बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिण्याचा निश्चय केला तो चिंचवडच्या कवी गुरुजींमुळे! | पुढारी

बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहिण्याचा निश्चय केला तो चिंचवडच्या कवी गुरुजींमुळे!

बाबासाहेबांनी आपल्या व्याख्यानांनी महाराष्ट्र तर ढवळून काढलाच; पण देशाच्या अनेक भागांतील तसेच परदेशांतील मराठीजनांनाही वेड लावले. त्यांनी सुमारे वीस हजारांच्या आसपास व्याख्याने दिली. दादरा-नगर-हवेली पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्याच्या मोहिमेतील बाबासाहेबांचा सहभाग हा त्यांच्या आयुष्यातील एक थरारक भाग होता.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सरदार घराण्यातले. मोरेश्वर पुरंदरे हे बाबासाहेबांचे वडील. ते पुण्याच्या भावे स्कूलमध्ये चित्रकलेचे शिक्षक होते. त्यांचा जन्म 28 जुलै 1922 च्या नागपंचमीचा. भावे स्कूलमध्ये शिकत असताना शिवाजी महाराजांची चित्रे कापून त्यांचा संग्रह करण्याचा छंद त्यांना लागला. वडिलांनी त्यांना ‘हायरोड्स ऑफ हिस्टरी’चे खंड आणून दिले. त्यातून त्यांचे इतिहासाचे वाचन सुरू झाले. त्यांचे शिक्षक ना. रा. परचुरे यांनी त्यांना वक्तृत्व शिकवले. पण त्यांच्यावर सर्वांत अधिक प्रभाव वडिलांच्या फर्ड्या वक्तृत्वाचा झाला. पण, त्यांना सर्वाधिक भावली ती सावरकरांची अमोघ वाणी. थोर इतिहासकार ग. ह. खरे यांच्याकडून त्यांनी इतिहासाचे धडे घेतले. इतिहासाची गोडी अन् अभ्यास वाढत चालला होता आणि त्यातूनच त्यांनी महाविद्यालयात असतानाच ‘जाळत्या ठिणग्या’ हे इतिहासावरचे पहिले पुस्तक लिहून वडिलांना अर्पण केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना झपाटून टाकले. शिक्षण घेत असताना दर वर्षीच्या चैत्र पौर्णिमेस येणार्‍या शिवपुण्यतिथीला सायकल दामटत ते महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी रायगड गाठत. पुढे 1932 ते 1964 या काळात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणे सायकलवरूनच पालथी घातली.

वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी शिवचरित्र लिहिण्याचा निश्चय बाबासाहेबांनी केला तो चिंचवडच्या कवी गुरुजींमुळे. त्यांनी चिकित्सापूर्वक नऊ अध्याय लिहिले आणि ते ‘एकता’ मासिकात प्रसिद्धही झाले. पण पंडिती भाषेत लिहिलेले आपले शिवचरित्र वाचकांनी काय, पण मासिकाच्या संपादकांनीही वाचले नसल्याचे समजल्यावर ते निराश झाले. लालित्यपूर्ण भाषेत शिवआख्यान मांडण्याचा संकल्प त्यांनी केला. तसे शिवचरित्र लिहायला त्यांनी 1946 च्या अखेरीस सुरुवात केली अन् अकरा वर्षांनी म्हणजे 1958 मध्ये ते पूर्ण केले. मात्र, त्याचे प्रकाशन सोपे नव्हते. त्या कामी ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांची त्यांना मोठी मदत झाली. शिवचरित्र प्रसिद्ध झाले आणि महाराष्ट्राने ते डोक्यावर घेतले. आतापर्यंत ‘राजा शिवछत्रपती’ या शिवचरित्राच्या 26 आवृत्त्या निघाल्या आहेत. सामान्य माणसाला या शिवचरित्राने मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या ‘जाळत्या ठिणग्या’ या पहिल्या पुस्तकानंतर दुसरे पुस्तक ‘मुजर्‍याचे मानकरी’ हे 1948 मध्ये, तर ‘सावित्री’ हे 1950 मध्ये प्रसिद्ध झाले. त्याखेरीज पुढे ‘दख्खनची दौलत’, ‘शेलारखिंड’, ‘महाराज’, ‘पुरंदर्‍यांची दौलत’, ‘सरकारवाडा’ अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले.

शिवचरित्र व्याख्यानमालेस सुरुवात झाली ती नागपूरच्या राजाराम सीताराम ग्रंथालयात 25 डिसेंबर 1954 ला. त्या वेळी ते बत्तीस वर्षांचे होते. नंतर नागपूरला तिकीट लावून त्यांची व्याख्यानमाला झाली. तिकीट लावून व्याख्यान देणारे आणि तरीही गर्दी खेचणारे त्या काळातले ते पहिलेच वक्ते ठरले. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाची मोहिनी अवघ्या महाराष्ट्रावर पडली. बाबासाहेबांनी आपल्या व्याख्यानांनी महाराष्ट्र तर ढवळून काढलाच; पण देशाच्या अनेक भागांतील तसेच परदेशांतील मराठीजनांनाही वेड लावले. त्यांनी सुमारे वीस हजारांच्या आसपास व्याख्याने दिली आहेत. दादरा-नगर-हवेली पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्याच्या मोहिमेतील बाबासाहेबांचा सहभाग हा त्यांच्या आयुष्यातील एक थरारक भाग होता तसेच त्यामुळे ते केवळ बोलते-लिहिते नव्हते, तर प्रसंगी आपण क्रियाशील योद्धेही बनू शकतो, हे सिद्ध करणारे होते.

