कॅफीन आणि आरोग्य | पुढारी

कॅफीन आणि आरोग्य

सकाळी सुस्ती जाण्यासाठी चहा हवा, दुपारच्या वेळी कंटाळवाणे वाटू नये म्हणून चहा हवा आणि संध्याकाळी तर चहा हवाच! म्हणजे जणू आपण चहा पिण्याचे वेगवेगळे बहाणेच शोधून काढले आहेत; पण चहा आणि कॉफीमध्ये अधिक प्रमाणात कॅफीन असते.

कॅफीनचे रासायनिक नाव आहे, टिमिथीलक्सेन्थाईन. कॅफीनचे शुद्ध रूप हे पांढर्‍या रंगाचे आणि चवीला कडू असणार्‍या पावडरीच्या रूपात असते. ही पावडर स्वाद वाढविण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्समध्येही टाकतात. बर्‍याचशा पानांमध्ये, फळांमध्ये आणि बिन्समध्ये नैसर्गिक रूपात कॅफीन आढळते.

अलीकडे तरुण मुले कोल्ड्रिंक्स घेताना दिसतात. ही पेये चहा-कॉफीपेक्षा जास्त नुकसानदायक आहेत. यामध्ये असणारी साखर कॅफीनपेक्षा जास्त नुकसानदायक असते.

अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या म्हणण्यानुसार, संतुलित प्रमाणात घेतले गेलेले कॅफीन सामान्यपणे व्यक्तीला नुकसान पोहोचवत नाहीत. मात्र, हे संतुलित प्रमाण किती असले पाहिजे याकडे लक्ष दिले पाहिजे. संतुलित प्रमाण म्हणजे 200 ते 300 मिलिग्रॅम, जास्त मात्रा म्हणजे 400 मिलिग्रॅम आणि खूप जास्त मात्रा म्हणजे 600 मिलिग्रॅम इतके होय. एक कप कॉफीमध्ये 100 मिलिग्रॅम आणि एक कप चहामध्ये 50 मिलिग्रॅम कॅफीन असते.

आपण कॅफीनयुक्त ड्रिंक्स किंवा चहा-कॉफी घेतो, त्या वेळी रक्ताची गती वाढते. याच कारणामुळे आपल्याला आतून खूप ऊर्जायुक्त, उत्साही वाटू लागते. म्हणूनच बहुतेक व्यक्ती सकाळी उठल्यावर चहा पितात. कारण, यामुळे त्यांची झोप आणि आळस नष्ट होतो. खरं तर हेच काम आपण सकाळी एक चक्कर मारूनही करू शकतो. गमतीची गोष्ट म्हणजे कॅफीनचा परिणाम शरीरावर केवळ पाच-सहा तासांपर्यंतच राहतो.

त्यानंतर ज्यावेळी हार्मोन्सचे प्रमाण पूर्ववत होते, तेव्हा तुम्ही आळस आणि झोपेच्या भावनेने ग्रासले जाता. तेव्हा आपल्याला पुन्हा चहाची गरज भासते. ही सवय हळूहळू वाढत जाऊन तुम्ही सतत चहा किंवा कॉफी पिऊ लागता आणि अशा प्रकारे त्यामुळे आपण कॅफीनवर निर्भर होत जाऊ लागतो. कॅफीनचे प्रमाण शरीरात कोर्टीसोल (स्टिरॉईड हार्मोन्स)चे प्रमाण वाढवते. यामुळे शरीरात आरोग्यासंबंधीच्या अनेक प्रकारच्या तक्रारी निर्माण होतात.

यामध्ये हृदयाशी संबंधित त्रास, मधुमेह, अनियमितता आणि वजन वाढण्याच्या तक्रारींचा समावेश आहे. बर्‍याचदा वेदना निवारणासाठी कॅफीनयुक्त पदार्थ खाल्ले किंवा पिले जातात. त्यामुळे डोकेदुखी, थकवा, मूड बदलणे म्हणजे निराशा किंवा गळून गेल्यासारखे वाटणे, एकाग्रतेत कमतरता येणे, भूक कमी लागणे भ्रम होणे, स्मरणशक्ती कमी होणे, रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे, ताप इत्यादी त्रास होण्याची शक्यता असते.

डॉ. महेश बरामदे

Back to top button