Khandenavami 2023 : शस्त्रपूजनाची खंडेनवमी | पुढारी

Khandenavami 2023 : शस्त्रपूजनाची खंडेनवमी

सुरेश पवार

नवरात्र उत्सवातील महानवमी तिथीला खंडेनवमी म्हटले जाते. ‘खंडे’चा मूळ शब्द खांडा. खांडा म्हणजे तलवार अर्थात खड्ग ! खड्ग पूजन या दिवशी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने केले जाते. मध्ययुगापासून आजतागायत शस्त्र धारण करणारे जे जे समाज आहेत, ते ही खंडेनवमी मोठ्या श्रद्धेने साजरी करतात. मराठा, रजपूत समाज आणि स्वतःस क्षत्रिय मानणारे समाज प्रामुख्याने खंडेनवमी साजरी करतात. त्याचबरोबर विविध व्यावसायिक, शिल्पकार, कलाकार, कारागीर आपापल्या व्यावसायिक हत्यारांची पूजा करतात. (Khandenavami 2023)

खंडेनवमी म्हणजे शक्तिमातेचे पूजन सामर्थ्य प्राप्त व्हावे, संकटावर मात व्हावी, सौख्य-समाधान प्राप्त व्हावे, हा या पूजनामधील हेतू! यादिवशी शस्त्रास्त्रांची आकर्षक मांडणी आणि सजावट करून शस्त्रास्त्रांचे विधिवत पूजन करण्यात येते. त्या बरोबरच होमहवन, नवग्रह पूजन, नवार्ण मंत्र हवन, सप्तशती पाठ आदी विधीही आपापल्या शक्ती – कुवतीनुसार केले जातात.

भारतात सर्व राज्यात हा उत्सव साजरा केला जात असला, तरी महाराष्ट्र आणि राजस्थान या लष्करी परंपरा असलेल्या राज्यात मराठा समाज आणि राजपूत समाज मोठ्या भक्तिभावाने शस्त्रास्त्र पूजन करतात. मराठ्यांना तलवार ही अत्यंत प्रिय. त्यामुळे खंडेनवमी आधी आपली सारी हत्यारे घासून पुसून लख्ख करण्याकडे आणि हत्यारांना शिकल करण्याकडे म्हणजे हत्यारे पाजळण्यात मराठा समाज गुंतलेला असतो. राजपूत समाजात नऊ दिवस शस्त्र पूजन चालते. या काळात खड्गाची मिरवणूकही काढली जाते.

इतिहास लेखनाच्या दृष्टीने भारतात हर्षवर्धनच्या काळापासून म्हणजे सातव्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मध्ययुग मानले जाते. त्यापूर्वीचा काळ प्राचीन काळ मानला जातो. या मध्ययुगात लढायांचे प्रमाण वाढले आणि त्याबरोबर शस्त्र आणि शस्त्रधारी यांचेही प्रमाण वाढले. युद्ध करणाऱ्या क्षत्रिय समाजाचे महत्त्व अधोरेखित झाले. पारंपरिक शस्त्रांबरोबर अद्ययावत शस्त्रास्त्राकडे लक्ष वेधले गेले. भारतात चौदाव्या शतकात तोफा आणि बंदुका- पिस्तुले आदी शस्त्रास्त्रांचे आगमन झाले. उत्तरोत्तर शस्त्रास्त्रांचे महत्त्व वाढत गेले आणि त्याबरोबर खंडेनवमीचे शस्त्रपूजन हा महत्त्वाचा विधी झाला. यथासांग, यथाविधी शस्त्रपूजन करण्याकडे कल आणि ओढावाढला. पंडित कमलाकर भट्टयांचा निर्णयसिंधू हा सोळाव्या शतकातील महत्त्वाचा ग्रंथ. या ग्रंथात धर्मशास्त्रीय निर्णयाचे विवेचन आहे. त्यात वेगवेगळ्या शस्त्रांचे पूजा, विधीचे मंत्र दिले आहेत. निर्णयसिंधू हा ग्रंथ सर्व हिंदू समाजात मान्यताप्राप्त असल्याने शस्त्रपूजन यथासांग, यथाविधी आणि शास्त्रोक्त पद्धतीने सुरू झाले.
(Khandenavami 2023)

महाराष्ट्रात चौदाव्या पंधराव्या शतकापासून राजधुरीण लढवय्या मराठा समाजाची घराणी उदयाला आली. तत्कालीन राज्यकर्त्यांकडे ही घराणी मनसबदारी मिळवू लागली. नवरात्रात अष्टमीला भवानीमातेचा जागर करावा, महानवमीला खंडेपूजन करावे आणि दस-याला प्रासंगिक पडावे, असा मराठा सरदार आणि शिलेदारांचा – विजयादशमीला सोने लुटून लढाईला बाहेर रिवाज झाला. लढाईला जायचे, तर हत्यारे सज्ज हवीत. त्यांची निगा आधीच राखायला हवी. ऐन लढाईच्या तोंडाला काही करणे शक्य व्हायचे नाही. त्यातून मग खंडेनवमीच्या शस्त्रपूजनाचे महत्त्व आणखी वाढले. शस्त्रपूजनाने यश हाती येईल, अशी श्रद्धाही दृढमूल झाली. मध्ययुगात या प्रथेला खूपच महत्त्व प्राप्त झाले.

क्षत्रिय परंपरेने आपल्या शस्त्रांचे पूजन करतात. तसे विविध व्यावसायिकही आपल्याला यंत्रांचे, हत्यारांचे पूजन करतात. कारखानदार मशिनरीचे पूजन करतात. व्यापारी वजन, तागडी पूजतात. दसऱ्यादिवशी शिलंगणाचे सोने शस्त्रास्त्रांना वाहतात. शिलंगणाचे सोने अर्पण केल्यानंतर शस्त्रपूजनाची सांगता होते.

खंडेनवमी मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा भाग आहे. आपल्या लढाऊ, शौर्यशाली परंपरेचे स्मरण करून देणारी ही खंडेनवमी मराठ्यांच्या मर्मबंधाची ठेव आहे. एकविसाव्या शतकात शस्त्र परजण्याचा मुद्दा अप्रस्तुत ठरला असला, तरी या निमित्ताने अभिमानास्पद पूर्वपरंपरेचे स्मरण होते, हेही महत्त्वाचेच म्हटले पाहिजे.

हेही वाचा :

Back to top button