म्युच्युअल फंडाची डिजिटल झेप… | पुढारी

म्युच्युअल फंडाची डिजिटल झेप...

अनिल पाटील, प्रवर्तक, एस. पी. वेल्थ मॅनेजमेंट

2016 मध्ये मोदी सरकारने ‘डिजिटल इंडिया’ची सुरुवात केली. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रांत आमूलाग्र बदल झालेले दिसत आहेत. डिजिटलायझेशनमुळे म्युच्युअल फंडानेही एका नव्या उंचीवर झेप घेतली आहे…

आपल्या देशात म्युच्युअल फंड गुंतवणूक क्षेत्राने नुकताच 37 लाख कोटींचा टप्पा पार केला. मागील वीस वर्षांत इक्‍विटी म्युच्युअल फंड योजनांनी गुंतवणूकदारांना 14 ते 20 टक्क्यांपर्यंत भरभरून परतावा दिला आहे. संपत्ती निर्माण करण्याचा चांगला मार्ग म्हणून गुंतवणूकदारांचा विश्‍वास मिळविला आहे.

भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची सुरुवात 1963 मध्ये संसदेच्या कायद्याद्वारे पहिली कंपनी ‘यूटीआय’ म्हणून उदयास आली. 1988 च्या शेवटी, ‘यूटीआय’कडे 6,700 कोटींची मालमत्ता अंडर मॅनेजमेंट (एयूएम) होती. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) सारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे म्युच्युअल फंड उद्योगात 1987 मध्ये पदार्पण झाले. एसबीआय म्युच्युअल फंड हा जून 1987 मध्ये स्थापन झालेला पहिला ‘नॉन-यूटीआय’ म्युच्युअल फंड होता. त्यानंतर कॅन बँक म्युच्युअल फंड (डिसेंबर 1987), पंजाब नॅशनल बँक म्युच्युअल फंड (ऑगस्ट 1989), इंडियन बँक म्युच्युअल फंड (नोव्हेंबर 1989), बँक ऑफ इंडिया (जून 1990), बँक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड (ऑक्टोबर 1992). एलआयसीने जून 1989 मध्ये म्युच्युअल फंडाची स्थापना केली. या सर्व कंपन्यांची 1993 च्या शेवटी, म्युच्युअल फंड उद्योगाकडे 47,004 कोटींची गुंतवणूक मालमत्ता व्यवस्थापनाखाली होती.

एप्रिल 1992 मध्ये भांडवली बाजारामधील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करणे, बाजार विकास आणि त्याचे नियमन करण्यासाठी सिक्युरिटी एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात ‘सेबी’ची स्थापना झाली. ‘सेबी’च्या प्रभावीपणे नियंत्रणामुळे, भारतीय भांडवली बाजाराला अधिक महत्त्व प्राप्‍त झाले आहे. ‘सेबी’च्या अधिपत्याखालील नियमावलीनुसार म्युच्युअल फंडाचे कार्य सुरळीत आणि प्रभावीपणे चालत आहे.

अनेक परदेशी प्रायोजकांनी भारतात म्युच्युअल फंड कंपन्या स्थापन केल्यामुळे ही संख्या जानेवारी 2003 अखेरीस 33 पर्यंत पोहोचली. त्यांची एकूण गुंतवणूक मालमत्ता 1,21,805 कोटी झाली होती. त्यापैकी एकट्या ‘यूटीआय’ची अमाऊंट अंडर मॅनेजमेंट 44,541 कोटी होती. 1993 ते 2003 या दहा वर्षांच्या काळात 47,004 कोटींवरून 1,21,805 पर्यंत गुंतवणूक मालमत्तेमध्ये वाढ झाली. म्हणजेच या दहा वर्षांत हे क्षेत्र अडीच ते तीन पटीने वाढले आहे.

2009 मधील जागतिक मंदीनंतर, जगभरातील अनेक भांडवली बाजारात घसरण झाली होती आणि तशीच स्थिती भारतातही होती. या काळात भांडवली बाजारात प्रवेश केलेल्या बहुतेक गुंतवणूकदारांचे मूल्य कमी झाल्याने म्युच्युअल फंडावरील गुंतवणूकदारांचा विश्‍वास खूप डळमळीत झाला होता.

2009 ची मंदी 2012-13 पर्यंत दूर झाली आणि गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा दिसू लागला. या क्षेत्राने मे 2014 मध्ये प्रथमच 10 लाख कोटींचा गुंतवणूक टप्पा ओलांडला आणि प्रत्येक वर्षी गुंतवणूक वाढतच राहिली. नंतरच्या तीन वर्षांच्या अल्पावधीत ऑगस्ट 2017 मध्ये प्रथमच 20 लाख कोटी टप्पा गाठला. मागील वर्षाखेर नोव्हेंबर 2020 मध्ये प्रथम 30 लाख कोटींचा टप्पा पार केला. नोव्हेंबर 2021 मध्ये मालमत्तेचे मूल्य 37 लाख कोटींपर्यंत पोहोचले आहे.

