Sharad Pawar Birthday : सुप्त क्रांती घडविणारे धोरणकर्ते शरद पवार | पुढारी

Sharad Pawar Birthday : सुप्त क्रांती घडविणारे धोरणकर्ते शरद पवार

प्रा. प्रकाश पवार,  ज्येष्ठ राजकीय विश्लेषक

सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्‍यक्ष  शरद पवार यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. त्यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे परंतु क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. यासंदर्भात पवारांचा चेहरा बहुमुखी दिसतो.

भारताला पुढेमागे हलविणारी धोरणे ठरविण्यात ज्या मोजक्या नेत्यांचा समावेश होतो त्यापैकी एक शरद पवार आहेत. सार्वजनिक धोरण निर्मिती आणि सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी या क्षेत्रात शरद पवार यांचे नेतृत्व भारतात अव्वल दर्जाचे ठरलेले आहे. काही नेते केवळ सत्तेच्या गढीवर बसलेले असतात. तर काही नेते केवळ सामाजिक चळवळींना अग्रक्रम देतात. शरद पवार यांनी हे दोन्ही टोकाचे मार्ग स्वीकारले नाहीत.

सत्ता आणि समाजात फेरबदल या दोन्ही गोष्टींचा त्यांनी त्यांच्या सार्वजनिक धोरणात मेळ घातलेला दिसतो. अशा प्रकारची सार्वजनिक धोरण ठरवण्याची चौकट न्यायमूर्ती रानडे, पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांची होती. फेरबदल या गोष्टीला शरद पवार यांनी प्राधान्य दिले; परंतु त्याबरोबरच त्यांनी समाजाच्या प्रगतीची गती समजून घेतली. समाजाच्या प्रगतीच्या गतीमध्ये त्यांनी सार्वजनिक धोरण ठरविताना भर घातली.त्या त्या काळातील समाजाला पेलतील एवढीच गती त्यांनी सामाजिक व आर्थिक धोरणांना दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या सार्वजनिक धोरणांची गती डाव्या पेक्षा थोडीशी कमी राहिली. परंतु मध्यम मार्गी विचारसरणीच्या धोरणकारांपेक्षा त्यांच्या धोरणाची गती जास्तच पुरोगामी राहिली. ही गोष्ट साध्या साध्या त्यांच्या निर्णया मधून देखील सुस्पष्टपणे दिसत राहिली आहे.

सौम्य निर्णय, क्रांतिकारी बदल

 Sharad Pawar Birthday www.pudharinews www.pudharinews www.pudharinews

शरद पवार यांचे अनेक निर्णय सौम्य स्वरूपाचे परंतु क्रांतिकारी बदल घडवणारे ठरले. याबद्दलची अनेक उदाहरणे आहेत. दोन उदाहरणे लोकांच्या जीवनात क्रांतिकारी बदल करणारी विशेष महत्त्वाची आहेत. एक, पोलीसासाठी त्यांनी फुल पॅन्टचा निर्णय घेतला. खरेतर हा निर्णय सरंजामदारी मनोवृत्तीच्या विरोधातील होता. पोलिसांना त्यांच्या पेहरावातून देखील प्रतिष्ठा देता येते. ही गोष्ट विलक्षण मानसिक दृष्ट्या क्रांतिकारक होती. दोन, शरद पवार यांच्या सत्तरीच्या काळातील निर्णयामध्ये कोरडवाहू भागातील आणि डोंगराळ भागातील जमिनीच्या उत्पादनक्षमतेत वाढ करणे आणि त्याचा मेळ जीवनावश्यक गोष्टींशी घालणे हा निर्णय लोकांच्या जीवनमानावर खोलवर परिणाम करणारा ठरला. साठ आणि सत्तरच्या दशकात लोकांना फळ खाण्यास मिळत नव्हते. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी भागात फळ विक्रीची दुकाने दिसतात. लोकांच्या जीवनात हा क्रांतिकारी बदल सौम्य पद्धतीने शरद पवार यांच्या धोरणामुळे घडून आला. 2004 नंतर त्यांनी भारतातील अनेक घटक राज्यांमध्ये फळाच्या क्षेत्रात निर्णय घेऊन क्रांतिकारी बदल घडवले.

सुप्त क्रांती

शरद पवार यांच्या आधीपासून महाराष्ट्रात सत्ता आणि समाज यापैकी कोणाला अग्रक्रम द्यावा? या विषयावर निर्णय घेण्याच्या संदर्भात प्रचंड वाद-विवाद झाले. शरद पवार यांनी सत्तेच्या क्षेत्रातील निर्णय महत्त्वाचे मानले. परंतु त्यांनी सामाजिक क्षेत्रात फेरबदल करणारे निर्णय ठामपणे घेतले. त्यांनी घेतलेल्या निर्णयामधून समाज किती पुढेमागे सरकला या गोष्टीचे मोजमाप नीटनेटके झालेले नाही; परंतु त्यांनी घेतलेल्या तीन निर्णयांमधून समाजाची परंपरागत मानसिकता आणि सरंजामी मनोवृत्ती खोलवर बदलत गेली. त्यांनी एका अर्थाने परंपरागत आणि सरंजामी मनोवृत्तीच्या समाजाला आधुनिकतेच्या प्रांगणात ओढून घेतले.