बाबासाहेबांचे जिवलग स्नेही माजगावकर यांची बहीण कुमुद ही 29 नोव्हेंबर 1949 ला निर्मला बळवंत पुरंदरे बनून त्यांची गृहसखी बनली. बाबासाहेबांच्या वडिलांचे 1950 मध्ये निधन झाल्यावर घराचे उत्पन्नच थांबल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. इतिहासाच्या वेडात सगळीकडे धावणारा नवरा असतानाही निर्मलाताईंनी घर आणि मुले उत्तमरीत्या सांभाळली. त्यानंतर त्याही समाजकाम करू लागल्या. सुरुवातीला ग्रामीण भागातून येणार्‍या मुलांना अल्पदरात वसतिगृह देणार्‍या विद्यार्थी सहायक समितीचे काम त्यांनी केले. नंतर 1981 मध्ये स्वत:च वनस्थळी ही बालशिक्षणाची संस्था स्थापन केली. मुलगी माधुरी पुरंदरे ही बालसाहित्यिक म्हणून विख्यात झाली तसेच नावाप्रमाणेच मधुर आवाजात तिने गायलेल्या गीतांना रसिकांनी दाद दिली. थोरले चिरंजीव अमृतराव हे पुरंदरे प्रकाशनाची जबाबदारी सांभाळतात, तर धाकटे चिरंजीव प्रसाद हे नाट्य तसेच क्रीडा संघटन क्षेत्रात कार्यरत आहेत.

व्याख्याने आणि पुस्तकांना मिळालेल्या जबरदस्त प्रतिसादामुळे बाबासाहेबांची आर्थिक स्थिती सुधारत गेली. त्यातील पुस्तक विक्रीतून मिळणारे पैसे संसारासाठी, तर व्याख्यानांमधून मिळणारे पैसे समाजकामासाठी, अशी वाटणी त्यांनी ठरवून टाकली. समाजकाम आणि अन्य उपक्रमांसाठी सातारच्या राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली महाराजा प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत बाबासाहेबांनी साडेतीन कोटी रुपयांहून अधिक रक्कम विविध समाजकामांसाठी दिली आहे. सुमित्राराजे यांनीच बाबासाहेबांना ‘शिवशाहीर’ ही पदवी दिली अन् पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले.

शिवराज्याभिषेकाला 1974 मध्ये तीनशे वर्षे पूर्ण झाली तेव्हा तब्बल सहा लाख रुपये खर्चून मुंबईला शिवसृष्टी उभारली. शिवकालीन जीवनपद्धती सजीवपणाने पाहता यावी, आपला वैभवशाली इतिहास आणि वारसा नव्या पिढीला समजावा तसेच तो त्यांच्या जगण्यात उतरावा, ही धडपड त्यामागे होती. त्यासाठी कात्रजजवळील आंबेगाव येथे सरकारकडून जागा मिळाली आणि आतापर्यंत त्यातील पहिला टप्पा पूर्ण होत आला आहे. जे जे उत्तम-उदात्त-मंगल ते ते करण्याच्या ध्यासातून ‘जाणता राजा’ या जगातल्या दुसर्‍या क्रमांकाच्या समूहनाट्याची निर्मिती बाबासाहेबांनी केली. रोम येथे पाचशे कलाकार, तीनशे घोडे, जुने रथ, वाडे यांचा समावेश असलेला भव्य नाट्यप्रयोग त्यांनी 1978 मध्ये पाहिला आणि शिवचरित्र असे मांडायचे ठरविले. त्यासाठी 1979 मध्ये तालमी सुरू झाल्या आणि त्याचा पहिला प्रयोग 14 एप्रिल 1985 ला झाला. त्यात पाचमजली फिरता सेट, तुळजाभवानीची बावीस फुटी मूर्ती, तीन वर्षांपासून ते 85 वर्षांपर्यंतचे अडीचशे कलाकार यांचा समावेश होता. राज्याप्रमाणेच परराज्यात तसेच अमेरिकेतल्या बोस्टनलाही या नाट्याचे प्रयोग झाले. या वर्षीच्या जुलैमध्ये वयाच्या शंभरीत प्रवेश केल्यानंतरही ते कार्यरत होते. मात्र, शंभर वर्षांचे आयुष्य देणार्‍या त्या अनंत शक्तीचाही निसर्गनियमांपुढे नाईलाज झाला आणि अखेरीस घरातच पडल्याने जखमी झाल्याचे निमित्त झाले, त्यातच त्यांची प्रकृती खालावत गेली.

Back to top button