संप्रेरकांमधील संतुलनासाठी… | पुढारी | पुढारी

संप्रेरकांमधील संतुलनासाठी... | पुढारी

डॉ. मनोज शिंगाडे

संप्रेरकांमधील संतुलन हे आरोग्यदायी जीवनासाठी गरजेचे आहे. हार्मोन्सच्या शक्‍तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका किंवा कमी लेखू नका. ते माणसांच्या आहार-विहारावर प्रभाव पाडणारे असते, हे लक्षात घ्यायला पाहिजे. हार्मोन्समध्ये असमतोलाची कारणे आणि लक्षणे अनेक आहेत. हार्मोन्सचा समतोल बिघडला, तर प्रकृती ढासळण्यास वेळ लागत नाही. 

सकस आहाराचा अभाव, यकृताचे सदोष कार्य, मानसिक ताण, अपुरी झोप, थॉयराईड ग्रंथीचा दोष या कारणांमुळे हार्मोन्सचा समतोलपणा ढासळतो. हार्मोन्समधील असमतोलपणा लवकर लक्षात येत नाही. वजन वाढणे, छातीत दुखणे, नैराश्य, थायराईडसंबंधी आजार, डोकेदुखी, अर्धशिषी, स्वभावात बदल,  चिंता करणे, गरमी लाली, स्थूलपणा येणे, कामाचा कंटाळा येणे आदी हार्मोन्स विकाराची लक्षणे सांगितली जातात. 

सध्याच्या काळात तर प्रत्येक वयोगटातील व्यक्‍ती हार्मोन्सच्या आजाराने ग्रासलेले दिसून येतात. हार्मोन्सचा प्रश्‍न शाळेतील मुलांनाही होऊ शकतो किंवा युवकालाही होऊ शकतो. आपल्या शरिरात हार्मोन्सचे प्रमाण समतोल राहण्यासाठी काही गोष्टी येथे नमूद करता येतील. त्या माध्यमातून आपल्याला हार्मोन्सच्या पातळीत समतोल राखणे शक्य होऊ शकते. 

प्लास्टिकापासून दूर राहा :

प्लास्टिकच्या वापरामुळे आपल्या शरिरातील हार्मोन्सवर विपरित परिणाम होऊ शकतो, यावर आपला विश्‍वास बसणार नाही. परंतु, जेवण करताना किंवा पेयासाठी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर टाळायची गरज आहे. पाणी पिण्यासाठी प्लास्टिकऐवजी पेपर किंवा स्टिलचा ग्लास, काचेच्या ग्लासचा वापर करावा. जेवढे शक्य तेवढे प्लास्टिकपासून दूर राहण्याचा प्रयत्न करायला हवा. आजकाल प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. कॅरिबॅग असो किंवा बुफे जेवणातील डिश असो, प्लास्टिकचाच मारा अधिक होताना दिसून येतो. त्यामुळे किमान घरात तरी स्टिल किंवा काचेच्या वस्तूंचा वापर करण्याची गरज आहे.

चरबीवर नियंत्रण ठेवा : रक्‍तपेशी चांगल्या राहण्यासाठी चांगल्या चरबीची शरिराला गरज असते. परंतु, चरबीची अवास्तव वाढ ही शरिरासाठी अपायकारक ठरू शकते. शेंगदाणा तेल, तेलकट आहार, फास्ट फूड, सोयाबीन तेलाचा वापर, सकस आहाराचा आभाव, अति मांसाहार, लोणी, तूप आदींच्या आहारामुळे शरिरात अनावश्यक चरबी वाढते. त्यामुळे हार्मोन्सची पातळी बिघडू शकते. सकस आहार आणि व्यायामामुळे चरबीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होऊ शकते. वाढत्या चरबीमुळे हार्मोन्सबरोबर रक्‍तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांनाही निमंत्रण मिळते. एकाच ठिकाणी बराच वेळ बसून काम करण्याच्या सवयीमुळे देखील शरिरातील स्थूलपणा वाढतो. त्यामुळे दररोज व्यायाम आणि नियंत्रित आहार असणे गरजेचे आहे. 

