शरीर खालावणारा ‘राजयक्ष्मा’ आणि आयुर्वेद उपचार | पुढारी

शरीर खालावणारा ‘राजयक्ष्मा’ आणि आयुर्वेद उपचार

डॉ. आनंद ओक

आपल्या शरीर क्षमतेपेक्षा अधिक काम सतत कष्ट व अति प्रवास, अति जागरण तसेच पोषक आहार न घेता अति प्रमाणात मैथुन करणे, अति प्रमाणात दीर्घकाळ हस्तमैथुन करणे यामुळे प्रमाणापेक्षा जास्त शुक्र क्षय झाल्यास राजयक्ष्मा होऊ शकतो. एच.आय.व्ही, ट्युबरकिलॉसीस या जंतुसंसर्गामुळेदेखील राजयक्ष्मा हा विकार होतो.

आयुर्वेद या शास्त्रात काही रोगांचे वैशिष्ट्यपूर्ण वर्णन आहे अशा काही विशेष विकारांपैकी आयुर्वेदात वर्णीलेला हा विकार म्हणजे ‘राजयक्ष्मा’।

संबंधित बातम्या

राजयक्ष्मा म्हणजे काय? 

सर्व रोगांमध्ये गंभीर स्वरूपाचा, चिकित्सेला अवघड असणारा त्यामुळे याला सर्व रोगांचा किंवा राजयक्ष्मा असे म्हटले जाते. या रोगात शरीरातील सर्व धातूंचा शोष (झीज) होत असल्याने याला शोष किंवा क्षयरोग असे देखील म्हणतात. नक्षत्रांचा राजा म्हणजेच चंद्र त्याला झालेला रोग म्हणून राजयक्ष्मा व उपद्रव्य देखील अनेक असतात. या रोगात कणाकणाने म्हणजेच हळूहळू प्रतिदिन माणूस क्षीण होत जातो. तब्येत खालावत जाते. शरीर रूक्ष, तेजोहीन, कांतिहीन होत जाते. 

राजयक्ष्माची कारणे:-

या विकाराची अनेक कारणे असतात. तसेच ती प्रत्येक व्यक्‍ती भिन्‍न स्वरूपाची व कमी-अधिक प्रमाणात असू शकतात. स्वभावत: कृश असणार्‍या व्यक्‍तीने रूक्ष पोषकांश कमी असणारे अन्‍न घेणे, कोणत्याही कारणाने कमी आहार घेणे किंवा वारंवार उपवास करणे, वेळच्यावेळी न जेवणे, कोणत्याही स्वरूपाची मानसिक चिंता काळजी दडपण, दु:ख इत्यादीमुळे आहार नीट न घेणे, शरीरातून अति रक्‍तस्त्राव, तीव्र दमा, कोलायटीस, कॅन्सर इत्यादी जीर्ण व्याधी शरीराला होणे, याबरोबरच कॅन्सरसारख्या विकारात दिल्या जाणार्‍या काही रासायनिक औषधांचा दुष्परिणामामुळे शरीर प्रवृत्ती खालावते. आपल्या शरीर क्षमतेपेक्षा अधिक काम सतत कष्ट व अति प्रवास, अति जागरण तसेच पोषक आहार न घेता अति प्रमाणात मैथुन करणे, अति प्रमाणात दीर्घकाळ हस्तमैथुन करणे यामुळे प्रमाणापेक्षा जास्त शुक्र क्षय झाल्यास राजयक्ष्मा होऊ शकतो. एच.आय.व्ही, ट्युबरकिलॉसीस या जंतुसंसर्गामुळे देखील राजयक्ष्मा हा विकार होतो. या जंतूंचा संसर्ग झाल्यास आणि त्या वेळी शरीराची रोग प्रतिकार शक्‍ती कमी झाली असेल म्हणजेच असा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीने शरीर बल मनोबल व पचनशक्‍ती कमी झाली असेल तर संसर्गानंतर राजयक्ष्मा ही अवस्था येते. एडस्ट या विकारास राजयक्ष्मा म्हणता येते.

राजयक्ष्माचे प्रकार:-

वरील कारणांनी अग्निमांद्य उत्पन्‍न होऊन रसधातूपासून रक्‍त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या क्रमाने धातूचा क्षय होत जातो यास अनुलोम राजयक्ष्मा असे म्हणतात. तर अति स्त्री संबंध अति हस्तमैथुन या प्रकारात पहिल्यांदा शुक्र धातूंचा क्षय होतो व त्यानंतर उलट्या गतीने  इतर धातूचा क्षय होतो व प्रकृती खालावते यास प्रतिलोम राजयक्ष्मा असे म्हणतात. राजयक्ष्माची पूर्व लक्षणे:- राजयक्ष्मा हा खूपच गंभीर विकार असल्याने तो आधीच होण्यापूर्वीच लक्षात येण्यासाठी ही लक्षणे प्रत्येकास माहिती असणे गरजेचे आहे असे मला वाटते. वारंवार सर्दी, शिंका, तोंडाला पाणी सुटणे, भूक कमी होणे, अंग दुखणे,अंग गळून जाणे, भोजनाचे पदार्थ स्वच्छ असूनही काही घाण आहे अशी शंका येते, मळमळणे उलटी होणे, चव नसणे, भरपूर खाऊनही तब्येत न सुधारणे, वारंवार मद्यपान व मांस खावे वाटणे, उगीचच  किळस येणे, केस व नखे अधिक वाढणे. स्वभाव निष्ठूर सौजन्यहीन होणे, डोळ्याला पांढरटपणा येणे मैथुनाची इच्छा अधिक वाढणे ही पूर्व लक्षणे कमी-अधिक स्वरूपात जाणवतात. विचित्र अशी रूक्ष, भीतीदायक स्वप्न पडणे ही लक्षणे काहींना जाणवते.

