दवाखान्याच्या दारातून… : गुंतवणूक | पुढारी | पुढारी

दवाखान्याच्या दारातून... : गुंतवणूक | पुढारी

त्या  काकू बरीच वर्षे माझ्याकडे पेशंट म्हणून येतात. आमचा चांगलाच घरोबा असल्यामुळे त्यांच्या घरी माझं येणं-जाणंही होतं. त्यांची दोन्ही मुलं ऑस्टे्रलियात असतात. वर्षातून एकदा येतात, तेव्हा महिना कोणताही असो, काकूंकडे मात्र दिवाळी असते.

मी बघितल होतं, की काका घरात काहीच काम करायचे नाहीत. काकू सगळं अगदी त्यांच्या हातात आणून द्यायच्या. अंघोळीला जाताना टॉवेल, ऑफिसला जाताना डबा, घरी आल्यावर चहाचा कप..! वास्तवीक, काकूंना डायबिटीस होता. शिवाय, त्याही नोकरी करायच्या, घरचं, बाहेरचं सगळं एकट्या बघायच्या; पण काकूंची याबद्दल कधी तक्रार नसायची.घरचं झालं थोडं, म्हणून बिल्डिंगमध्येही इतरांना मदत करायच्या. कोणाचा बाळंतविडा करून दे, कोणी आजारी असेल तर त्यांना जेवण करून दे, लोकांची मुलं शाळेतून घरी आली, की त्यांची आई येईपर्यंत त्यांना स्वतःच्या घरी नेऊन चहापाणी दे, ही कामं काकू अगदी स्वखुशीने करायच्या.

काकू एकदा ब्लडप्रेशर तपासायला क्‍लिनिकमध्ये आल्या होत्या. तेव्हा मी त्यांना विचारलं ‘काकू, अहो किती धावपळ होते तुमची आणि तरीपण तुम्ही काकांना प्रत्येक गोष्ट हातात नेऊन देता. खरं तर तुम्हीही नोकरी करता. तुम्हाला ऑफिस आणि घर अशी दुहेरी जबाबदारी सांभाळावी लागते. एवढं असूनही काका तुम्हाला अजिबात मदत करत नाहीत का?’

संबंधित बातम्या

काकू हसल्या आणि म्हणाल्या,

‘अगं यांना ना सवयच नाही अजिबात कामाची. म्हणून मीच पटपट करू लागते सगळी कामं. आणि खरं सांगू का? मला कामात बिझी राहायला आवडतं. रिकामी बसले ना, की मुलांची आठवण येते. म्हातारपणात आमचं कसं होईल, असे विचार येत राहतात आणि कोणी तरी आपल्यावर आवलंबून आहे, कोणाला तरी आपली गरज आहे, ही भावनाच मला जगण्याचं नवीन बळ देते.’

‘अगं फक्‍त घरातच नाही तर नातेवाईक, शेजारीपाजारी वगैरे सगळ्यांनाचा मी मदत करते. ही माझी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे असं समज,’ काकू हसत हसत म्हणाल्या होेत्या. 

या गोष्टीला दहा वर्षे तरी झाली असतील. आता काकू आणि काका दोघंही रिटायर झाले आहेत.

मध्यंतरी मी 2 दिवस नव्हते, नेमकं तेव्हाच काकू पडल्या, फॅ्रक्‍चर वगैरे काही झालं नाही; पण पाय चांगलाच मुरगळला होता आणि खूप सुजला होता. मला समजलं तेव्हा मी त्यांना बघायला गेले आणि समोरचं दृश्य बघून चकित झाले. 

काकू झोपून होत्या आणि चक्‍क काका किचनमध्ये चहा करत होते. एक शेजारची बाई काकूंसाठी आणि काकांसाठी दुपारंच जेवण घेऊन आली होती. काकांनी काकूंना उठून बसवलं आणि चहा पाजला. ती शेजारीण दुपारचं जेवण देऊन बहुतेक ऑफिसला गेली असावी. जाताना ‘काकूंना दुपारी जेवण गरम करून वाढा’ म्हणून सांगायला विसरली नाही, इतक्यात एक तरुण मुलगा काकांनी दिलेली औषधाची चिठ्ठी आणि औषधे घेऊन आला. त्यालाही कॉलेजला जायचं असणार; पण जाताना ‘काही लागलं तर मला फोन करा आजोबा, म्हणजे कॉलेजमधून येतानाच मी घेऊन येईन,’ असं सांगून निघून गेला.

मी काकूंना म्हटलं ‘काका आणि किचनमध्ये? हे तर जगातलं आठवं आश्‍चर्य आहे.’

काकू म्हणाल्या, ‘माझी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटचे’ फायदे मला मिळायला लागले बघ. रिटायरमेंटनंतर मी त्यांना थोडंथोडं जेवण शिकवलं. आता मात्र त्यांनी माझ्यावर अवलंबून राहून नये, असं मला वाटतं. आता दोघांचीही वयं झाली आहेत. मी आधी गेले तर यांचं काही अडायला नको माझ्यावाचून. त्यांनाही जाणीव झाली आहे याची. मी पूर्वी बाळंतविडे करून दिले, त्या सुना आता जाणत्या गृहिणी झाल्या आहेत. ज्या मुलांना मांडीवर बसवून खाऊपिऊ घातलं, ती मुलं आता कॉलेजात जायला लागली; पण सर्वांनी आमची जाण ठेवली. शेवटी गरजेला शेजारीच तर आधी पोचणार. मुलं फार उशिरा पोचणार, उरलेलं आयुष्य असंच जोडीदाराच्या संगतीने मजेत घालवायचं. पुढचं कोणी बघितलं आहे?’

काकूंनी केलेली कष्टाची गुंतवणूक आणि त्यातून मिळालेल्या आनंदाचं फळ याची मी साक्षीदार होते. 

हर पल में प्यार है। हर पल में खुशी। खोदो तो यादें है। जी लो तो जिंदगी॥

Back to top button