गरोदरपणातील आरोग्य दक्षता | पुढारी

गरोदरपणातील आरोग्य दक्षता

डॉ. संतोष कुंभार

आईने प्रथिने, खनिजे, कॅलरीज आणि जीवनसत्त्वं योग्य प्रमाणात मिळतील, असा आहार गर्भारपणात घ्यायला हवा. दूध, फळं, पालेभाज्या असा आहार घेतल्यास उत्तमच. तसंच मांसाहार करणार्‍या स्त्रियांनी अंडी, मांस, मासे या काळात घेणे अतिशय उत्तम. काहीवेळा गरोदरपणामध्ये उलट्या होणे, मळमळणे आदी प्रकार होत असतात; पण सगळेच अन्न पचत नाही म्हणून काहीच पोटात घ्यायचे नाही, असे करणेही चुकीचे आहे. डॉक्टरांच्याच सल्ल्याने उलटीवर, मळमळणे यावर औषधोपचार घ्यावेत. सतत उलट्या होणे यामुळे खूपच अशक्तपणा आलेला असतो. अशावेळी दूध, फळांचा रस, शहाळे याचा जास्तीत जास्त वापर करून स्वत:ला आरोग्यदायी ठेवणे गरजेचे आहे.

गरोदरपणामध्येच आपल्या बाळाला जास्तीत जास्त अंगावरचे दूध पाजण्याची तयारी आईने दाखवावी लागते. अशी तयारी झालेली असेल, तर दूध कमी येण्याच्या तक्रारी आपोआप कमी होतात. कारण, काही गुणधर्म आपल्या मानसिकतेवरच अवलंबून असतात. याबरोबर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्तनाग्राची काळजी घेणे. डॉक्टर आणि नर्स सांगतील त्याप्रमाणे स्तनाग्राची काळजी घेणे गरजेचे असते. म्हणजे बाळाचा जन्म होण्याआधीच स्तनाग्राला मॉलिश करणे, जन्मलेल्या बाळाला दूध व्यवस्थितरीत्या पिता येईल, अशा पद्धतीने स्तनाग्राची रचना करावी, यासाठी डॉक्टरांचा सल्ला किंवा घरातील ज्येष्ठ स्त्रियांचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. काही वेळा स्तनाग्राची नीटशी काळजी घेतली नसल्याने बाळाला दूध पिणे अडचणीचे ठरते. त्याला नीटसे दूध न मिळाल्याने त्याचे पोट भरत नाही आणि मग तो सारखाच रडत राहतो. शिवाय जन्मल्यानंतर आईचे दूध बाळासाठी औषधी गुणांचे असते. तेही धड त्याला मिळत नाही. त्यामुळे स्तनाग्रांची काळजी घेणे, हा महत्त्वाचा भाग असतो.

गरोदरपणात सार्वजनिक ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे. मोकळ्या हवेत, उद्यानात बसणं ठीक. तलाव, शेत, उद्यान अशा ठिकाणी फिरायला जाणे, केव्हाही उत्तमच. काहीवेळा ओटीपोटात दुखतं. आत बााळाची हालचाल होते म्हणून ओटीपोटी दाबणं किंवा मसाज करणे अत्यंत धोकादायक असते. अशातर्‍हेने बााळाच्या जन्मापूर्वी आईने योग्य ती काळजी घेतली, तर बाळाचा जन्म आणखी आनंद देऊन जाईल. शिवाय बाळंतपणही सुखरूप होऊन जाईल.

Back to top button