करायला हवी. मुदत ठेवी करताना तिचा कालावधी आणि ध्येय याचा विचार करायला हवा. पैशाची गरज भागेल, अशा रितीने मुदत ठेवीचे नियोजन करावे.

गुंतवणुकीची सवय लावावी : आर्थिक 

साक्षरतेमुळे व्यवहाराशी निगडित निर्णय घेण्यास मदत मिळते. उत्पन्नापेक्षा बचत किती केली, याचाच विचार करायला हवा. लवकर बचत सुरू केल्यास फंड अधिकाधिक जमा होण्यास हातभार लागेल. गुंतवणुकीची सुरुवात लहान रकमेतून सुरू करणे फायद्याचे ठरू शकते. भविष्यात कम्पाउडिंगने आपला पैसा वाढत राहतो. गुंतवणूक करताना आपण पर्सनल फायनान्सच्या प्रत्येक कालावधीचा विचार करायला हवा. जादा परतावा हा जोखमीचा असतो. पैसा उभा करण्यासाठी आपल्याला गुंतवणुकीची सवय लावायला हवी. 

आर्थिक साक्षरता : योग्य गुंतवणुकीचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे आर्थिक साक्षरता असणे गरजेचे आहे. फायनान्शियल लिटरसीचे चार मुख्य घटक आहेत. त्यात डिमॅट खाते सुरू करण्याचा उद्देश, पोर्टफोलिओमध्ये शेअरला किती स्थान मिळेल, एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करणे किती शहाणपणाचे ठरू शकते आणि बँक मुदत ठेवीचे लाभ, या गोष्टींचा उल्लेख करता येईल. आर्थिक साक्षरतेची सुरुवात लहानपणापासूनच करायला हवी. मुलांना पहिल्यांदा मॉलमध्ये नेताना एक गोष्ट सांगायला हवी. ती म्हणजे आपण उद्या मॉलमध्ये जाणार आहोत आणि आपल्याला पैसे कसे खर्च करायचे आहेत. मुलांना खर्चाबरोबरच बचतीची माहिती देणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

बजेटकडे लक्ष : आपल्या कुटुंबाच्या बजेटकडे लक्ष देणेदेखील महत्त्वाचे ठरते. आपण युवकांना बँक खाते आणि गुंतवणुकीची माहिती देणे गरजेचे आहे. डिमॅट खात्याच्या माध्यमातून गुंतवणुकीची सुविधा मिळते. आगामी काळात डिमॅट खाते अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण कोणत्याही व्यक्तीचे सर्व असेट आणि लायबिलिटिजची माहिती डिमॅटमध्ये दिसते. जर आपल्याकडे वेळ आणि माहिती असेल तरच शेअर बाजारात गुंतवणूक करावी. शेअर बाजाराची आपल्याला फारशी माहिती नसेल आणि वेळ नसेल तर म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करावा. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यानंतर संबंधित कंपनीचे तिमाही, वार्षिक रिपोर्टचे आकलन करणे गरजेचे आहे. 

Back to top button