बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन : ब्रिगेडियर अरुण हरोलीकर यांची शौर्यगाथा | पुढारी

बांगला देश मुक्‍ती युद्ध सुवर्ण दिन : ब्रिगेडियर अरुण हरोलीकर यांची शौर्यगाथा

आपल्या पलटणींचे मुख्याधिकारी (कमांडिंग ऑफिसर) व्हावे, अशीच महत्त्वाकांक्षा होती ब्रिगेडियर अरुण हरोलीकर यांची. हा महावीर योद्धा ‘करवीर’ नगरीच्या लाल मातीत 6 डिसेंबर 1934 रोजी जन्माला आला. न्यू हायस्कूल व राजाराम कॉलेजमध्ये शिकला. 11 ऑगस्ट 1971 रोजी लेफ्टनंट कर्नल असणार्‍या अरुण हरोलीकरांना आदेश मिळाला, ‘5 गोरखा (5th GR) ची पलटण घेऊन ताबडतोब तुम्हाला समरांगणात उतरायचे आहे. कूच करा!’ ईशान्य सीमा पेटलेली होती. 5-4 गोरखा पलटण घेऊन कर्नल अरुण निघाले. गोरखा रेजिमेंटच्या इभ्रतीस अनुसरून व फिल्ड मार्शल सॅम बहादूरच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देणे हे अग्‍निदिव्य कर्नल अरुण यांना पार पाडायचे होते.

बिग्रेडियर विजय दाणी (पुणेकर) यांच्या शौर्याप्रमाणे आपणही जबाबदारी पार पाडली पाहिजे, हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी सीमा गाठली. फिल्ड मार्शल माणेकशॉ गुरखा रेजीमेंटचेच 4 गुरखा (4 th GR) ही अरुण यांची मूळ पलटण; युद्धकालीन 5 गुरखाचे मुख्याधिकारी पद आणि मेजर धनसिंग थापा या परमवीराची परंपरा हे सर्व लक्षात घेऊन अरुण 1971 ला ‘बांगला मुक्‍ती’ संग्रामात उतरले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निक्सन त्यांची सेवंथ फ्लीट युद्धात उतरण्यापूर्वी आम्ही नौसिकांनी कराची पेटवून दिले, तर आमची भूदल सेना ढाक्याच्या वेशीवर आठ डिसेंबरला पोहोचून मेजर जनरल गंधर्वसिंग जनरल अमीर मुहंमद नियाजीला आव्हान देत होती. ‘शरणागती मान्य करतोस का हतबल झालेल्या तुझ्या सैन्याचे शिरकाण करत आत घुसू?’ आणि मग नियाजी यांनी अमेरिकन राजदूत जोसेफ फारलँड यांना शरणागतीच्या प्रस्तावाला वेग देण्याचे सुचवले. दि. 12 डिसेंबर 1971 रोजी आमच्या वायुदलाने तर ढाक्याच्या राज भवनवर प्रहार करून शरणागती पक्‍की केली.

इकडे ईशान्य भागात मात्र धुमश्‍चक्री चालू होती. चीनने सीमेवर आपल्या तीन डिव्हिजन्स सैन्याला उभे करून पाकला ‘पाठिंबा’ दाखवला. अरुणाचल, चिनी सेना, पाकिस्तानी सेना अशा तिहेरी कात्रीत सापडलेली आमची सेना लढत होती. यात भर पडली ती नागा दहशतवादी बंडखोरांची. त्या काळात भारतीय पंचमस्तंभीय देशद्रोही चीनची लाल सेना पोसत होती. बाराशे नागांकडे आधुनिक शस्त्रे होती. गोरखा रेजिमेंटच्या जवानांना या समरभूमीचा 1962 पासून अनुभव होता.

‘जय काली आयो गोरखाली’ हा आपला युद्ध नारा देत गुरखा रेजिमेंट भारताच्या ईशान्य सीमेवर गनिमाला पाणी पाजत नेस्तनाबूत करत कर्नल हारोलीकर यांच्या नेतृत्वाखाली पुढे पुढे सरकत होती. ऑगस्ट 1971 मध्ये आदेश मिळताच समरांगणाकडे झेपवणारे गुरखे ज्यांना ईशान्य व डोंगराळ भागात लढण्याचा अनुभव होता, ते पेटून उठले होते.

स्वतः कर्नल अरुण प्रत्येक गोरखा सैनिकास उत्तेजन देत पुढे सरकत होते. जखमी सैनिकाला सर्व मदत करत अंतिम ध्येय गाठण्यास पुढे पुढे सरकत होते. दि. 7 एप्रिल 1971 रोजी पाकिस्तानी ब्रिगेडला (अंदाजे 5000 सैनिक) गुरख्यांच्या फक्‍त एका बटालियनने (अंदाजे 800 सैनिक) नामोहरम केले होते. 7 एप्रिल हा दिवस 5 गुरखा (5th GR + 4th GR) यांच्याकरिता फार महत्त्वाचा होता. दि. 6 एप्रिल 1934 हा ब्रिगेडियर अरुण हरोलीकर यांचा जन्मदिन.

गुरख्यांनी प्राणांचे मोल देऊन आपल्या साहेबाच्या व पलटणीच्या शिरपेचात ‘सोनेरी तुरा’ खोवला होता. युद्धोत्तर काळात प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी ब्रिगेडियर हरोलीकरांना भेटून विचारपूस केली व हस्तांदोलन केले. 1971 च्या युद्धात त्यांना 26 जानेवारी 1972 रोजी महावीर चक्र देण्यात आले. 2008 मध्ये त्यांचे निधन झाले.
– विनायक अभ्यंकर, निवृत्त लष्करी अधिकारी

Back to top button