वाढत्या वयात विस्मृती का निर्माण होते? | पुढारी

वाढत्या वयात विस्मृती का निर्माण होते?

माणसाचा मेंदू रोजच्या जीवनात घडणार्‍या असंख्य गोष्टींची स्मृती साठवून ठेवत असतो. या स्मृती तीन प्रकारच्या असतात. ‘शॉर्ट टर्म मेमरी, लाँग टर्म मेमरी आणि एपीसोडीक मेमरी’. वाढत्या वयानुसार अनेक व्यक्तींना विस्मरणाची समस्या निर्माण होते. यामध्ये शॉर्ट टर्म मेमरीत काही कारणामुळे गडबड झाली तर नुकत्याच घडलेल्या काही गोष्टी चटकन आठवत नाहीत. ही प्रक्रिया वयानुसार स्वाभाविक असते, मात्र असे का होते हे जाणून घेतले तर या विस्मरणावर उपाय करण्याचे मार्ग सापडू शकतात.

वय वाढल्यानंतर म्हणजे साधारण साठी उलटल्यानंतर अनेक व्यक्तींना विस्मरणाची समस्या भेडसावू लागते. औषधाच्या गोळ्या घेतल्या की नाही यासारख्या छोट्या-छोट्या समस्या निर्माण होतात. वयोमानानुसार अशा प्रकारे विस्मरण होणे स्वाभाविक असते. परंतु, हे विस्मरण नेमके कशामुळे होते हे जाणून घेऊ.

मेंदूमध्ये असणार्‍या निरनिराळ्या स्थानांमध्ये त्याच्यापर्यंत पोहोचलेल्या सर्व गोष्टी स्मृतीच्या रूपात साठवून राहतात. त्यालाच शास्त्रीय भाषेत ‘मेमरी’ असे म्हणतात. आपल्या रोजच्या जीवनामध्ये दिसणार्‍या, कानावर ऐकू येणार्‍या आणि मुखातून प्रकट होणार्‍या गोष्टी, तसेच स्पर्शाने जाणवणार्‍या भावना, नाकाने येणारा गंध, जीभेद्वारे निर्माण होणारी चव अशा अनेक गोष्टींची जाणीव मेंदूकडे संदेश पाठविल्यामुळे आपल्याला होत असते. आपल्या पंचेंद्रियांकडून रोज प्राप्त होणार्‍या प्रत्येक गोष्टीची दखल मेंदू घेत असतो. या संदेशाची नोंद मेंदूमध्ये होत जाते. हे सर्व संदेश एकत्र केले जातात आणि मेंदूच्या विशिष्ट जागी साठवून ठेवले जातात.

हे साठवलेले संदेश हवे त्यावेळी पुन्हा वापरण्याचे काम मनुष्य करत असतो. येणारा प्रत्येक संदेश साठवणे हे मेंदूचे काम असते. त्यामुळे एकाचवेळी असंख्य गोष्टींचा मारा झाल्यामुळे मेंदूमध्ये एक प्रकारचा गुंता निर्माण होण्याची शक्यता असू शकते. म्हणूनच हा गुंता टाळण्यासाठी मेंदूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारचे संदेश साठवून ठेवण्याची प्रक्रिया घडत असते. मेंदूकडे प्राप्त होणार्‍या सर्व संदेशांची साठवणूक करणे तितकेसे गरजेचे नसते. म्हणून या संदेशाद्वारे येणार्‍या असंख्य गोष्टींपैकी काही महत्वाच्या निवडक गोष्टीच मेंदूच्या वेगवेगळ्या भागात साठवून ठेवल्या जातात आणि गरज नसलेल्या गोष्टी विचारातच घेतल्या जात नाहीत. म्हणजे त्या गोष्टी साठवून ठेवल्या जात नाहीत.

मेंदूमध्ये काही गोष्टी तात्पुरत्या स्वरूपात साठवून ठेवण्याची क्रिया सुरू ठेवण्यासाठी सोय असते. वैद्यकीय भाषेत या प्रक्रियेला ‘वर्किंग मेमरी’ अथवा ‘शॉर्टटर्म मेमरी’ असतात. आपल्या रोजच्या कामकाजामध्ये मेंदूमध्ये कार्य करत असणारी स्मृती म्हणजेच कार्यकारी स्मृती. हिच वर्किंग मेमरी होय. प्रत्येक क्षणाला खरं तर मेंदूकडे असंख्य प्रकारचे संदेश येत असतात. पण त्यापैकी अति महत्त्वाचे संदेश मेंदूमध्ये साठवले जातात. बाकीचे किरकोळ संदेश साठवले जात नाहीत. म्हणून कालांतराने ते पुसले जातात. काही वेळेपूर्वी भेटलेली व्यक्ती, तिच्याशी बोललेल्या गोष्टी, तिचा चेहरा आणि व्यक्तिमत्त्व इत्यादी गोष्टी आपल्याला आठवतात त्या वर्किंग मेमरीमुळे. या प्रकारात साठवली जाणारी स्मृती प्रत्येकवेळी बदलत जात असते. प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे आठवली गेली तर आपली स्मृती योग्य पद्धतीने काम करत आहे, असे समजावे.