राजयक्ष्माची लक्षणे:-

बरकड्या, पाठ यामध्ये वेदना होणे, हातापयाची आग होणे, दुपारी व अधिक प्रमाणात ताप येणे, खाण्यावर इच्छा होत नाही, खोकला काही वेळा बडका तर काही वेळा कोरडी ढास, काही वेळा बडक्यास रक्‍त पडणे, सगळ्या अंगाची आग, डोके जड होणे, तर काही जणात याबरोबर उलट्या होणे, मळमळणे, आवाज खोल जाणे, आवाज बसणे, ही लक्षणे कमी-अधिक प्रमाणात जाणवतात. या सर्वांबरोबर तीव्र अशक्‍तपणा, प्रकृती खालावणे, वजन कमी होत जाणे, शरीर झिजत जाणे हे प्रमुख लक्षण असतेच.

यावर व्यवस्थित उपचार न झाल्यास अंगदुखी, बडका पडणे, मुख दुर्गंधी, धाप लागणे, चिडचिड होणे, चक्‍कर येणे, इ. उपद्रव्य होतात. आजच्या काळात टी.बी. या विकारात तसेच एच.आय.व्ही संसर्ग झालेल्या रुग्णात वरील लक्षणे आढळतात.

राजयक्ष्मावरील उपचार :-

रुग्णाचे वय, व्यवसाय, आजार किती दिवसांपासून झाला आहे तो कोणत्या अवस्थेमध्ये आहे? तक्रारीचे स्वरूप शरीरबल या गोष्टीचा सातत्याने विचार करून उपचार सुरू केले जातात.

बाह्य उपचार :- चंदन, बला, शतावरी, अश्‍वगंधा इत्यादी औषधांनी सिद्ध केलेले “बलवर्धक” तेलाने सर्वांग अंगाला रोज मसाज करावा व त्यानंतर गरम पाण्याची अंघोळ करावी. शरीर बल खूपच कमी झालेली असल्यास ‘बृहणबस्तीचा ’ वापर केला जातो. ब्राह्मी अश्‍वगंधा, माका, इ. शुद्ध तेलाने रात्री झोपताना डोळ्याला मसाज केल्याने मन:शांती होते. शांत झोप लागते.

औषधी उपचार:-

अग्‍निदिपन करणे, धात्वाग्निमांद्य दूर करणे, आणि धातूंचे बल वाढविणे या द‍ृष्टिकोनातून औषधी दिल्या जातात. यासाठी सुंठ, मिरी, पिंपळी, कोरफड, द्राक्षा, आवळा, भुई आवळा, लिंबू, शतावरी, अश्‍वगंधा बला, अति बला, जेष्ठमध, कोहाळा, वंश भृंगराज,आडूळसा इत्सादी वनस्पतीज औषधे आणि अभ्रक भस्म, मौक्‍तिक भस्म, शृंगभस्म, अजास्ति भस्म, कलारवापरी या भस्माच्या पासून त्यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेली संयुक्‍त औषधे वापरली जातात.

टी.बी, एच.आय.व्ही, कॅन्सरची गंभीर अवस्था या सारख्या विकारात राजयक्ष्माची लक्षणे आढळतात. यावर वेगवेगळे उपचार लोक घेत असतात. यातील काही रासायनिक औषधामुळे काही रुग्णात पोटात जळजळ, मळमळ, उलटी, तोंड येणे, अंगाची आग, लिव्हर कमकुवत होणे, यासारख्या तक्रारी जाणवत असतात. अशा वेळी रासायनिक औषधांचे दुष्परिणाम दूर करण्यासाठी लिव्हरचे रक्षण करण्यासाठी या औषधांच्या जोडीला वरील पद्धतीने शास्त्रीय आयुर्वेद उपचार सुरू केल्यास खूपच फायदा होतो.

आहार विहार:-

राजयक्ष्मा झालेल्या शरीर प्रकृती खालावलेल्या रुग्णाने नेहमी आपल्या पचन शक्‍तीप्रमाणे तूप, भात, फुलका, दूध,लोणी, चिकू, द्राक्षे, डाळिंब, आंबा बदाम, आक्रोड, पिस्ता, मनुका, चारोळी, डिंक लाडू, मुगाचा लाडू, खीर या गोष्टी नियमित आहारात ठेवाव्यात. अनेक जण मोठा आजार झाल्याने मांसाहार सोडून देतात असे न करता मटण, चिकन, खिमा, बिर्याणी या पदार्थंचा आवर्जून आहारात समावेश करणे उपयोगी आहे. या विकारासाठी आयुर्वेदाने मांसाहार वर्ज्य सांगितलेला नाही तर उलट उपयोगी म्हणून सांगितला आहे. कारणात सांगितलेले पदार्थ वर्ज्य करावे. विश्रांती, चिंता न करणे, निश्‍चिंत रहाणे, अल्पसा व्यायाम, प्राणायम, योगासने करणे, लवकर बरे होण्यासाठी असते.

“राजयक्ष्मा जाणवू लागल्यास घाबरू नका!”

शरीर प्रकृती खालावू लागली असल्यास राजयक्ष्मा जाणवू लागल्यास घाबरून न जाता आयुर्वेद तज्ज्ञाच्या सल्ल्याने शास्त्रीय आयुर्वेद उपचारांचा अवलंब करून सुद‍ृढ प्राप्‍त करावे.

Back to top button