थायरॉईड चे आजार | पुढारी

थायरॉईड चे आजार

डॉ. संजय गायकवाड

थायरॉईड ग्रंथी हे गळ्याच्या मधल्या त्वचेच्या जवळ असतात. हवामान बदलले की थायरॉईड ग्रंथींच्या कार्यावर परिणाम होतो. हार्मोन तयार होण्याची प्रक्रिया संतुलित राहण्यासाठी डॉक्टरांकडून थंडीत आणि उन्हाळ्यात शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण तपासण्याचा सल्ला दिला जातो. थायरॉईड हे शरीरातील प्रमुख अ‍ॅण्डोक्राईन ग्लॅन्ड असते. गळ्याच्या मध्यभागी एक छोटी ग्रंथी असते.

थायरॉईडचे काम शरीरात हार्मोन्सची निर्मिती करणे आणि चयापचय क्रियेवर नियंत्रण राखणे असे असते. जेव्हा या ग्रंथी काम करेनाशा होतात किंवा अती काम करतात तेव्हा माणसाचे आरोग्य बिघडून जाते.

थायरॉईडचे दोन प्रकार असतात.

1) हायपो थायरॉईड : या स्थितीमध्ये थायरॉईड ग्रंथी हळूहळू काम करत असतात. त्यामुळे टी 3 आणि टी 4 या हार्मोन्सचे संतुलन बिघडून जाते. परिणामी त्या व्यक्तीचे वजन वाढू लागते. कसल्याही कामात लक्ष लागत नाही. बद्धकोष्टता होते.

2) हायपर थायरॉईड : या स्थितीमध्ये थायरॉईड ग्रंथी वेगाने काम करतात. टी 3 आणि टी 4 ही हार्मोन्स अधिक प्रमाणात स्त्रवतात आणि रक्तात मिसळतात. त्यामुळे वजन कमी होऊ लागते, भूक जास्त लागते, मनावर नैराश्याची छाया येते, शांत झोप लागत नाही.

लक्षणे : 1) वजनात मोठी वाढ होणे अथवा मोठी घट होणे. 2) आवाजात बदल होणे. 3) मानेत गाठ येणे, मान सुजणे तसेच मानेच्या खालच्या भागात वेदना होणे. 4) वारंवार डोके दुखणे. 5) बोलताना अथवा श्वास घेताना धाप लागणे. 6) वारंवार थकवा येणे. 7) भुकेवर नियंत्रण न राहणे. 8) अशक्तपणा जाणवणे. 9) नैराश्य येणे. 10) सांधे दुखणे, चालताना त्रास होणे. 11) जास्त झोप येणे किंवा शांत झोप न लागणे. 12) डोळे आणि चेहर्‍यावर सूज येणे. 13) खूप थंडी वाजून येणे. 14) त्वचा कोरडी पडणे.

थायरॉईडच्या आजारांची शिकार पुरुषांपेक्षा महिलाच अधिक होताना दिसतात. संसारातील ताणतणाव, कमी अधिकप्रमाणातील नैराश्य यामुळे महिला थायरॉईडच्या व्याधीच्या शिकार ठरतात. थायरॉईडच्या दहा रुग्णांपैकी सात रुग्ण महिला असतात. मात्र अनेक महिलांना आपल्याला थायरॉईडची व्याधी झाली आहे हेच कळत नाही.

त्यामुळे वेळेत उपचार न झाल्यामुळे महिला स्थूल होऊ लागतात. त्याचबरोबर अशा महिलांना वंध्यत्व येण्याचीही शक्यता असते. 35 पेक्षा अधिक वय असणार्‍या पुरुष आणि महिलांनी पाच वर्षांतून एकदा थायरॉईडची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. ही व्याधी झालेल्या रुग्णांनी नियमितपणे योगासने करावीत. त्याचबरोबर व्यायामही करावा. व्यायामामुळे थायरॉईड ग्रंथी सक्रिय होतात.

नियमित व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहाते. झोपून टीव्ही पाहू नका आणि वृत्तपत्रे, मासिकेही वाचू नका. शक्य असेल तर डोक्याखाली उशी घेऊ नका. अ‍ॅक्युपंक्चरद्वारे या व्याधीवर उपचार करता येतात. थायरॉईडच्या रूग्णांना आयोडिनच्या सेवनाने फायदा होतो. समुद्रातील मासे, समुद्री शेवाळे, मीठ यातून शरीराला भरपूर आयोडिन मिळते. हिरव्या पालेभाज्या, ताज्या भाज्या खाव्यात.

टोमॅटो, हिरवी मिरची, कांदा, लसूण यांचाही समावेश आहारात असावा. अंडी, दूध, गाजर, मशरूम, मासे यांचाही समावेश आहारात करा. दररोज अर्धा तास उन्हात बसा. अक्रोड, बदाम भरपूर प्रमाणात खा. नारळाच्या तेलापासून बनवलेले अन्न पदार्थ खा. गाईचे दूध, दही आणि पनिर यांचाही समावेश आहारात असावा. अशा रुग्णांनी कोबी, फ्लॉवर, ब्रोकली या भाज्या खाऊ नयेत.

जंकफूडचा आहार घेऊ नये. धूम्रपान करू नये तसेच धुम्रपान करणार्‍यांच्या संपर्कातही राहू नये. कारण सिगरेटच्या धुरातील थायोसाइनेट हा पदार्थ थायरॉईड ग्रंथींचे नुकसान करतो, असे सिद्ध झाले आहे.

Back to top button