निद्रानाश दिवस विशेष : तुम्‍हाला झोप येत नाही? जाणून घ्‍या कारण आणि उपाय | पुढारी

निद्रानाश दिवस विशेष : तुम्‍हाला झोप येत नाही? जाणून घ्‍या कारण आणि उपाय

अमृत वेताळ

बेळगाव : माणसासाठी झोप किती महत्त्वाची आहे, हे झोप न आली तरच कळते. माणूस अन्नाशिवाय 21 दिवस राहू शकतो. मात्र, झोपेशिवाय तो सात दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. सलग सात दिवस माणूस झोपला नाही, तर मृत्यू ओढवतो, असे विज्ञान सांगते. म्हणूनच कैद्यांना तोंडावर थंड पाणी मारून जागे ठेवले जाते. गुन्हेगारांकडून सत्य वदवून घेण्याची एक पद्धत म्हणजे त्याला झोपूच न देणे. मात्र, झोपेची संधी असूनही झोप आली नाही, तर काय करावे? निद्रानाशाचा हा विकार उतारवयात जडतो. ते स्वाभाविक आहे. मात्र, आता तरुण वयातही लोक निद्रानाशाने त्रस्त आहेत. इलेक्ट्रॉनिक उपकरणे अर्थात मोबाईल आणि टी.व्ही. हे त्याचे मुख्य कारण. त्यामुळेच विशी आणि तिशीपासूनच युवक निद्रानाशाने त्रस्त आहेत.

हा मानसिक आजार असून, सहसा लवकर लक्षात येत नाही. त्याने गंभीर रूप धारण केल्याशिवाय हा आजार जाणवत नाही. निद्रानाश विविध कारणांमुळे होत असला, तरी त्यावर उपाय आहेत. वेळीच काळजी घेतली, तरी हा आजार दूर करता येऊ शकतो. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, अचानक नोकरी जाणे, घटस्फोट, यासह शारीरिक आजारपण आणि वेदना, भावनात्मक ताणतणाव, काही औषधांचे साईड इफेक्टस्, नैराश्य, दबलेली असुरक्षितता, भीती ही निद्रानाशाची कारणे आहेत.

शरीरातील व्हिटॅमिन बी, बी 1, बी 6, सी, डी, ईची कमतरता किंवा जास्त प्रमाण असणे, एनर्जी ड्रिंक्स, वजन घटविण्यासाठी सप्लिमेंटचे सेवन करणे, दीर्घकालीन आजारावर औषधांचे सतत सेवन ही निद्रानाशाची कारणे आहेत.

मोबाईलचा अतिवापर

मोबाईलमुळे अनेकांना निद्रानाशाचा विकार जडला आहे. मोबाईलमधून येणार ‘ब्ल्यू रे’ अर्थात नीलकिरणे मेंदूला सतत जागे ठेवतात. त्यामुळे झोपेसाठी आवश्यक असलेले मेलॅटोनिन हे संप्रेरक स्रवत नाही आणि स्राव झाला, तरी मोबाईलच्या आहारी गेलेला युवक झोपेकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर हे निद्रानाशाचे प्रमुख कारण आहे. मेलॅटोनिनचा स्राव होण्यासाठी अंधार अनिवार्य असतो. मोबाईलचा प्रकाश अडथळा ठरतो.

झोपेच्या दोन मुख्य अवस्था

‘रॅपिड आय मूव्हमेंट’ ऊर्फ ‘आरईएम स्लीप’ ही सुरुवातीची पायरी असून, यात पापण्यांची फडफड, स्वप्न पडणे अशा गोष्टी घडतात. दुसरी स्टेज ही ‘नॉन आरईएम स्लीप’ म्हणून ओळखली जाते. ज्यात आपण साधारणत: तीन पायर्‍यांमध्ये जास्तीत जास्त गाढ झोपेत जातो. ही खूप महत्त्वाची आणि खरी झोप म्हणता येईल. तिला ‘डीप स्लीप’ असेही म्हणतात. खूप वेळ झोपले, तरी झोप झाल्यासारखे वाटत नाही. फ्रेश वाटत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. त्यांच्या बाबतीत डीप स्लीपची पायरी खूप कमी वेळा येते आणि कमी काळ टिकते.

निद्रानाशावर उपाय

निद्रानाशाच्या मागे असणार्‍या शारीरिक आणि मानसिक कारणांचा शोध घेऊन योग्य ती उपाययोजना करणे शक्य आहे. औषधे तसेच तणाव नियंत्रणाचे तंत्र, स्व-संमोहन थेरपी, स्लीप रेस्टोरेशन थेरपी, री कंडिशनिंग थेरपी, बिहेविअरल थेरपी, असे विविध उपचार त्यावर उपयुक्त आहेत.

हे करून पाहा…

अस्वस्थ करणारे विचार येत असतील, तर त्यांची एक यादी बनवावी आणि स्वत:ला सांगावे की, याविषयी मी उद्या ‘वरी टाईम’मध्येच (काळजीचे विचार करण्याची विशिष्ट वेळ) विचार करेन. सोयीने तशी दिवसातली वेळ ठरवून घ्यावी. त्यावेळी काळजीच्या प्रश्नांवर विवेकपूर्वक उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा.

काही महत्त्वाच्या टिप्स…

  •  शक्यतो रात्री झोपण्याची आणि सकाळी उठण्याची वेळ ठरवून ती काटेकोरपणे पाळावी.
  •  संध्याकाळनंतर चहा, कॉफी ही पेये घेऊ नयेत.
  • रोज व्यायाम करावा. व्यायाम आणि रात्रीची झोप यातले अंतर तीन ते चार तासांचे असावे.
  •  रात्री उशिरा भरपूर जेवण घेऊ नये. रात्रीचे जेवण आणि झोपेची वेळ यात किमान दीड-दोन तासांचे अंतर असावे.
  •  झोपण्यापूर्वी ध्यानधारणा, संगीत ऐकणे, शक्य असल्यास आंघोळ करणे उपयुक्त ठरते.

Back to top button