तोंड येणे समस्या व उपाय | पुढारी

तोंड येणे समस्या व उपाय

प्रारंभिक क्षुल्लक स्वरूपाचा वाटणारा, पण वाढल्यानंतर मात्र खूपच त्रास देणारा एक आजार म्हणजे ‘तोंड येणे’, ओठ, गाल यांची आतील बाजू, जीभ, टाळा यांच्या अंतःस्त्वचेला सुरुवातीला दाह होतो. ती लाल होते, गरम पदार्थाने आग होते. यावर वेळीच उपचार न केल्यास असणारा दाह अधिकच वाढून चिरण्या अथवा गरे पडतात. कोणताच पदार्थ तोंडाला लागून देत नाही. आग जास्त होते. काही वेळा रक्तस्रावदेखील होतो. सूज येते, बोलतानादेखील त्रास होतो.

तोंड येण्याची विविध कारणे ः

सामान्य कारणे ः तोंडाची स्वच्छता नीट न ठेवणे, मिशरी, तंबाखू, गुटखा, मावा याचे अतिसेवन, सतत धूम्रपान, लोणची, चटणी, मिरची, खरडा, रस्ता, रेंजका इत्यादी मसालेदार पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. चहा, कॉफी, मद्यपान यांचा अतिरेक शरीरातील इतर आजारासाठी वारंवार ‘अँटीबायोटिक्स’चा वापर या कारणांनी तोंड आल्याचे आढळते. कोणत्याही कारणाने किंवा आजाराने थकवा जास्त असल्यास तोंड येऊ शकते. तसेच बद्धकोष्ठता, पित्तविकार, अमिबियासीस या आजारासाठी तोंड येते.

जंतुसंसर्गाचा परिणाम ः

प्रदूषित हवा, अशुद्ध पाणी इत्यादींमधील विविध जंतूमुळे तसेच ‘हर्पिस’च्या विषाणूमुळे फंगल इंफेक्शनमुळे काहीवेळा तोंड येत असते. सामान्य कारणांमुळे यातदेखील वरील सामान्य कारणे ज्यांच्या बाबतीत घडत असतात. अशांची तोंडातील अंतस्थत्वचेची प्रतिकारशक्ती कमी झालेली असल्याने या व्यक्तींना जंतुसंसर्ग सहज होतो.

एचआयव्ही इन्फेक्शन ः

एचआयव्ही झालेल्या अनेक रुग्णांना तोंड येणे हा विकार झालेला दिसतो. तात्पुरत्या औषधांनी कमी होते व परत येण्याचा त्रास होतो. एचआयव्हीच्या विकारात विषाणूमुळे सर्व शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत असल्यामुळे हा त्रास होत असतो व प्रतिकारशक्ती वाढल्यावरच पूर्णपणे थांबू शकतो.

तोंड येण्यामुळे दुष्परिणाम

तोंड आले असताना खाताना आग होत असल्यामुळे आहार कमी होतो. ज्यांना वारंवार तोंड येण्याची सवय असते. अशा व्यक्तींना आहार कमी जातो. यामुळे पोषण कमी होतमे. अशक्तपणा वाटतो. वजन उतरते. प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आलेले तोंड बरे होत नाही. याप्रमाणे दुष्टचक्रात अडकलेले असतात. काही जणांत जंतुसंसर्गामुळे मुखदुर्गंधी वाढलेली असते. तसेच घशाला सूज येऊ शकते, तोंड आलेले असतानाही मिशरी, तंबाखू, पान, गुटखा इत्यादी सतत चालू ठेवल्यास गरा पडतो. त्यातच जखम होते. काही वेळा तर या जखमेतून कॅन्सर झालेलादेखील पहायला मिळतो.

तोंड येत असल्यास घरगुती उपाय ः

नुकतेच तोंड येऊ लागले असल्यास प्राथमिक अवस्थेत पुढील उपचार करावेत. जाईची पाने स्वच्छ धुऊन चावावीत. संजीरे तुपातून लावावे. तवकीर तुपातून लावावा, ज्येष्ठमध तुपातून लावावा, साजूक तूप तोंडात काही वेळेला धरून ठेवावे. तवकिरीची खीर पोटात घ्यावी, ताजे ताक, तूप आहारात जास्त घ्यावे.

तोंड येण्यावरील वैद्यकीय आयुर्वेदिक उपचार ः

आयुर्वेदातील दाह शमन करणारी, सूज दूर करणारी, रक्तातील उष्णता कमी करणारी, प्रतिकारशक्ती वाढविणारी, पित्तशमन करणारी अशी औषधे म्हणजेच ज्येष्ठमध, आवळा, जाई, चंदन, वाळा, शतावरी, भुई आवळा, काडे चिराईत, अतिविषा, अनंतमूळ, निग्दा, गोखरू इ. वनस्पतीज तसेच प्रवाळ, मौक्तिक, संजीरा, कज्जली, माक्षिक, अभ्रक इत्यादी भस्मांचा व त्यापासून तयार केलेल्या विविध गोळ्यांचा प्रकृतीप्रमाणे व कारणारूप उपयोग केला जातो. या पोटातील औषधांबरोबर त्रिफळा जाई, ज्येष्ठमध इ. काढ्यांनी कवल करणे (चुळा भरणे) व त्यानंतर जात्यादी तेल, रोपन तेल, इरिमेदादी तेल इत्यादी तेल बोटाने तोंडाला आतून लावणे हे स्थानिक उपचार महत्त्वाचे असतात.

आहारामध्ये ताजे ताक, तूप, मोरावळा, लिंबू-सरबत, कोकम सरबत, डाळिंब, कोहळ्याच्या, नारळाच्या नाचणीसत्व यासारख्या थंड पदार्थांचा नित्यनेमाने वापर करावा.

Back to top button