 Sharad Pawar Birthday www.pudharinews www.pudharinews www.pudharinewswww.pudharinews

काही नेते समाजाला आधुनिकतेकडे ढकलतात. शरद पवार यांनी निर्णय आधुनिकतेच्या प्रांतात ढकलणारे न घेता, त्यांनी आधुनिकतेच्या प्रांतात समाजाला प्रेमाने ओढून घेणारे निर्णय घेतले. असे तीन महत्त्वाचे निर्णय भारतीय समाजकारणातील आणि राजकारणातील मैलाचा दगड ठरणारे आहेत. एक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा निर्णय हा प्रचंड क्रांतिकारी निर्णय होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विद्यापीठाला नाव देण्यामुळे मानवी हक्क आणि स्वाभिमानाची जाणीव या गोष्टीचा प्रचंड मोठा संस्कार केला गेला. विशेषतः परंपरागत समाजातील सरंजामी मनोवृत्ती बाहेर काढली गेली. या निर्णयामुळे शरद पवारांचे राजकीय नुकसान झाले; परंतु राजकीय क्षेत्रातील लोकांनी पुन्हा पाठीमागे येऊन सामाजिक क्रांती करून पुढे जावे लागते. या गोष्टींचा एक वस्तुपाठ त्यांच्या या निर्णयातून दिसून आला. दोन, शरद पवार यांनी राजकीय क्षेत्रात ओबीसी आरक्षणाचा निर्णय महाराष्ट्रात घेतला. अर्थातच हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थातील होता. या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये राजकीय प्रतिनिधित्वाबद्दल प्रचंड मोठी राजकीय जागृती घडून आली. ओबीसी समूहातील किती राजकीय नेते पुढे आले याचे मोजमाप देखील विलक्षण प्रभावी ठरणारे आहे. तीन, शरद पवार यांनी महिलांच्या आरक्षणाचा सातत्याने पाठपुरावा केला. त्यांनी राजकीय क्षेत्रात महिलांसाठी राखीव जागा, नोकरीत राखीव जागा, संपत्तीमध्ये वाटा, लष्करामध्ये सहभागाची संधी अशा विविध पातळ्यांवर निर्णय घेतले आहेत. त्यांनी महिलांच्या कार्य आणि कर्तुत्वातील कार्यक्षमता दिसण्यासाठी पुरेसा वेळ देखील दिला आहे. या निर्णयामुळे सरंजामी कुटुंब पद्धती, सरंजामी नातेसंबंध या गोष्टी गेल्या तीस एक वर्षात अति जलद गतीने बदलल्या आहेत. त्यांनी महिलांच्यावरील सामाजिक, आर्थिक, राजकीय अंकुश काढून टाकण्यासाठी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना व्यक्ती म्हणून महत्त्व दिले. महिलांना कोणताही निर्णय एक व्यक्ती म्हणून घेता येत नव्हता. या क्षेत्रात निर्णय घेणे प्रचंड जोखमीचे होते. त्यांनी ती जोखीम पत्करली होती. या क्षेत्रात शरद पवारांच्या निर्णयामुळे एक सुप्त क्रांती घडून आली.

आर्थिक सुधारणा धोरण

 Sharad Pawar Birthday www.pudharinews www.pudharinews www.pudharinewswww.pudharinewswww.pudharinews

शरद पवार यांनी आर्थिक सुधारणा धोरणाचा पुरस्कार केला. त्यांनी आर्थिक सुधारणा धोरणाच्या चौकटीत भारतातील जवळपास सर्वच धोरणांमध्ये बदल करण्याचे समर्थन केले. यामुळे कृषी औद्योगिक क्षेत्रात मूलभूत धोरणे बदलली. तसेच सेवाक्षेत्रातील विविध धोरणांमध्ये बदल झाला. आर्थिक सुधारणा धोरण निश्चितीचे जवळपास सर्व श्रेय मनमोहन सिंग आणि नरसिंह राव यांना दिले जाते. त्याहीआधी राजीव गांधी आणि शरद पवार आर्थिक सुधारणा धोरणांचा पुरस्कार करत होते. ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही. आर्थिक सुधारणा धोरण या चौकटीत अंतर्गत देखील दोन प्रकार आहेत. आर्थिक क्षेत्राचे अनियंत्रित वर्चस्व हा एक प्रकार आहे. तर आर्थिक सुधारणांना मान्यता देऊन त्यावर राज्यसंस्थेचे नियंत्रण हा दुसरा प्रकार आहे. शरद पवार, मनमोहन सिंग हे आर्थिक सुधारणा धोरणाला मान्यता देऊन त्यावर राज्यसंस्थेचे नियंत्रण ठेवणार्‍यांपैकी आहेत. जागतिक पातळीवर अशा पद्धतीची भूमिका घेणारे फारच कमी नेते आहेत. त्यापैकी एक शरद पवार आहेत.

 

 

 

 

Back to top button