पणजी : पुढारी वृत्तसेवा
Goa Election Result : गोवा विधानसभा निवडणुकीत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पणजी मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांना विजयाने हुलकावणी दिली. येथे भाजपचे बाबूश मोन्सेरात ६५३१ मते घेत विजयी झाले आहेत. उत्पल यांना ५८५७ मते मिळाली असून, येथे चुरशीची लढत झाली. उत्पल पर्रीकर यांना मात्र अवघ्या ६७४ मतांनी पराजय स्वीकारावा लागला आहे.
सकाळी पोस्टल मतदानात उत्पल आघाडीवर होते. त्यानंतर ईव्हीएमच्या मतमोजणीतही ते काही काळ आघाडीवर होते. शेवटच्या फेर्यांमध्ये बाबूश यांनी आघाडी घेतली. बाबूश यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून जल्लोष व्यक्त केला. उत्पल पर्रीकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. दरम्यान, पणजीला लागून असलेल्या ताळगाव मतदारसंघात जेनिफर मोन्सेरात विजयी झाल्या आहेत.
सुरुवातील पोस्टल मतदानात उत्पल यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर ते पिछाडीवर पडले. "अपक्ष उमेदवार म्हणून मी दिलेली एक चांगली लढत होती, मी लोकांचे आभार मानतो. परंतु निकाल थोडासा निराशाजनक आहे,", अशी प्रतिक्रिया उत्पल पर्रीकर यांनी मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना व्यक्त केली आहे.
पणजी मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी उत्पल पर्रीकर इच्छूक होते. पण त्यांना तिकीट नाकारण्यात आले. यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
ताळगावमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुन्हा एकदा जेनिफर मोन्सेरात यांनी बाजी मारली आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार टोनी रोंड्रिग्ज आघाडीवर होते. त्यामुळे जेनिफर यांच्या विजयाबद्दल साशंकता निर्माण झाली होती. मात्र पहिल्या फेऱ्यांनंतर जेनिफर यांनी चांगली आघाडी घेतली. १ हजार ३३० मतांच्या फरकाने त्यांचा विजय निश्चित झाला आहे.