बेळगाव : मजगाव आजपासून होणार स्क्रीनिंग | पुढारी

बेळगाव : मजगाव आजपासून होणार स्क्रीनिंग

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

मजगाव येथे डेंग्यूने कहर केला असून याबाबत दै. ‘पुढारी’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताना आरोग्य खात्याला जाग आली आहे. त्यामुळे आरोग्य खात्याकडून शुक्रवारपासून (दि. 29) मजगावात सर्वांचे स्क्रीनिंग करण्यात येणार आहे. तर रहिवासी आरोग्य खात्याच्या कामावर तीव्र संताप व्यक्त करत आहेत. बेजबाबदारपणे हे प्रकरण हाताळले असल्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे, असा आरोप केला आहे.

मजगावात दोन महिन्यात सुमारे साडेतीनशे लोकांना डेंग्यूची बाधा झाली आहे. त्यामध्ये तिघांना जीव गमवावा लागला आहे, असा आरोप रहिवाशांतून होत आहे. महापालिका आणि आरोग्य खाते या साथीच्या रोगाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे ही स्थिती ओढावली आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने गुरुवारी (दि. 28) सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे जाग आलेले आरोग्य खाते शुक्रवारपासून घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करणार आहे.

संबंधित बातम्या

डेंग्यूमुळे खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल झाले आहेत. त्याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे नाराजी आहे. आता आरोग्य खाते स्क्रिनिंग करणार असल्यामुळे या रोगाबाबत सविस्तर अहवाल येण्याची शक्यता आहे.

रूग्णांची विचारपूस

आरोग्य खाते गावात उपाययोजना राबवल्या आहेत, असे खोटे सांगत असल्यामुळे माजी महापौर आणि माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष नागेश सातेरी यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांनी गावातील रूग्णांची विचारपूस केली. गावातील डॉक्टरांकडून माहिती घेतली. यामध्ये आरोग्य खाते लोकांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप रूग्णांनी केला.

Back to top button