गोव्यातच भाजपच! सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री सावंत आजच राज्यपालांची भेट घेणार | पुढारी

गोव्यातच भाजपच! सत्ता स्थापनेसाठी मुख्यमंत्री सावंत आजच राज्यपालांची भेट घेणार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमताच्या जवळ आहे. भाजपने १९ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा ३ जागांवर तर आम आदमी पक्षाचा २ जागांवर विजय निश्चित आहे. सध्याच्या कलानुसार गोवा फॉरवर्डला १ जागेवर आणि आरजेपीला १ जागेवर समाधान मानावे लागणार असल्याचे चित्र दिसत आहे. ३ जागांवर अपक्ष उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली आहे.

दरम्यान, भाजपने या निकालानंतर राज्यपाल पी. एस श्रीधरन पिल्लई यांची भेट मागितली आहे. सध्याचे चित्र पाहता भाजपला बहुमत मिळेल असे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार स्थापन होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यादृष्टीने पावले टाकण्यास भाजपने सुरुवात केली आहे. तसेच भाजपचे वाळपई मतदारसंघाचे विजयी उमेदवार विश्वजित राणे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत.

दरम्यान, भाजपच्या विजयाचे श्रेय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाते. गोव्यात भाजपच सरकार स्थापन करेल, अशी प्रतिक्रिया गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. अपक्ष व इतर लहान पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणार आहे. गोवेकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. गोवेकरांनी भाजपवर विश्वास दाखवला. त्याबद्दल आपण गोवेकराचा आभारी आहे. आजच राज्यपालांना भेटून सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.

Goa Election Result : गोवा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना विजयाने हुलकावणी दिली. येथे भाजपचे बाबूश मोन्सेरात ६५३१ मते घेत विजयी झाले आहेत. उत्पल यांना ५८५७ मते मिळाली असून, येथे चुरशीची लढत झाली. उत्पल पर्रीकर यांना मात्र अवघ्या ६७४ मतांनी पराजय स्वीकारावा लागला आहे.

सकाळी पोस्टल मतदानात उत्पल आघाडीवर होते. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीतही ते काही काळ आघाडीवर होते. शेवटच्या फेर्‍यांमध्ये बाबूश यांनी आघाडी घेतली. बाबूश यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला. उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, पणजीला लागून असलेल्या ताळगाव मतदारसंघात जेनिफर मोन्सेरात विजयी झाल्या आहेत.

गोवा विधानसभेत आपचं खातं उघडलं

गोवा विधानसभेत आम आदमी पक्षाला अखेर खाते उघडण्यास यश मिळाले आहे. पक्षाचे बाणावलीचे उमेदवार व्हिन्सी व्हिएगस यांनी ज्येष्ठ नेते चर्चिल आलेमाव यांचा पराभव केला आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा पराभब केल्याने व्हिन्सी व्हिएगस जायंट किलर ठरले आहेत. तर वेळळी मतदारसंघात पक्षाचे क्रूझ सिल्वा यांनीही माजी मंत्री फिलिप नेरी रॉड्रीग्ज यांचा पराभव केला आहे.

Back to top button