अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी करा | पुढारी

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी 'या' तीन गोष्टी करा

डॉ. संतोष काळे

अल्झायमर या व्याधीचा धोका कोणालाही असू शकतो, पण हा आजार जडण्याचा धोका आपण कमी करू शकतो. यासाठी वाढत्या वयात आपल्या मेंदूची काळजी घेणे गरजेचे आहे. पूर्वी अल्झायमर टाळण्यासाठी पुरेसे उपचार होऊ शकत नव्हते. सध्या अल्झायमर, इतर डिमेन्शियासारख्या आजारांवर संशोधन होत आहे. काही उपायही समोर येत आहेत, पण योग्य आहार, नियमित व्यायामाने हा आजार होऊच नये यासाठी प्रयत्न करू शकतो. मानसिक स्वास्थ्य, सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग आणि ताणापासून मुक्ती या तीन गोष्टी केल्यास हा आजार दूर ठेवू शकतो. मेंदूचा झीज थांबवण्यासाठी योग्य जीवनशैलीचा अंगीकार करायला हवा.

नियमित व्यायाम

शारीरिक व्यायामामुळे अल्झायमरसारखे आजार दूर ठेवता येतात, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. नियमित व्यायामामुळे मेंदूची होणारी झीज कमी वेगाने होते. आकलनशक्तीवर परिणाम झाला असला तरीही त्याचा वेग मंदावतो. नियमित व्यायामात खंड पडला असला तरी पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही. अगदी जिममध्ये जाऊन व्यायाम करायला हवा असे नाही. घरच्या घरी देखील आपण व्यायामाला सुरुवात करू शकतो. उदा. जास्तीत जास्त चाला, जिने चढउतार करा, फोनवर बोलताना फिरत बोला.

मेंदूला खाद्य पुरवा

सातत्याने बुद्धिमत्तेला चालना देणार्‍या, नवनवीन गोष्टी शिकणार्‍या लोकांमध्ये अल्झायमर होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मेंदूला सतत काहीतरी नवीन खाद्य पुरवत रहा. बुद्धीचा कस लागेल अशी कामे करा, एकावेळी दोन कामे करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून मेंदू जास्त सक्रिय राहील. उदा. परदेशी भाषा शिकणे, खुणांची भाषा शिकणे, वाद्य वाजवणे, भरपूर वाचन करणे किंवा एखादी नवी कला शिकणे यामध्ये मेंदू अधिक सक्रिय राहतो.

पोषक आहार

शरीराप्रमाणे मेंदूलाही पोषक आहार लागतो. त्यामुळे मेंदूचे आरोग्य चांगले राखणार्‍या भाज्या, भरपूर ताजी फळे खा. प्रथिन आणि चरबीचे योग्य प्रमाण ठेवा. ओमेगा 3 नावाचे फॅटस् योग्य प्रमाणात घ्या. यामुळे अल्झायमर किंवा डिमेन्शियासारखे आजार दूर ठेवण्यास मदत होत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. गडद रंगाची फळे, भाज्या ज्यांच्यामध्ये अँटिऑक्सिडेंटस भरपूर प्रमाणात असतील ती खावीत. कोबी, पालक, मोडाची धान्ये, ब्रोकोली, बीटरुट, लाल भोपळी मिरची, कांदा, कॉर्न, वांगे, मनुका, स्ट्रॉबेरी, संत्रे, लाल द्राक्षे आणि चेरी या सगळ्यांचा आहारात समावेश करावा.

पुरेशी झोप

आहाराबरोबरच मेंदूला पुरेशी विश्रांती मिळायला हवी. तर मेंदू पूर्ण कार्यक्षमतेने काम करतो. अपुर्‍या झोपेमुळे आपण आळसावलेले, थकलेले असतो, पण त्यामुळे आपली विचारक्षमता कुंठीत होते. त्यामुळे विचार करणे, निर्णय घेणे, आठवणे या सगळ्यांवर परिणाम होतो. मोठ्या व्यक्तीना रात्री किमान आठ तास झोपेची गरज असते. त्याशिवाय दिवसभरात थोडीशी झोप घेतल्यासही बरे वाटते.

तणावाचे व्यवस्थापन-

तणावामुळे मेंदू शिणतो. ताणतणावामुळे मेंदूची कार्यक्षमतेत घट होते. मेंदूमधील हिप्पोकॅमस् हा भाग ताणामुळे आकुंचन पावतो. त्यामुळेच मेंदूतील नसांवर त्याचा परिणाम होऊन अल्झायमर होण्याचा धोका बळावतो. नियमित प्रयत्नाने तणावाचे नियोजन करणे सहज शक्य होते. आवडीच्या गोष्टीत मन रमवून आपण ताणाचे नियोजन निश्चितच करू शकतो. त्यासाठी योगासने करणे, चालणे, एखादा खेळ खेळणे आदी गोष्टी तुम्ही करु शकता.

आवश्यक पूरक घटक

ओमेगा 3 फिश ऑईल, कोएन्झाईम्स क्यू 10, अल्फा लापोईक अ‍ॅसिड, अ‍ॅक्टिल एल कारनायटिन, जीवनसत्त्व बी 1,2,3 आणि जीवनसत्त्व 6, डी जीवनसत्त्व, बी 12 जीवनसत्त्व, मॅग्नेशिअम, अ‍ॅस्टाक्झाथिन, हुपरझाईन ए.

हेही वाचा : 

Back to top button