डोळ्यांचा नंबर सारखा बदलतोय, जाणून घ्या ‘केराटोकोनस’ व्याधीविषयी आणि त्यावरील उपचार | पुढारी

डोळ्यांचा नंबर सारखा बदलतोय, जाणून घ्या ‘केराटोकोनस’ व्याधीविषयी आणि त्यावरील उपचार

डॉ. वर्धमान कांकरिया

केराटोकोनस ही बुब्बुळाशी संबंधित गंभीर व्याधी आहे. यात बुब्बुळाची गोलाई आणि जाडी बदलते. त्यामुळे रुग्णाच्या डोळ्यांचा नंबर सारखा बदलतो. या व्याधीची व्याप्ती रोखण्यासाठी वेळीच प्रयत्न केले नाहीत तर बुब्बुळाच्या रोपणाचाच पर्याय शिल्लक राहतो. ऐन तारुण्यात जडणार्‍या या व्याधीविषयी…

केराटोकोनस या व्याधीबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे केराटोकोनस म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. केराटोकोनस ही बब्बुळाची व्याधी असून ती साधारणत: वयाच्या 20 ते 30 वर्षांपर्यंत जडते. या व्याधीमध्ये बब्बुळाची वक्रता सारखी बदलते आणि त्याच बरोबर बुब्बुळाची जाडीही कमी होत जाते. त्यामुळे रुग्णाच्या चष्म्याचा नंबर सारखा बदलतो. बुब्बुळाची जाडी कमी झाल्यामुळे अशा डोळ्यांवर नंबर घालवण्याची शस्त्रक्रिया करणे धोकादायक असते. या व्याधीच्या लक्षणांमध्ये प्रकाशाचा त्रास होणे, रात्री वाहन चालवताना त्रास होणे, रात्रीच्या वेळी डोळ्यांवर येणारा प्रकाश पसरणे, डोळ्यांवर ताण येणे, डोळे तसेच डोके दुखणे यांचा समावेश होतो.

अगदी सुरुवातीच्या टप्प्यात या विकाराचे निदान करणे अवघड असते. या व्याधीच्या निदानासाठी तिच्या लक्षणांची नेमकी माहिती असणार्‍या तज्ज्ञांकडेच जाणे हितकर ठरते. या व्याधीच्या निदानासाठी ‘स्लिट लँप एक्झामिनेशन’ ही पद्धत वापरली जाते. यात सूक्ष्मदर्शकाच्या सहाय्याने बुब्बुळाची तपासणी केली जाते. या तपासणीमध्ये बुब्बुळाची जाडी कमी होत आहे का, कोनच्या सभोवती वर्तुळ (फिशर्स रिंग) तयार झाले आहे का, बुब्बुळ पातळ झाल्यामुळे काही रेषा पडल्या आहेत का, कोनच्या वरच्या भागात काही डाग पडले आहेत का, हे पाहिले जाते. ‘कॉर्नियलटोपोग्राफी’ आणि ‘पेंटाकॅम’ यांच्यामुळे केराटोकोनसचे निदान लवकर होऊ शकते. शिवाय या व्याधीची व्याप्ती नेमकी ओळखून ती इतर तत्सम व्याधीपासून वेगळी असल्याचेही सिद्ध करता येते.

एएसओसीटी – या प्रगत तपासणीमध्ये बुब्बुळाची विविध ठिकाणची जाडी नेमकी किती आहे, हे समजते. यातून ‘एपिथेलियल थिकनेस प्रोफाईल’ मिळते आणि त्यामुळे केराटोकोनसचे लवकरात लवकर निदान होऊ शकते. केराटोकोनस या व्याधीवरील उपचारांमध्ये चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सच्या सहाय्याने द़ृष्टी सुधरवणे आणि व्याधीची व्याप्ती आहे तिथेच रोखणे अशा दोन पद्धतींचा समावेश होतो. या व्याधीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चष्म्याच्या सहाय्याने द़ृष्टीमध्ये अचूकता आणली जाते. यात ‘अ‍ॅस्टिग्मॅटिझम’ चीही काळजी घेता येते. ही व्याधी असणार्‍यांना लावण्यासाठीच्या काँन्टॅक्ट लेन्स खास तयार करून घ्याव्या लागतात. त्यासाठी प्रत्येक रुग्णाच्या बुब्बुळांची योग्य तपासणी करूनच या लेन्सेस तयार केल्या जातात. मुख्यत्वे या व्याधीची व्याप्ती रोखण्यासाठी ‘कॉर्नियल कोलाजेन क्रॉस लिंकिंग’ या उपचार पद्धतीचा वापर केला जातो.

सध्या या व्याधीची व्याप्ती रोखण्यासाठी ही एकमेव उपचार पद्धती अस्तित्त्वात आहे. ‘कोलाजेन’ हे बुब्बुळातील नैसर्गिक ‘अँकर्स’ असतात. या अँकर्समुळेच बुब्बुळाचा आकार बदलत नाही. केराटोकोनसमध्ये या अँकर्सचे क्रॉस लिंकिंग केले जाते. ही शस्त्रक्रिया लेसर किरणांच्या सहाय्याने केली जाते.

इंटॅक्स शस्त्रक्रिया हाही एक प्रकार वापरात आणता येतो. ‘इंटॅक्स’ या पातळ प्लास्टिकच्या अर्धवर्तुळाकृती रिंग्ज असतात. शस्त्रक्रियेद्वारे या रिंग्ज बुब्बुळाच्या मधल्या थरात बसवल्या जातात. या रिंग्ज बुब्बुळाचा आकार आणि गोलाई बदलतात. त्यामुळे कोनची जागा आणि आकार बदलतो. या रिंग्जमुळे बुब्बुळाचा बदललेला आकार नियमित होण्यास मदत होते. त्यामुळे रुग्णाची द़ृष्टी सुधारते. अर्थात, या शस्त्रक्रियेनंतरही व्याधीच्या तीव्रतेनुसार चष्मा आणि काँटॅक्ट लेन्स वापरावी लागू शकते. असे असले तरी सुमारे 15 ते 20 टक्के रुग्णांना या उपचारांचा फारसा फायदा होत नाही. अशा रुग्णांना बुब्बुळाचे रोपणच करावे लागते.

रुग्णाच्या द़ृष्टीने बुब्बुळाच्या रोपणाचा निर्णय घेणे अत्यंत भीतीदायक असू शकते. परंतु अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेच्या पूर्वी, दरम्यान आणि नंतर काय घडणार आहे, हे संबंधित रुग्णाला माहीत असल्यास त्यांची शस्त्रक्रियेबाबत मानसिक तयारी चांगली होते. केराटोकोनसच्या रुग्णाचे बुब्बुळ खूपच पातळ झाले आणि चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचा काहीच फायदा होत नसेल तर बुब्बुळाच्या रोपणाचाच पर्याय शिल्लक राहतो. अशा वेळी रुग्णाचे बुब्बुळ इतके खराब झालेले असते की, त्यावर कॉन्टॅक्ट लेन्स बसवणेही अशक्य होते. म्हणून रुग्णाचे बुब्बुळ शस्त्रक्रियेने काढून त्या ठिकाणी दात्याचे बुब्बुळ बसवले जाते.

या विविध उपचार पद्धतींपैकी नेमकी कोणती उपचार पद्धती वापरायची याचा निर्णय व्याधीची व्याप्ती आणि तीव्रता यावर अवलंबून असतो. केराटोकोनस हा गंभीर नेत्रविकार असल्याने त्या संदर्भातील लक्षणे आढळल्यास तातडीने तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

Back to top button