ग्रॅनाईटच्या शिळेपासून बनवलेली 14 टन वजनाची गणेशमूर्ती | पुढारी

ग्रॅनाईटच्या शिळेपासून बनवलेली 14 टन वजनाची गणेशमूर्ती

कोयंबतूर : दक्षिण भारतात श्रीगणेशाची अनेक अनोखी मंदिरे आहेत. तामिळनाडूत कोयंबतूरपासून 4 किलोमीटरवर पुलियाकुलम येथे श्री मुंथी विनायक गणपती मंदिर आहे. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे इथे ग्रॅनाईटच्या एकाच भव्य शिळेपासून तब्बल चौदा टन वजनाची गणेशमूर्ती बनवलेली आहे. ही मूर्ती घडवण्यासाठी कारागिरांना सहा वर्षे मेहनत घ्यावी लागली. अत्यंत सुबक व सुंदर अशी ही गणेशमूर्ती भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारीच आहे!

ही संपूर्ण आशियातील एकमेव अशी गणेशमूर्ती आहे. जी 14 हजार किलो म्हणजेच 14 टन वजनाची आहे. संपूर्ण मूर्ती एकाच मोठ्या ग्रॅनाईट शिळेची आहे हे विशेष! सुमारे 20 फूट उंच आणि 11 फूट रूंदीची ही मूर्ती आरोग्य प्रदान करणार्‍या गणेशाचे रूप दाखवणारी आहे. या गणेशाच्या सोंडेत अमृतकलश आहे. गणेशाच्या एका हातात तुटलेला दात आहे. एका हातात मोदक असून, वरील हातांमध्ये परशू आणि अंकुश आहे. या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी दूरवरून भाविक येत असतात.

या मंदिराचे काम 1982 मध्ये सुरू झाले होते. तामिळनाडूतीलच एका भागातून आणलेल्या काळ्या ग्रॅनाईटच्या शिळेला कोरून अनेक कारागिरांनी ही मूर्ती घडवली. कमळाच्या फुलावर बसलेला हा लंबोदर, तुंदिलतनु गणेश असून त्याच्या कंबरेवर वासुकी नाग आहे.

संबंधित बातम्या
Back to top button