ध्यान : ध्यानधारणेमुळे मनावरील ताण, तणाव हलका होण्यास हातभार लागतो. मानसिक ताणतणावामुळे हार्मोन्सचे आजार निर्माण होतात. अतिताणामुळे कर्करोग, हृदयविकाराचा झटका, पक्षघात यांसारखे आजार होण्याची शक्यता संभवते. परंतु, सकाळी वीस मिनिटे आणि सायंकाळी वीस मिनिटे आपण जर ध्यानधारणा, योगासन करण्यास वेळ दिला, तर आरोग्यविषयक तक्रारी एकदम कमी होतील. ध्यानामुळे मनावरचा अकारण ताण कमी होतो. जर दररोज व्यायाम आणि योगासने केल्यास निरोगी जीवन राहते तसेच हार्मोन्समध्ये समतोलपणा राहतो. 

कच्च्या फळांचा आहार : शरिराला अधिकाधिक फायबर (तंतूमय पदार्थ) मिळवण्यासाठी कच्च्या फळांचा आहार करणे पोषक ठरते. कच्च्या भाज्या खाणेही ही एक चांगली सवय मानली जाते. मुळा, गाजर, काकडी, कारले यामधून शरिराला आवश्यक फायबर मिळतात. त्यामुळे पचनशक्‍ती आणि रोग प्रतिकारशक्‍तीही वाढते. फळांचा भरपूर आहारही शरिरातील पाण्याचा समतोलपणा राखतो. उन्हाळ्यात शरिराला सतत पाण्याची गरज भासते. नुसते पाणी पिण्यापेक्षा फळांतून शरिरात पाणी जाणे कधीही योग्य ठरते. प्रकृती चांगली राहण्याबराबेरच हार्मोन्सचे प्रमाणही बिघडत नाही आणि समतोल राखला जातो.

उत्तेजक पेय टाळणे : शरिराला उत्तेजित करणारे पेय घेणे टाळायला हवे किंवा त्याचे प्रमाणही कमीच ठेवणे गरजेचे आहे. आपल्या सभोवताली दिवसभरात भरपूर चहा किंवा कॉफी पिणारी मंडळी दिसून येतात. परंतु, कालांतराने त्याचे विपरित परिणाम शरिरावर दिसून येतात. त्यामुळे शक्यतो चहा, कॉफी घेणे टाळलेच पाहिजे आणि जर सवय सुटत नसेल तर त्याचे प्रमाण असून नसल्यासारखे ठेवावे. याशिवाय ग्रीन टी, हर्बल टीचा वापर करावा. अल्कोहोलिक पेय देखील टाळावे. सॉफ्ट ड्रिक्सचाही मारा कमी करायला हवा. या गोष्टी हार्मोन्स बिघडवतात. हार्मोन्सची पातळी योग्य राहवी आणि पर्यायाने आरोग्य चांगले राहावे, यासाठी नियंत्रित, समतोल आणि सकस आहाराला प्राधान्य द्यावे. 

टॉक्सिन टाळा : सौंदर्यप्रसाधने आज मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध आहेत. शरिराची निगा राखण्यासाठी, हात,पाय, चेहर्‍याचे सौंदर्य जपण्यासाठी विविध प्रकारच्या क्रिम्स  आपल्याला दिसून येतात आणि त्याचा वापरही वाढलेला आहे. परंतु, हेच केमिकल्सयुक्‍त क्रिम शरिराला घातक असते आणि हार्मोन्स बिघडवण्याचे काम करते, हे ध्यानात घ्यायला हवे. त्यामुळे शक्यतो ऑर्गेनिक आणि नॅचरल कॉस्मेटिक वापरण्यावर भर देणे आवश्यक आहे. जेणेकरून बाह्यसौंदर्य जपण्याच्या नादात शरिरातील आतील यंत्रणा बिघडणार नाही. 

Back to top button