National Cancer Awareness Day : शरद पवारांनी कॅन्सरबाबत विलासराव देशमुखांना दिला होता ‘हा’ सल्ला | पुढारी

National Cancer Awareness Day : शरद पवारांनी कॅन्सरबाबत विलासराव देशमुखांना दिला होता 'हा' सल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार डिसेंबर महिन्यात वयाची ८२ वर्षे पूर्ण करतील. त्यांनी राजकीय आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. मात्र, २००४ हे वर्ष त्यांच्या आयुष्यात समरप्रसंगासारखं आलं. शरद पवारांना या वर्षी कर्करोगाने गाठलं. संकटांना न कचरता टक्कर द्यायची, या त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यामुळे त्यांनी कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली. (National Cancer Awareness Day)

कर्करोगावर यशस्वी मात करणाऱ्या शरद पवारांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोलाचा सल्ला दिला होता. विलासराव देशमुख यांना लिव्हर कॅन्सर झाला होता. त्यांच्या प्रकृतीत काहीतर बिघाड आहे. हे आधीपासूनच शरद पवारांना जाणवत होतं. शरद पवारांनी काही भेटींमध्ये त्यांना सल्ला दिला होता की, “मला तुमची प्रकृती ठीक वाटत नाही. आपण डॉक्टरांकडे जाऊ. माझ्या माहितीच्या डॉक्टरांकडे मी नेतो” मात्र, त्यांनी आजाराकडे गांभीर्याने पाहिलं नाही, असं शरद पवार सांगतात. (National Cancer Awareness Day)

पवार सांगतात, ‘कर्करोग म्हणजे सार संपलं’ अस समजून हातपाय गाळले जातात. या रोगाच्या तडाख्यात आपण सापडलो, यानेच अनेकजण गळून जातात. कर्करोग झाल्यानंतर माझी पहिली प्रतिक्रिया होती, याच्यावर आपल्याला मात करायची आहे, ही! आपण कर्करोगावर दोन हात करायचे आणि जिंकायचंच! (National Cancer Awareness Day)

शरद पवारांना कर्करोगाने गाठल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना त्यांचा वेदना पहावल्या जात नव्हत्या. ते म्हणायचे, “काही दिवस कामातून बाजूला होऊन आराम कर” मात्र, पवारांच्या मनाचा निग्रह पक्का होता. कामात गुंतवून घेतलं तरच आपल्या वेदना कमी होऊ शकतात. (National Cancer Awareness Day)

शरद पवार लोक माझे सांगाती या त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, ” मी पानपराग खायचो. तो पूर्णपणानं बंद केला. त्याचे परिणाम किती भयंकर आहेत, हे मी अनुभवलं होत; त्यामुळे तंबाखू आणि पानपराग खाऊ नका, असं मी आग्रहाने सांगू लागलो. याचा एक विधायक परिणाम महाराष्ट्रातल्या आमच्या सरकारनं तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली. (National Cancer Awareness Day)

हेही वाचलंत का?

Back to top button