वासंतिक वमन : उत्सव शरीरशुद्धीचा | पुढारी

वासंतिक वमन : उत्सव शरीरशुद्धीचा

वैद्य दिलखुश तांबोळी

हजारो वर्षांपूर्वी भारतीय वैद्यकशास्त्राचा सिद्धान्त अतिप्रगत अशा प्रकारचे होते. आयुर्वेदामध्ये वर्णन केलेला किंवा आपल्या आयुर्वेदीय ऋषीमुनींनी सांगितलेला एक ही सिद्धान्त आजच्या या प्रगत युगात खोटा ठरलेला नाही किंवा त्याला काळानुसार बदलता आला नाही, म्हणूनच आयुर्वेदाला शाश्‍वत शास्त्र म्हटले आहे. असे हे शाश्‍वत आयुर्वेदशास्त्र भारतीयांनी संपूर्ण जगाला दिले याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान असला पाहिजे.

आयुर्वेदशास्त्र हे मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत कसे राहावे, कोणती काळजी घ्यावी, जेणेकरून कोणताही आजार उत्पन्‍न होणार नाही. शरीर निरोगी राहील तसेेच उच्च दर्जाचे जीवनमान कसे राहील याबद्दल मार्गदर्शन करणारे, तसेच जर कोणता आजार निर्माण झालाच तर त्यापासून लवकरात लवकर कसे बरे होता येईल याबद्दलचे मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे. म्हणून आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन हे – 

स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम्ं 

 आतुरस्य विकार प्रशमनम् च ॥      
      

– आचार्य चरक

म्हणजे जी व्यक्‍ती स्वस्थ म्हणजे निरोगी आहे, तिला कोणताही आजार होऊ नये, यासाठी प्रयत्नशील राहून तिच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे व दुसरे प्रयोजन निर्माण झालेल्या आजारांचे शमन करणे.

मानवी शरीरामध्ये असलेल्या वात, पित्त, कफ हे तीन दोष शरीर निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात. शरीरात चालणार्‍या संपूर्ण क्रिया हे वात, पित्त, कफ हे तीन दोष नियंत्रित करत असतात आणि हेच दोष विकृत प्रमाणात शरीरात वाढले, तर आजार निर्माण करतात. आयुर्वेदामध्ये या तीन दोषांना योग्य प्रमाणात शरीरात ठेवण्याकरिता वेगवेगळ्या गोष्टी करावयास सांगितल्या आहेत.

सर्वप्रथम हे दोष शरीरात वाढतात कसे ते पाहू?

आपण जो रोज आहार घेतो त्या आहारात जे वेगवेगळे पदार्थ असतात, त्यांच्या गुणधर्मांनुसार हे दोष शरीरात वाढतात. 

उदाहरणार्थ 

1. दही, दूध, दुधाचे पदार्थ, केळी, पेरू इ.पदार्थ शरीरामध्ये कफ दोष वाढवतात.

2. सर्व मसाल्यांचे पदार्थ, लोणचे, पापड, जास्त आंबट किंवा ईडली, डोसा यासारखे आंबवलेले पदार्थ, कुरकुरे, वेफर्स यासारखे खारवलेले पदार्थ शरीरामध्ये पित्तदोष वाढवतात.

3. मटार, हरभरा, सर्व कडधान्ये, बटाटा, वांगी इ. पदार्थ शरीरामध्ये वात दोष वाढवतात.

बर्‍याच वेळा असे पदार्थ आवडतात म्हणून सतत अतिप्रमाणात खाल्ले जातात व त्यामुळे शरीरातील दोष वाढतात. एका विशिष्ट प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात हे दोष वाढले की, ते शरीरामध्ये आजार निर्माण करतात.

उदा. सतत व अतिप्रमाणात दही खाल्ल्यानंतर शरीरातील कफ हळूहळू वाढून नंतर सर्दी, दमा यासारखे आजार निर्माण होतात.

या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आयुर्वेद पथ्याला अधिक महत्त्व देते व पथ्यासोबत शरीरात वाढलेले दोष बाहेर काढण्याकरिता वेगवेगळ्या दोषांसाठी वेगवेगळ्या शरीरशुद्धीच्या प्रक्रिया आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत. त्यालाच पंचकर्म असे म्हणतात.

या महत्त्वाच्या पाच कर्मांपैकी एक कर्म म्हणजे वमन होय. वमन म्हणजे शास्त्रोक्‍त पद्धतीने दिलेले उलटीचे औषध होय. ज्यावेळी एखादा आजार त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने केव्हाही हे कर्म करता येते; परंतु कोणताही आजार नसणार्‍या निरोगी व्यक्‍तीने हा उपाय वसंत ऋतूत करून घ्यावा. वसंतऋतूत हा उपक्रम केला जातो. म्हणून याला ‘वासंतिक वमन’ असे म्हणतात.

