‘ही’ रानभाजी आहे आरोग्यासाठी गुणकारी! पावसाळ्यात जरुर खा! | पुढारी

‘ही’ रानभाजी आहे आरोग्यासाठी गुणकारी! पावसाळ्यात जरुर खा!

मुंबई : पावसाळ्याच्या दिवसात अनेक रानभाज्या बाजारात येतात. टाकळा, करटोली, कोहळू, लोथ, अशा अनेक भाज्यांचा आजकाल आपल्या आहारातून समावेश कमी होत चालला आहे. परंतु, या भाज्या चवीला ‘हटके’ आणि आरोग्यदायी आहेत. पावसाळ्यातील रानभाज्यांपैकी रानकारली, कंटोला किंवा करटोली या विविध नावांनी ओळखली जाणारी भाजी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक असते. ही कारल्याच्या प्रजातीमधील भाजी असली तरीही ती तितकी कडवट नसते.

रानकारले किंवा करटोला हे लहान वांग्यापेक्षा लहान आकाराचे फळ आहे. यामध्ये प्रोटिन, फायबर, कार्बोहायड्रेटस्, विटामिन ए, विटामिन बी 1, बी 2, बी 3, बी 5, बी 6, बी 9, बी 12, विटामिन सी, विटामिन डी 2 आणि 3, विटामिन एच, विटामिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषकतत्त्वे आढळतात तर कॅलरीज अत्यल्प असतात. सुमारे 100 ग्रॅम करटोल्यांमध्ये 17 कॅलरीज आढळतात.

करटोलीमध्ये फायबर आणि अँटी ऑक्सिडंट घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे ही भाजी पचायला हलकी असते. पावसाळ्याच्या दिवसात इन्फेक्शनचा धोका, बद्धकोष्ठता, पोटाजवळील चरबी कमी करण्यासाठी मदत होते. शरीरामधील घातक घटक बाहेर टाकण्यासाठी करटोल्यातील ‘फायटोकेमिकल्स’ मदत करतात. सोबतच कॅन्सर, हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते. मधुमेहींसाठीदेखील करटोली फायदेशीर आहे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. वातावरणात बदल झाल्याने कफ, सर्दी, खोकला, इतर अ‍ॅलर्जीचा त्रास कमी होण्यास मदत होते.

Back to top button