भारतीय म्युच्युअल फंड क्षेत्रातील दहा वर्षांचा इतिहास पाहिल्यास 30 नोव्हेंबर 2011 रोजी 6.82 लाख कोटी असलेले गुंतवणूक मूल्य 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 37.34 लाख कोटी इतके वाढले आहे, या दशकामध्ये हे क्षेत्र सहापटीने वाढलेले आहे. 30 नोव्हेंबर 2016 रोजी 5.20 कोटी खातेधारकांकडून 16.50 लाख कोटी गुंतवणूक झाली होती, ती 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 11.70 कोटी खातेधारक संख्या झाली आणि 37.34 लाख कोटी गुंतवणूक मूल्य झाले आहे. 5 वर्षांच्या कालावधीत 2016 ते 2021 पर्यंत 6.5 कोटी गुंतवणूकदारांच्या फोलिओची वाढ झालेली दिसते. ती 5 वर्षांच्या कालावधीत दुपटीने वाढली आहे. नोव्हेंबर 2016 पासून गेल्या 5 वर्षांत दर महिन्याला सरासरी 10.82 लाख नवीन फोलिओ जोडले गेले आहेत.

म्युच्युअल फंडाच्या खरा अर्थाने विस्ताराचे आणखी एक कारण म्हणजे सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (एसआयपी). आपल्या देशात प्रचंड लोकप्रिय ठरलेला हा गुंतवणूक पर्याय आहे. दर महिन्याला बँक खात्यातून काही रक्‍कम गुंतवणूक करण्यात येते आणि बाजारातील अस्थिरतेवर मात करून चांगला परतावा मिळणार्‍या म्हणून या योजना लोकप्रिय ठरल्या आहेत. एप्रिल 2016 मध्ये ‘एसआयपी’ खात्यांनी 1 कोटीचा टप्पा ओलांडला होता आणि 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत एकूण ‘एसआयपी’ खाती 4.78 कोटी झाली आहेत.

नोव्हेंबर 2021 च्या महिन्यात सुमारे 11,000 कोटींची गुंतवणूक या ‘एसआयपी’ने झाली आहे. 2016 नंतर पाच वर्षांत 1 कोटीहून 4.78 कोटी, पाचपटीने खाते संख्या वाढली आहे.

डिजिटल इंडियाचा परिणाम म्हणून म्युच्युअल फंड क्षेत्राचा मागील वीस वर्षांचा प्रवास पाहिला, तर सुरुवातीस म्युच्युअल फंड वितरकांकडून फक्‍त गुंतवणूक होत होती. त्यावेळी केवायसीची अट नव्हती. केवायसी पूर्तता नसल्याने फारच गोंधळ होत होता. सध्या लोकांकडून गुंतवणूक करून घेताना केवायसी पूर्तता करून गुंतवणूक केली जाते. ही केवायसी सेंट्रल आहे. एकदा केवायसी पूर्तता केली की, वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपनीत सहजपणे गुंतवणूक करता येते. पॅन कार्ड नंबर दिला की, त्या गुंतवणूकदाराच्या नावाने कोणकोणत्या कंपनीत गुंतवणूक आहे ती लगेच समजते. सध्या आधार कार्डला मोबाईल लिंक असल्याने ई-साईन पद्धत फार प्रभावीपणे होत आहे. आता तर आपली केवायसी व्हिडीओद्वारे करता येते आणि ऑनलाईन बँकिंग असल्याने ओटीपी घेऊन एका क्षणात गुंतवणूक करता येते. याचा लाभ कोरोना काळात अनेक गुंतवणूकदारांनी घरात बसून गुंतवणूक करून घेतला आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणूक सल्लागारकडून घेणे सीमित न राहता शेअर्सच्या डीमॅट खात्यावरून, बँका, ‘एनबीएफसी’ कंपन्या, ट्रस्ट, पोस्ट ऑफिस अशा ठिकाणी म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीची सुविधा मिळते. ‘बीसीई’ व ‘एनसीई’कडून म्युच्युअल फंड वितरकांसाठी गुंतवणुकीची वेगळी सुविधा पुरविण्यात आली. तसेच म्युच्युअल फंड युटिलिटी म्हणून म्युच्युअल फंड खरेदी-विक्री अधिकृत सुविधा देणारी यंत्रणा उभी केली. अद्ययावत तंत्रज्ञानाने या क्षेत्राचा विकास जोरात चालू आहे. त्यामुळे आज वितरकांना काम करणे फारच सोपे झाले आहे.

