टाईप १ मधुमेहींसाठी स्वादुपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय, जाणून घ्या त्याचे फायदे | पुढारी

टाईप १ मधुमेहींसाठी स्वादुपिंड प्रत्यारोपणाचा पर्याय, जाणून घ्या त्याचे फायदे

डॉ. गौरव चौबल

स्वादुपिंड प्रत्यारोपण हा पर्याय टाईप 1 मधुमेह असलेल्यांमध्ये तसेच अंतिम टप्प्यातील मूत्रपिंड विकार व मूत्रपिंड निकामी रुग्णांसाठी असतो. जेव्हा मधुमेह औषधोपचाराने नियंत्रित करता येत नाही, ज्यांना वारंवार इन्सुलिनची आवश्यकता भासते, ज्यांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण नसते, ज्यांच्या मूत्रपिंडाचे नुकसान होते आणि टाईप 2 मधुमेहही असतो त्यांच्यासाठीही स्वादुपिंड प्रत्यारोपण योग्य ठरते. स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी रुग्णाला रक्त चाचण्या, सीटी स्कॅन, ओटीपोटाचा अल्ट्रासाऊंड, टू डी इको चाचण्या कराव्या लागतात.

स्वादुपिंडाचे प्रत्यारोपण

स्वादुपिंड प्रत्यारोपण हे एक अवयव प्रत्यारोपण आहे, ज्यामध्ये सामान्यतः मधुमेह असलेल्या व्यक्तीमध्ये निरोगी स्वादुपिंड (इन्सुलिन तयार करू शकणारे) रोपण करणे समाविष्ट असते. एकत्रित मूत्रपिंड-स्वादुपिंड प्रत्यारोपणाचा पर्यायदेखील उपलब्ध आहे, जे सामान्यत: एकाच वेळी केले जातात. हे प्रामुख्याने मधुमेही रुग्णांसाठी आहे, ज्यांचे आधीच मूत्रपिंड निकामी झाले आहे किंवा ते निकामी होण्याचा धोका अधिक आहे. स्वादुपिंड प्रत्यारोपणाची बहुतेक प्रकरणे मूत्रपिंड प्रत्यारोपणाशी जुळतात. स्वादुपिंड प्रत्यारोपणाच्या वेळी, मृत दात्याकडून निरोगी स्वादुपिंड घेतला जातो. मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी झाले असल्यास, सर्जन एकाच वेळी मूत्रपिंड प्रत्यारोपण करू शकतात. ही मूत्रपिंड शस्त्रक्रिया स्वादुपिंडाच्या शस्त्रक्रियेपूर्वी किंवा नंतर होऊ शकते. स्वादुपिंड प्रत्यारोपणादरम्यान तुमचा मूळ स्वादुपिंड त्याच ठिकाणी राहतो. सामान्यतः नवीन अवयव पाचक एन्झाईम्सचा निचरा करण्यासाठी तुमच्या आतड्यांशी जोडला जातो. यशस्वी प्रत्यारोपणानंतर इन्सुलिनच्या इंजेक्शनची गरज भासणार नाही, कारण नवीन प्रत्यारोपित स्वादुपिंड स्वतःच इन्सुलिन तयार करते. यानंतर आपण सामान्य आहाराचे सेवन करू शकतो आणि रक्तातील साखरेची पातळीदेखील नियंत्रित राखता येते. याव्यतिरिक्त, या प्रक्रियेमुळे मूत्रपिंड खराब होण्याची शक्यता कमी असते. प्रत्यारोपणानंतरचा बरा होण्याचा कालावधी सुमारे एक आठवडा ते दहा दिवसांचा असतो.

स्वादुपिंड प्रत्यारोपणाचे फायदे:

टाईप 1 मधुमेह असलेल्या रुग्णांना याचा फायदा होतो. प्रत्यारोपणानंतर अनेक रुग्णांना आहाराची पथ्ये किंवा औषधांची आवश्यकता भासत नाही, तसेच रक्तातील साखरेची पातळीदेखील सामान्य होते. आणखी एक मोठा फायदा म्हणजे न्यूरोपॅथी आणि रेटिनोपॅथी यांसारख्या मधुमेहाशी संबंधित गुंतागुंतीचा धोकादेखील कमी होतो.

Back to top button