धूम्रपान आणि ऑस्टिओपोरोसिस | पुढारी | पुढारी

धूम्रपान आणि ऑस्टिओपोरोसिस | पुढारी

धूम्रपानामुळे कॅल्शियमच्या शरीरातील विघटनाचे प्रमाण कमी होते आणि निकोटिनमुळे हाडे तयार होण्यासाठी आवश्यक अशा ऑस्टिओब्लास्टस् पेशींची निर्मिती मंदावते, त्यामुळे धूम्रपान करणार्‍यांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा (हाडे ठिसूळ होण्याचा आजार) धोका अधिक असतो. 

तंबाखूच्या धूम्रपानामुळे अनेक गंभीर आजार होण्याचा धोका खूप मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि या रोगांमध्ये कर्करोग, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगांचा समावेश असतो. मात्र, कित्येक लोकांना हे माहीत नसते की धूम्रपानामुळे ऑस्टिओपोरोसिससारख्या इतरही काही रोगांचा धोका वाढत जातो. हा हाडे ठिसूळ करणारा एक आजार असून त्यामुळे फ्रॅक्चर आणि उतारवयामध्ये येणारे अपंगत्व येऊ शकते.  

ऑस्टिओपोरोसिस किंवा हाडे अधिक बारीक होत जाणे या आजारामुळे कमजोरपणा व अपंगत्व देणारे फ्रॅक्चर होऊ शकते. कॅल्शियम आणि व्हिटॅमीन डीच्या मात्रा देऊन या आजारावर उपचार करता येतात आणि त्यातून हाडांची होणारी हानी टाळता येते. त्याशिवाय काही औषधोपचारानेसुद्धा हाडे ठिसूळ होण्याची प्रक्रिया कमी करता येते आणि त्यातून हाडे मोडणे व फ्रॅक्चरचा धोका कमी होऊन जातो.  

हाडे या खरे तर जोडणार्‍या पेशी असतात आणि त्या सातत्याने बाहेर पडतात व त्यांची जागा नवीन पेशी घेतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमीन डी यांमुळे हाडे तयार होण्यास मदत होते तर व्हिटॅमीन सी आणि इस्ट्रोजेन हार्मोनमुळे त्यांचे हाडातील विघटन शक्य होते. त्यामुळे हाडांचे वस्तुमान वाढते. संशोधनातून असे आढळून आले आहे की, धूम्रपानामुळे या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अनेक कारणांनी बाधा येते. धूम्रपानामुळे शरीरात कॅल्शियम विघटन होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते आणि त्याचवेळी इस्ट्रोजेनसारख्या हार्मोन्सचा समतोल बिघडतो. त्याचवेळी, सिगारेटमध्ये जे निकोटिन असते त्याचा विपरीत परिणाम ऑस्टिओब्लास्टस् या नवीन हाडे तयार करणार्‍या पेशींच्या कामावर होतो. दीर्घकालीन धूम्रपानाचा आणि ऑस्टिओपोरोसिसचा जवळचा संबंध असून त्यामुळे म्हातारवयात फ्रॅक्चर होण्याचा धोका कित्येक पटींनी वाढतो.

हाडांचे आरोग्य सांभाळणे ही आयुष्यातील दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि आरोग्यपूर्ण जीवनशैली सवयी या हाडांच्या चांगल्या प्रकृतीमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतात. हाडांचे आयुष्य हे संपूर्णतः तुमच्या जुन्या हाडांच्या जागी नवीन हाडे निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर अवलंबून असते. या दोघांमध्ये जेव्हा समतोल राखला जातो तोपर्यंत तुमची हाडे सुद़ृढ राहतात. जेव्हा जुनी हाडे मोठ्या प्रमाणावर विघटित होणे आणि त्या प्रमाणात नवीन हाडे तयार न होणे हे घडते तेव्हा हाडांची क्षति संभवते. 

वयाबरोबरच ऑस्टिओपोरोसिसचा संबंध हा इतरही धोकादायक गोष्टींशी आहे. त्यात पोषक आहाराची कमतरता आणि आहारात कॅल्शियाम व ‘व्हिटॅमीन डी’ची कमतरता तसेच धूम्रपान, मद्यपान, कमी वयात येणारी रजोनिवृत्ती (अ‍ॅमेनोर्‍हीया), जेनेरिक धोके आणि शरीराचा प्रकार या सर्व घटकांचा त्यात समावेश आहे. महिलांमध्ये ‘लोवर बोन डेन्सिटी’चा धोका हा पुरुषांपेक्षा अधिक असतो. त्याशिवाय त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचे अस्थी वस्तुमान हे झपाट्याने कमी होते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचे धोके अधिक संभवतात. 

लोकांना धूम्रपान आणि हाडांच्या आरोग्याची क्षति यामधील परस्परसंबंध लगेच ध्यानात येत नाही. ही जागृती लोकांमध्ये यावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. उतारवयात ऑस्टिओपोरोसिसमुळे अपंगत्व येण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. मात्र, कित्येक रुग्णांना त्यावर मात करत नवीन उपचारपद्धतींमुळे दर्जेदार आयुष्य प्राप्त करणे शक्य झाले आहे. ज्यांची हाडे ठिसूळ आहेत अशा रुग्णांना कॅल्शियाम आणि ‘व्हिटॅमीन डी’ची औषधे दिली जातात. सहा महिन्यांच्या इंजेक्शनच्या माध्यमातून मोनोक्लोनल अँटीबॉडी रुग्णांना दिले जाते आणि त्यातून प्रथिनांचा प्रवाह रोखला जातो. हाडे मोडणार्‍या पेशींना त्याद्वारे कमजोर केले जाते. 

धूम्रपानामुळे धमन्यांवर विपरीत परिणाम होतो आणि त्यामुळे त्यांची प्राणवायू अर्थात ऑक्सिजन वहन करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे जखमा बर्‍या होण्याची जी नैसर्गिक प्रक्रिया असते ती मंदावते व कठीण होते. म्हणूनची हाडांचे चांगले आरोग्य राखण्याच्याबाबतीत आणि जीवनशैली सुधारणे व आहार पद्धती बदलणे या गोष्टींशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे धूम्रपान सोडून देणे, हे अत्यंत महत्त्वाचे ठरते.

Back to top button