आपल्या आयुष्यात सभोवताली अनेक घटना घडत असतात. पण या अनेक घटनांपैकी काही महत्त्वाच्या घटना आपल्या पूर्णपणे लक्षात राहतात. कारण त्या कायम स्मृतीत साठवल्या गेलेल्या असतात. यापैकी एखाद्या घटनेचा छोटासा भाग आठवला तरी कित्येक वर्षांपूर्वी घडून गेलेली ती घटना जशीच्या तशी संपूर्णपणे आठवते. कारण त्या घटनेचा आपल्या मेेंदूवर कायमस्वरूपी परिणाम झालेला असतो आणि मेंदूच्या ठराविक भागात ती घटना व्यवस्थितपणे साठवलेली असते. म्हणूनच कालांतराने ज्या-ज्यावेळी त्या आठवणींला उजाळा मिळतो. त्या प्रत्येकवेळी संबंधित घटना नुकतीच घडल्यासारखी थेट आठवते. या स्मृतीला ‘लाँग टर्म मेमरी’ अथवा ‘रिमोट मेमरी’ असे म्हणतात. या स्मृतीमध्ये साठवलेली घटना कित्येक वर्षे आपल्या लक्षात राहते. मात्र वर्किंग मेमरीमध्ये नोंदवल्या जाणार्‍या घटनांचे असे नसते. त्या घटना अगदी कमी काळासाठी नोंदवल्या जाऊन नंतर आपोआपच मेमरीमधून काढून टाकल्या जातात.

वयानुसार मेंदूच्या वर्किंग मेमरीचे काम करणार्‍या पेशी कमकुवत होऊ लागतात. याचाच परिणाम म्हणजे नुकतीच घडलेली गोष्ट लक्षात राहीलच याची शाश्वती देता येत नाही. त्याच तुलनेत लाँग टर्म मेमरीमध्ये साठवलेल्या घटना मात्र कोणत्याही वेळेस अगदी स्पष्टपणे आठवू शकतात. काही वेळा एखादी घटना आठवण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारावे लागतात. उदा. ती घटना कधी घडली, कुठे घडली, कशी घडली या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. उत्तरे मिळू लागतात तसे घटना व्यवस्थित आठवू लागते. या घटना काही मिनिटांपूर्वीच्या असू शकतात किंवा काही ठराविक काळापर्यंतच्या असू शकतात. या प्रकारच्या स्मृतींना एपीसोडीक मेमरी असे म्हणतात.

ही स्मृती व्यवस्थितपणे काम करत आहे की नाही हे तपासण्यासाठी एक अगदी सोपा उपाय म्हणजे कालच्या दिवसभरात आपण काय केले हे आठवावे. सकाळी काय, रात्री काय जेवलो, कोण व्यक्ती आपल्याला भेटल्या, त्यांच्याशी काय बोलणे झाले, यासारख्या प्रश्नांची उत्तरे बरोबर मिळाली म्हणजे आपली एपोसोडीक मेमरी व्यवस्थित काम करत आहे, असे समजावे.

मेंदूची रचना समजून घेताना त्याचे डावा आणि उजवा असे दोन भाग असतात हे लक्षात घ्यावे. शरीराच्या उजव्या भागावर नियंत्रण ठेवण्यासाठी डावा मेंदू काम करत असतो. तर डाव्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे काम उजवा मेंदू करत असतो. या दोन्ही भागांना जोडणारा असंख्य पेशींचा एक जाडसर भाग असतो. प्रत्येक घटना साठवणूक ठेवण्यासाठी दोन्ही भागांना कार्यरत रहावे लागते. संदेश वाहनाचे मुख्य काम मधल्या भागाकडे असते. संदेशांची देवाण घेवाण करण्यासाठी काही रसायन मेंदूमध्ये तयार होत असतात. मेंदूला असणार्‍या घड्या, त्यावर असणारे आवरण आणि मेंदूमध्ये तयार होणारी रसायने यावर मेंदूची कार्यक्षमता अवलंबून असते. ज्या व्यक्तीच्या मेंदूची ही कार्यक्षमता उत्तम असते ती व्यक्ती तल्लख बुद्धीची आहे, असे आपण म्हणतो.

वाढत्या वयानुसार मेंदूवर असणार्‍या घड्या अथवा वळ्या यांचे प्रमाण कमी होत जाते. तसेच मेंदूवर असणारे आवरणही पातळ होत जाते. त्यामुळे मेंदूमधील पेशी हळूहळू कमकुवत होत जातात. या कमकुवत पेशींमार्फत तयार झालेली रसायने तितकीशी दर्जेदार नसतात. म्हणूनच मेंदूमार्फत दिल्या जाणार्‍या संदेश कार्यात बरेच अडथळे येतात आणि त्याचा परिणाम आपल्या दैनंदिन वागणुकीत उमटतो. काही छोट्या-छोट्या घटना चटकन आठवत नाहीत. अशा विसराळूपणावर मात करण्यासाठी तज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. त्यांच्या मार्गदर्शनाद्वारे आपली स्मृती शाबुत ठेवण्यास नक्कीच उपयोग होऊ शकतो.

– डॉ. अतुल कोकाटे

Back to top button