वेगवेगळ्या दोषांनुसार वमन, विरेचन, बस्ति, नस्य व रक्‍तमोक्षण ही जी पंचकर्मे सांगितली आहेत, ती वेगवेगळ्या ऋतूंमध्ये करावयाची असतात.

आयुर्वेदाने निरोगी व्यक्‍ती कशी असावी, याची व्याख्या पुढीलप्रमाणे दिली आहे.

समदोषः समाग्‍निश्‍च समधातु मलक्रियः 

प्रसन्‍नआत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधियते ॥

शरीरातील वात, पित्त, कफ हे दोष समप्रमाणात म्हणजे विकृत प्रमाणात वाढलेले नसावेत. आपण खाल्लेला आहार पचवणारी शक्‍ती म्हणजे अग्‍नी होय. ती योग्यरीत्या कार्यरत असावी. त्याचप्रमाणे शरीराला धारण करणारे रस, रक्‍त, मांसादी धातूही योग्य प्रमाणात असले पाहिजेत. याशिवाय शरीरामध्ये आहारपचन होत असताना जो मल तयार होतो, तो मल – पुरीष, मूत्र, घाम यांच विशिष्ट वेळेपर्यंत शरीरामध्ये थांबणे, तसेच विशिष्ट वेळेनंतर शरीराबाहेर जाणे या क्रिया योग्य होत असाव्यात. या शारीरिक स्तरांवरील क्रियांच्या सोबत मानसिक स्तरावरदेखील काही बदल अपेक्षित ते म्हणजे – आत्मा, मन व आपली इंद्रिये ही प्रसन्‍न असली पाहिजेत. या सर्व गोष्टी ज्या व्यक्‍तीमध्ये असतात, त्या व्यक्‍तीला स्वस्थ किंवा निरोगी म्हणतात.

आपल्या भारतीय परंपरेमध्ये वेगवेगळे उत्सव, सण साजरे केले जातात. या सणांची योजना रोजच्या जीवनात असणार्‍या अडचणी चिंता यांच्यावर मात करून मानसिक स्तरावर आत्मा, मन, इंद्रिये प्रसन्‍न ठेवण्याकरिता केलेली आहे. आपला प्रत्येक सण हा मनाला आनंद देणारा, मनाला प्रसन्‍न करणारा असाच आहे. याचबरोबर या सणांच्या जोडीला त्या ऋतूमध्ये पथ्यकर आहार कसा पोटात जाईल, याची योजना केली आहे.

उदा. थंडीतील जास्त लागणारी भूक, वातावरणातील कोरडेपणा, यावर मात करण्यासाठी पचायला जड असा दिवाळीचा फराळ, सर्वांग अभ्यंग करणे किंवा मकर संक्रांतीला खाण्यात येणारे तिळगूळ किंवा शरद ऋतूतील वाढलेले पित्त कमी करण्यासाठी कोजागरीला पिण्यात येणारे दूध या प्रत्येक गोष्टीत शरीराचे आरोग्य टिकवण्यासाठी प्रयत्न केलेला दिसतो.

जसे निरोगी शरीराला टिकवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी मन, इंद्रिय व आत्मा प्रसन्‍नतेसाठी उत्सव तसेच शरीरात दोष वाढू नयेत म्हणून या सणांच्या दिवशी पथ्यकर आहार घेणे सांगितले आहे. तसेच शरीरात वाढलेल्या दोषांना बाहेर काढून शरीर निरोगी ठेवण्यासाठीचेदेखील उत्सव सांगितले आहेत. दुर्दैवाने या उत्सवात कमी लोक सहभागी होतात आणि म्हणूनच आजकाल आजारांची संख्या व आजारी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. आणि शरीरशुद्धीच्या या उत्सवालाच आयुर्वेद ऋतूनुसार केले जाणारे पंचकर्म उपचार किंवा शोधन उपचार म्हणतात.

आपण सर्वच आपल्या घरात रोज स्वच्छता करत असतो. घर झाडणे, पुसणे या गोष्टी घर स्वच्छ ठेवण्यासाठी जरी करत असलो, तरी दसरा-दिवाळी आली की, आपण संपूर्ण घरातील साहित्य बाजूला करून/बाहेर काढून साहित्य, भांडी तसेच घर स्वच्छ करतो. यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, रोज घरात स्वच्छता करूनही दसरा, दिवाळी स्वच्छतेवेळी खूप कचरा निघतो. आपल्या शरीराचेदेखील असेच आहे. आपण रोज कितीही पथ्य पाळले तरी शरीरामध्ये काही अंशी दोष शरीरात साठत राहतात. आणि हे साठलेले दोष बाहेर काढण्यासाठीच शास्त्रकार दरवर्षी शरीर शुद्धीची पंचकर्मे करून घ्यावीत, असा निर्देश देतात.

या महत्त्वाच्या पाच कर्मांपैकी किंवा शरीरशुद्धीच्या उपक्रमांपैकी वमन या कर्माची माहिती आपण पाहणार आहोत.

