उन्हाळ्यातील आहारमंत्र | पुढारी

उन्हाळ्यातील आहारमंत्र

सध्याच्या जीवनशैलीत आहाराकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसात तर आहारावर अधिक लक्ष दिले पाहिजे. उन्हाळ्यात काय खावे, काय नाही याची माहिती असणे आवश्यक आहे. वाढत्या उन्हाळ्यातही काम करताना आपल्याला ताजेतवाने राहण्यासाठी काय खाल्ल्यास ताकद टिकून राहील?

उन्हाळ्यात तब्येतीची अधिक काळजी घेतली पाहिजे. कारण उन्हाळ्यात विविध आजार होण्याची शक्यता अधिक असते. उदा. जुलाब होणे, पोटात गॅस होणे, सनबर्न आणि त्वचेचा संसर्ग इत्यादी त्रास होतात. त्यामुळे उन्हाळ्यातील योग्य आहार कोणता जाणून घेऊया

उन्हाळ्यात तहान अधिक प्रमाणात लागते. त्यामुळे पाणीही अधिक प्रमाणात प्यायले जाते. साध्या पाण्याबरोबर लिंबू पाणी, आंब्याचे पन्हे, सरबत, सातू, लस्सी आणि सरबत आदींचे सेवन करणे हितकारक ठरते.

उन्हाळ्यात येणारी पाणीदार फळे आणि भाज्या यांचे सेवन करावे. टरबूज, खरबूज, लीची, काकडी, आंबा यांच्याबरोबरच ताजा उसाचा रस, आंब्याचा रस, डाळिंबाचा रस आदींचे सेवन करावे.

सतत गरम उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे. उदा. चहा, कॉफी न घेता कोल्ड कॉफी, ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी आदींचे सेवन उपयुक्त ठरते.
उन्हाळ्यात तळलेले पदार्थ खाऊ नयेत तसेच गरजेपेक्षा अधिक आहार खाऊ नये. पेयपदार्थांचे सेवन जास्त प्रमाणात करावे आणि नाचणीपासून तयार होणार्‍या पदार्थांना प्राधान्य द्यावे.

उन्हातून आल्या आल्या एकदम थंड पाणी पिऊ नये. थोडा वेळ थांबून मगच पाणी प्यावे.
उन्हाळ्यात मुलांना काय खायला द्यावे याविषयी माहिती करूसन घ्यावी.
उन्हाळ्यात जुलाब, कॉलरा, कावीळ, शरीरातील पाणी कमी होणे, अन्नातून विषबाधा होणे, पोटात वायू होणे आणि अपचन सारखे आजार होतात. त्या सर्व आजारापासून वाचण्यासाठी शिळे अन्न खाऊ नये, झाकून ठेवलेले पाणी प्यावे आणि बाहेरीन अन्नपदार्थ घेणे टाळावे.
उन्हाळी लागू नये म्हणून योग्य आहाराबरोबरच घराबाहेर पडताना छत्री, टोपी आणि रुमाल यांचा वापर करावा.
उन्हाळ्यात लिंबू, कांदा, मोसंबी, संत्रे, विविध सरबते आणि ताज्या फळांचा रस प्यावा.
उन्हाळ्यात डाळ, तांदूळ, भाज्या आणि पोळी असा हलका आहारच घ्यावा.
पचनासंबंधीच्या तक्रारी दूर ठेवण्यासाठी भूक लागल्यावर भरपेट जेवण्याऐवजी थोडा थोडा वेळाने थोडा थोडा आहार घ्यावा. त्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि वायू होणे यासारख्या समस्यांपासून दूर राहता येईल.
त्याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यायाम. तो चुकवायचा नाही. सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरायला जावे. त्यामुळे आपण ताजेतवाने होऊ आणि आरोग्यही चांगले राहील.

डॉ. महेश बरामदे

Back to top button