कोणत्याही गुंतवणूकदाराला ऑनलाईन गुंतवणूक करणे, त्यामधील रक्‍कम काढणे, एका योजनेतून दुसर्‍या योजनेत पैसे वर्ग करणे या गोष्टी फारच सोप्या झालेल्या आहेत. आज गुंतवणूकदार कोठूनही म्युच्युअल फंडामध्ये ऑनलाईन गुंतवणूक करू शकतो. काही कंपन्यांच्या वतीने मोबाईल अ‍ॅपवरून निरनिराळ्या फंडाच्या योजनांमध्ये कोणताही वितरक मध्यस्थ न घेता गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. या गुंतवणुकीची दुसरी बाजू म्हणजे म्युच्युअल फंड योजनेपूर्वी दिलेला परतावा भविष्यात मिळेलच, अशी खात्री नसते. कोणत्या कालावधीसाठी कोणती योजना घ्यावी याचे ज्ञान नसते, योजनेचा परतावा पाहून गुंतवणूक केली, तर नंतरच्या काळात परतावा मिळेलच, याची शाश्‍वती नसते. म्हणून अनेक गुंतवणूकदार परत इकडे येत नाहीत. आता बाजारात म्युच्युअल फंडाच्या दोन हजारांहून अधिक योजना आहेत. कोणती योजना माझ्यासाठी चांगली आहे, ही गोष्ट ऑनलाईन गुंतवणूक करताना समजत नाही. भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी चांगल्या गुंतवणूक सल्लागाराच्या वतीने गुंतवणूक करणे कधीही चांगले असते. प्रत्येक म्युच्युअल फंड योजनेत काही ना काही बाजारातील जोखीम असते, ती जोखीम किती आहे? व आपण जोखीम किती घेऊ शकतो, या बाबी समजावून घेऊन, अल्प, मध्यम, दीर्घ कालावधी पाहून गुंतवणूक करणे योग्य आहे.

आजपासून येणार्‍या दहा वर्षांत भांडवली बाजार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या बाजाराशी निगडित म्युच्युअल फंडात चांगला परतावा मिळणार आहे. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

1) जगातील अनेक देशांपैकी आपला देश सर्वाधिक आर्थिक विकास दराने वाटचाल करत आहे. 138 कोटी लोकसंख्येपैकी 45 टक्के तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात असणारा आपला एकमेव देश आहे. जगातील इतर देशांच्या द‍ृष्टीने एक प्रचंड मोठी बाजारपेठ असलेला हा देश आहे. तरुण लोकसंख्येचा भाग असलेल्या या देशात भविष्यात मोठे मार्केट आहे.

2) आज बँकिंग व वित्तीय क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रभावी कायदे केले जात आहेत. पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक या गोष्टी लिंक केल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानच्या आधारे असे अनेक मोठे निर्णय सरकार घेत असल्याने आर्थिक क्षेत्रात व सरकारच्या धोरणात पारदर्शीपणा आलेला दिसत आहे. या निर्णयामुळे कित्येक बोगस कंपन्या बंद पडलेल्या पाहावयास मिळत आहेत. परिणामी, येथून पुढे सरकारची आर्थिक धोरणे प्रभावीपणे राबवली जातील.

3) आजच्या लोकसंख्येच्या तुलनेत 2030 सालापर्यंत आपली लोकसंख्या जगात पहिल्या नंबरवर म्हणजेच 150 कोटींपर्यंत पोहोचेल व देशातील लोकांचे सरासरी वय 30 ते 32 असेल, जो बहुसंख्य वर्ग कमविणारा असेल. संपूर्ण जगातील तंत्रज्ञान चालविण्यासाठी मानवी शक्‍ती पुरविण्याची ताकद फक्‍त आपल्या भारत देशाकडे असेल. 150 कोटी लोकसंख्येमध्ये इन्कम टॅक्स भरणार्‍या लोकांचे 50 टक्के प्रमाण गृहीत धरले, तरी ती संख्या 70 ते 80 कोटी असेल, ती आजच्यापेक्षा दहा पटीने जास्त असणार आहे. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्‍न आजच्यापेक्षा पाच-दहा पटीने वाढेल, असे जाणकार अर्थतज्ज्ञांचे अंदाज आहेत.

4) भांडवली बाजारात मोठे बदल होत असून, सर्वसामान्य लोकांची या बाजारामध्ये गुंतवणूक वाढत आहे. डिजिटल इंडियामुळे ऑनलाईन डीमॅट खात्यांची संख्या वाढत आहे. 2018-19 सालात 3.70 कोटी डीमॅट खाती होती, ती आता 7.50 कोटींच्या जवळपास झाली आहेत. मागील तीन वर्षांत ही संख्या दुप्पट झाली आहे. दर महिन्याला 30 लाख नवीन खाती उघडत आहेत. येणार्‍या दहा वर्षांत ही संख्या दहापट होईल.

5) आर्थिक अज्ञान सर्वसामान्य लोकांमध्ये खूप आहे अन् हे दूर करण्याचा प्रयत्न ‘सेबी’सारख्या कंपन्या करीत आहेत.
म्हणूनच भविष्यातील आर्थिक तरतुदीसाठी आपल्या सध्याच्या येणार्‍या उत्पन्‍नामधील बचत करून आताच योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. भविष्यात चांगला परतावा मिळण्यासाठी या भांडवली बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड डायरेक्ट इक्‍विटीसारखा पर्याय निवडून चांगल्या सल्लागाराकडून सल्ला घेऊन या प्रवाहात आले पाहिजे आणि समृद्ध भारताबरोबर आपलीही समृद्धी साधता आली पाहिजे, असे वाटते.

Back to top button