मुलांची उंची हवी तशी का वाढत नाही? जाणून घ्या कारण आणि उपाय | पुढारी

मुलांची उंची हवी तशी का वाढत नाही? जाणून घ्या कारण आणि उपाय

काही मुलांची उंची हवी तशी वाढत नाही, त्यासाठी पालकांनी पौष्टिक आहार आणि व्यायाम यासाठी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मदतही केली पाहिजे. बहुतेक पालक डॉक्टरांकडे उंची वाढण्यासाठी टॉनिक किंवा तत्सम औषधे मागतात. परंतु, पालकांनी औषधे, प्रोटिन पावडर यावरच अवलंबून राहू नये.

किशोर वयात शारीरिक देखभालीची जास्त गरज असते. कारण, शरीराची या वयात वाढ होत असते. प्रत्येक शरीराच्या विकासाची एक सामान्य गती असते. शारीरिक बदलांवर व्यवस्थितपणे लक्ष दिले तर वाढ योग्य प्रकारे होत आहे की नाही, याची माहिती नक्कीच समजू शकते. मुलांच्या प्रत्येक तपासणीच्या वेळी डॉक्टर उंचीदेखील तपासतात तसेच अलीकडे शाळांमधूनदेखील मुलांच्या शारीरिक वाढीच्या नोंदी प्रगतिपुस्तकावर केलेल्या असतात. अशा शारीरिक वाढीच्या आलेखावर वय आणि उंची या दोन्ही गोष्टी नोंदवल्या जात असतात. यामुळे उंचीचा पॅटर्न समजू शकतो.

मुलांची उंची किती वाढू शकते याचा अंदाज काढण्यासाठी एक सूत्र वापरता येऊ शकते. मुलींसाठी उंचीचा अंदाज काढायचा असल्यास वडिलांच्या उंचीमधून पाच इंच कमी करावे. त्यामध्ये आईची उंची अधिक करावी आणि आलेल्या संख्येला 2 ने भागावे. जी संख्या येईल तेवढी मुलीची उंची वाढू शकते. मुलांच्या उंचीचा अंदाज बांधण्यासाठी आईच्या उंचीमध्ये 5 इंच अधिक करावे त्यानंतर त्या संख्येमध्ये वडिलांची उंची अधिक करावी आणि आलेल्या संख्येला 2 ने भागावे. जी संख्या येईल त्या संख्येच्या आसपास मुलाची उंची असू शकेल. किशोरवयीन मुलांची उंची माता-पित्यांच्या गुणसूत्रांवर आधारित असते.

पण शारीरिक विकासादरम्यान वयाची विशिष्ट दोन वर्षे अतिशय वेगाने उंची वाढत असते. त्याची सुरुवात मुलगा आणि मुलगी यांच्यामध्ये वेगवेगळ्या वयात होत असते. मुलींमध्ये नऊ ते दहा वर्षांच्या वयात शारीरिक विकासाची सुरुवात होत जाते. हा विकास बाराव्या वर्षात सर्वोच्च स्थानी असतो. तर मुलांमध्ये 11 ते 12 वर्षांच्या वयापासून विकासाला सुरुवात होते. 13 व्या वर्षी हा विकास सर्वोच्च स्थानी असतो. या वर्षांत मुलांची उंची 5 इंच प्रतिवर्ष इतकी वाढू शकते. तर मुलींची प्रत्येक वर्षी तीन इंच उंची वाढू शकते. याच कारणामुळे सर्वसामान्यपणे पुरुष महिलांपेक्षा पाच इंच जास्त उंच असतात.

योग्य वयात पूर्ण शारीरिक विकास साध्य करण्यासाठी आरोग्यसंपन्न राहणे गरजेचे असते. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम आणि भरपूर झोप घेणे देखील तितकेच गरजेचे असते. परंतु, बहुतेक किशोरवयीन मुले याकडे दुर्लक्ष करतात. व्यायामामध्ये एरोबिक्स हा प्रकार हृदयासाठी आणि फुफ्फुसासाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो. सुरुवातीला किशोरवयीन मुले हा व्यायामप्रकार करण्यामध्ये खूप उत्साह दाखवतात, मात्र लवकरच त्यांचे लक्ष दुसरीकडे विचलित होते. या व्यायामाकडे दुर्लक्ष करून सुट्ट्यांमध्ये मित्रांबरोबर संगणकावर खेळ खेळण्यात वेळ घालवतात. यामुळे त्यांची उंची पुरेशा प्रमाणात वाढत नाही, मात्र वजन वाढते. बर्‍याच मुलांचे सुट्टीमध्ये वजन वाढल्याने कंबरेचा घेर वाढल्याचे दिसून येते. असे करणे त्यांच्या विकासासाठी मोठा अडथळा ठरू शकतो.

याचबरोबर बहुतेक किशोरवयीन मुले या वयामध्ये घरचे पौष्टिक जेवण खाणे टाळतात. त्याऐवजी जंकफूड खाणे पसंत करू लागतात. ही गोष्ट त्यांच्या नैसर्गिक वाढीसाठी अयोग्य असते. त्याच प्रमाणे या वयात उभे राहण्याची आणि बसण्याची स्थितीदेखील सुयोग्य असावी. पाठीचा कणा ताठ ठेवून चालण्याची आणि बसण्याची सवय ठेवावी. कारण, याचाही परिणाम उंची वाढण्यावर होत असतो. त्यामुळे सर्व बाजूंनी विचार करून उंची वाढवण्याचे प्रयत्न करावेत.

यामध्ये पालकांनीही योग्य ती काळजी घेतली पाहिजे. पौष्टिक आहार आणि व्यायाम यासाठी मुलांना प्रवृत्त केले पाहिजे आणि त्यासाठी त्यांना मदतही केली पाहिजे. बहुतेक पालक डॉक्टरांकडे उंची वाढण्यासाठी टॉनिक किंवा तत्सम औषधे मागतात. परंतु, पालकांनी औषधे, प्रोटिन पावडर यावर अवलंबून राहू नये. जी मुले कुपोषित किंवा अशक्त असतात त्या मुलांनाच याचा उपयोग होतो. कोणाच्याही सांगण्यावरून कुठलेही औषध मुलांना देऊ नये त्याऐवजी आपल्या शंकेचे निरसन करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अशा प्रकारे योग्य ते प्रयत्न करूनही पुरेशी उंची वाढत नसेल तर आपल्या उंचीबाबत मनात न्यूनगंड बाळगू नये. स्वतःमधील गुणांची ओळख करून घ्यावी आणि ते गुण विकसित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावे. त्यासाठी आपल्याकडे कुठल्या गोष्टीबाबतचे विशेष कौशल्य आहे याचे आत्मपरीक्षण करावे. खेळणे, नृत्य, कला किंवा अभ्यास यापैकी कशातही जास्त गती असेल तर त्या गुणांना विकसित करावे. आपल्याच द़ृष्टिकोनातून स्वतःला एका उंचीवर न्यावे. यामुळे आत्मविश्वास वाढतो. एक गोष्ट लक्षात ठेवावी की शारीरिक ठेवण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचे अंतिम सत्य नसते, तर उत्तम व्यक्तिमत्त्वासाठी आपल्यामधील अंगभूत कौशल्य, बुद्धिमत्ता, वागणं, बोलणं अशा किती तरी गोष्टी अत्यंत गरजेच्या असतात. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विकास आपण अवश्य केला पाहिजे.

– डॉ. प्राजक्ता पाटील

Back to top button