Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ … | पुढारी

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ ...

स्वालिया शिकलगार- पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील ‘वेळणेश्वर’ला एकदा का होईना, एकदा तरी भेट द्यायलाच हवी! समुद्राकाठचा वेळणेश्वर निसर्गसृष्टीने वेढलेला आहे. दोन दिवस तर इथे राहून वेळणेश्वर पाहायलाचं हवं. चैतन्यदायी, प्रफुल्लित वातावरण इथं नक्कीच पाहायला मिळते. (Maharashtra Konkan Tour) अथांग सागर, नारळी पोफळीच्या घनदाट बागा, जागृत देवस्थाने आणि अलौकिक निसर्ग सौंदर्य यांचा मिलाप हे वेळणेश्वरचं वैशिष्ट्य सांगता येईल. भगवान परशुरामांचे शिष्य असलेल्या व्याड मुनी यांनी याठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. ”व्याडांचा ईश्वर म्हणजेच वेळणेश्वर.” याच वेळणेश्वरबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. सोबतच बामणघळ, गुहाघर, तवसाळ अशा अनेक पर्यटन स्थळांविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या की, याठिकाणी एकदा तरी नक्की फिरायला जा! (Maharashtra Konkan Tour)

हेदवी बीच

वेळणेश्वर

गर्दीचं ठिकाण नसलेलं नीरव शांतता असलेलं पर्यटनस्थळ म्हणून वेळणेश्वर गावचा उल्लेख करावाच लागेल. तीव्र उतार, अनेक वळणे घेत वेळणेश्वरच्या गावात जाता येते. वेळणेश्वर हे प्राचीन भूमी असल्याचं म्हटलं जातं.

हेदवी

वेळणेश्वरचा निसर्ग

फोटोग्राफीची आवड असणार्‍यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. माडाची बने, लाल माती आणि जांभा दगडांची कौलारू घरं लक्ष वेधून घेतात. भात शेती, माडाच्या बनातून गाडीतून लॉन्ग ड्राईव्ह करत वेळणेश्वरला जाता येते. कोकणी पद्धतीची घरे, येथील वातावरण आत्मिक समाधान देऊन जाते. पांढरी वाळू, लांबलचक समुद्रकिनारा, मासे पकडणारे मच्छीमार दृष्टीस पडतात. हिरव्यागार माडाच्या झाडावर चढून शहाळे काढणारे, दोन मिनिटात नारळ सोलणारी कोकणी माणसे पाहून आपल्याला कुतुहल वाटतेच. मोठ्या पावसातही तग धरून राहणारी जांभा दगडांची कौलारु घरे तर निराळीच आहेत!

नवलाई देवी

वेळणेश्वरचे मंदिर

वेळणेश्वरचे मंदिर अगदी शांत आणि परिसर हवेशीर आहे. वेळणेश्वरचे शिवमंदिर नजरेस पडते. त्यामागे लागूनच निळाशार समुद्रकिनारा पाहावयास मिळतो. निसर्ग परिसरातील या मंदिरात गेल्यानंतर मन प्रसन्न आणि शांत होतं. पोफळीच्या बागा आपसुकच तुमचं लक्ष वेधून घेतो. ‘नवसाला पावणारा वेळणेश्वर’ अशीही याची ख्याती आहे.

मंदिरासमोर १०-१२ फूट उंचीच्या दिपमाळा आहेत. घुमटाकार शिखर हे या मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. गाभाऱ्यात शिवपिंड असून त्यावर पाच फण्यांचा नाग आहे. या मंदिर परिसरात श्री गणपती, श्री लक्ष्मी नारायण, श्री काळ भैरव अशी मंदिरे आहेत.

वेळणेश्वर मंदिर

वेळणेश्वर बीच

वेळणेश्वरची खासियत म्हणजे समुद्र किनार्‍यालगत अनेक खडकांची रांग दिसते. आजूबाजूला डोंगर आणि त्यात समुद्राच्या लाटा धडकून उमटलेली शिंपल्यांची नक्षी अतिशय सुंदर दिसतात. समुद्राच्या एका किनार्‍याच्या डोंगरातून एक नदी येऊन ती समुद्राला मिळते. हा अप्रतिम नजारा कुणाला आवडणार नाही.

कसे जाल?

चिपळूणजवळ वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. गुहागरपासून २२ किलोमीटर तर चिपळूणपासून एका तासांचा रस्ता आहे.

वेळणेश्वर

कुठे राहाल?

वेळणेश्वरात राहण्यासाठी काही रिसॉर्ट्स आहेत. जाण्यापूर्वी तुम्ही बुकिंग करू शकता. येथे घरगुती निवास व्यवस्था, निवासाचीही सोय आहे.

हेदवी बीच

हेदवी – बामणघळ :

गुहागर तालुक्यातील हेदवी गावात हेदवी बीच आहे. चिपळूणपासून २५ किमी. अंतरावर हेदवी गाव आहे. समुद्राच्या खडकांमध्ये एक घळ आहे, त्यास बामणघळी म्हटले जाते. परिसरात उमा महेश्वर मंदिर आहे. कातळाला २५ फूट लांबीची चीर पडली असून यामध्ये समद्राच्या लाटा येऊन झडकतात. भरतीवेळी तर हे पाणी ३०-३५ फूट उंचावर उडते. निमुळत्या घळीचा हा अविष्कार तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. (Maharashtra Konkan Tour)

बामणघळ

कसे जाल?

गुहागरपासून २५ किमी. अंतरावर हे गाव आहे.

काय खाल?

उकडलेले मोदक, सुरमई, शहाळे, मच्छी, भात, वरण, आमटी, तांदळाची भाकरी, घावणे, पापड, सोलकढी, लोणचे, फणस भाजी, आंबे.

श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर – साध्या पद्धतीचे हे मंदिर तुमचं लक्ष वेधून घेणारे आहे. जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात डोंगर माथ्यावर हे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पेशवे काळात झालीय.

तवसाळ फेरी बोट

जयगडहून तवसाळला फेरी बोट घेऊन जाता येते.

श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे-

गुहागर समुद्रकिनारा, सन वेळणेश्वर पॉईंट, राम मंदिर, श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर, उमामहेश्वर देवस्थान हेदवी, नलवी धबधबा उमरठ, तवसाळ बीच इत्यादी.

गुहागर, वेळणेश्वर, हेदवीची ही तुमची ट्रीप तुम्हाला नक्कीच आठवणीत राहिल!

 

हेही वाचा : 

Back to top button