वमन कर्म म्हणजे काय?

वमन म्हणजे आयुर्वेदात सांगितलेल्या पद्धतीनुसार दिली जाणारी उलटी. हा उलटीचा प्रकार उपचाराकरिता दिला जातो. व्यवहारात ज्याला आपण उलटी झाली म्हणतो, त्यात औषध वापरलेले नसते. त्या आजाराला छर्दी म्हणतात. यामध्ये केवळ जठरातील दोष बाहेर पडतात, तर वमन या प्रक्रियेमुळे संपूर्ण शरीरातील दोष बाहेर पडतात.

वमन कोणी करावे? निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने करावे. खालील आजारांमध्ये ज्या व्यक्‍तीला कफाचे आजार, पित्ताचे आजार, जुनी डोकेदुखी, दमा, आम्लपित्त, नेहमी मळमळ होणे, छातीत जळजळ होणे, जुनी सर्दी, सायनुसायटिस, नेहमी डोके जड असणे, घशात चिकट कफ असणे, नेहमी छातीत कफ साठणे, तोंडाला दुर्गंधी येणे, घशाशी नेहमी आंबट पाणी येणे, सर्व प्रकारचे त्वचाविकार, अंगावर गांध्या उठणे, सोरायसिस, लघवी किंवा शौचाच्या मार्गातून रक्‍त जात असल्यास, संपूर्ण अंगाला खाज असल्यास, अंगावर वेगवेगळ्या प्रकारच्या गाठी निर्माण झाल्यास, मधुमेहामध्ये कफदोषाचे प्राधान्य असल्यास अंगावर उठणारी नागीण, बाळाला पाजणार्‍या आईच्या दुधात काही दोष निर्माण झाला असल्यास, मूल न होणार्‍या स्त्री-पुरुष दोघांनाही, थायरॉईड आजारामध्ये, हृदयाच्या काही आजारांमध्ये, जुनाट न भरणार्‍या जखमा, मधुमेहाच्या जखमा झाल्या आहेत अशा सर्व कफाच्या व पित्ताच्या आजारांमधील रुग्णांनी वमन करून घ्यावे.

वमन कोणी करू नये?

लहान मुलांनी, वृद्धांनी, ज्यांना अशक्‍तपणा आहे, अंगात ताप आहे, गर्भवती महिला, पोटात पाणी असणे, अशा व्यक्‍तींनी वमन घेऊ नये.

वमनाचा काळ 

ज्यावेळी शरीरामध्ये दोष प्रमाणापेक्षा अधिक वाढतात, त्याच वेळी आजार निर्माण होतो. त्यामुळे आजारी व्यक्‍तींना वैद्यांच्या सल्ल्याने केव्हाही वमन घेता येते. पावसाळा सोडून कोणताही आजार नसताना, निरोगी व्यक्‍तीला जर वमन घ्यावयाचे असल्यास ते वसंत ऋतूमध्येच घ्यावे.

वसंत ऋतूमध्ये निरोगी व्यक्‍तीने वमन का घ्यावे?

रुग्ण शरीरामध्ये शारीरिक दोष शरीराच्या बाहेर काढण्याइतपत विकृत प्रमाणात वाढलेले असतात; परंतु निरोगी शरीरात दोषांची तशी स्थिती नसते. थंडी संपल्यानंतर कडक ऊन पडू लागते व वसंत ऋतूचे आगमन होते. वसंत ऋतूच्या उन्हामुळे हिवाळ्यात शरीरामध्ये घट्ट झालेला कफ उन्हामुळे वितळू लागतो व शरीरात कफाचे प्रमाण वाढते. आपणास हे माहिती आहे की वमन ही शरीरातील कफदोषाला बाहेर काढणारी चिकित्सा आहे व वसंतामध्ये पातळ झालेला कफ बाहेर पडताना शरीराला कोणताही त्रास होत नाही व आपले आरोग्य उत्तमरीत्या टिकते.

वसंत ऋतू केव्हा असतो?

कॅलेंडरच्या महिन्याप्रमाणे पाहिले तर फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात थंडी कमी व्हायला सुरुवात होते व मार्चमध्ये उन्हाचा कडकपणा जाणवायला लागतो. मार्च व एप्रिल या दोन महिन्यांत वसंत ऋतूची लक्षणे दिसतात; परंतु गेली 8-10 वर्षे झाली हे ऋतुचक्र वेगळे झालेले दिसते. त्यामुळे निरोगी व्यक्‍तीने वैद्यांच्या सल्ला घेऊनच वासंतिक वमन निश्‍चित करावे. अशाप्रकारे शरीरातील दोषांना सम अवस्थेत ठेवण्याकरिता ऋतूप्रमाणे शरीरशुद्धीच्या उपक्रमामध्ये/उत्सवामध्ये सर्वांनी भाग घेतला पाहिजे.

 

Back to top button