Belgaum News : निपाणीजवळ तवंदी घाटात ऑक्सिजन गॅस सिलिंडरचा ट्रक पलटी; चालक ठार | पुढारी

Belgaum News : निपाणीजवळ तवंदी घाटात ऑक्सिजन गॅस सिलिंडरचा ट्रक पलटी; चालक ठार

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाट उतारावरील धोकादायक दुसऱ्या वळणावर हायड्रोजन बल्क सिलेंडर टाक्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला. या अपघातात चालक तिर्थ सिंग (वय ४१) मुळगाव पंजाब सध्या रा. विना चेंबर्स (मुंबई) हा जागीच ठार झाला. गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. दरम्यान, ट्रकमधील सिलेंडर टाक्या रस्त्याच्या दुतर्फा विखरून पडल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस, अग्निशमन रस्ते देखभाल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरून दुतर्फा होणारी वाहतूक तब्बल सहा तास रोखून धरली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून राहिल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

संबंधित बातम्या :

याबाबतची अधिक माहिती अशी की, ट्रकचालक तिर्थ सिंग हा गुजरात येथून कणगला येथील औद्योगिक वसाहतीतील ग्लास (काच निर्मिती) कारखान्यात आपल्या ट्रकमधून हायड्रोजन सिलिंडरच्या टाक्या घेऊन बुधवारी आला होता. तो सिलेंडर टाक्या खाली करून गुजरात येथे ट्रकमधून रिकाम्या टाक्या घेऊन परतत असताना त्याचा तवंदी घाटातील रस्ता उतारावर धोकादायक दुसऱ्या वळणावर वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक दुभाजकावर आदळून पलटी झाला. यावेळी अपघातग्रस्त ट्रकचे दोन तुकडे होऊन चक्काचूर झाला.

दरम्यान अपघाताची माहिती मिळताच रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाचे निरीक्षक अक्षय सारापुरे व संतराम माळगे यांनी सहकारी कर्मचाऱ्यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले. त्यानुसार घटनास्थळी सीपीआय बी.एस.तळवार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, ग्रामीणचे शिवराज नाईकवाडी बसवेश्वर चौकचे रमेश पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशामक दलाला पाचारण केले. त्यानुसार अग्निशामक दलाचे निरीक्षक ए.आय.रुद्रगौडर यांनी बंबासह धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. या अपघाताची भीषणता इतकी होती की अपघातग्रस्त ट्रकमध्येच तिर्थ सिंग वाहनातच अडकून पडला होता. दरम्यान, शर्तीच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुढील तपास सीपीआय तळवार यांनी चालवला आहे.

पंधरवड्यातील तिसरा अपघात

गेल्या पंधरा दिवसात आतापर्यंत निपाणी ते कणगला या २० कि.मी.टापूमध्ये गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचे तीन वेळा अपघात झाले आहेत. यामध्ये पोलीस व अग्निशामक दलासह रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या भरारी पथकाने वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने यापूर्वीच्या दोन घटनेत वित्तहानी वगळता कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र गुरुवारच्या घटनेत चालक तीर्थ सिंग याला आपला प्राण गमवावा लागला. सध्या महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे, असे असतानाही वाहनधारकांकडून वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवले जात नसल्याचे सातत्याने होणाऱ्या अशा अपघातांवरून दिसून येत असून ती चिंतेची बाब ठरत आहे.

प्रशासनाच्या तत्परतेमुळे…

सदर अपघातग्रस्त ट्रकमध्ये हायड्रोजन बल्कच्या रिकाम्या सिलेंडर टाक्या होत्या. मात्र असे असले तरी रिकाम्या सिलेंडर टाकीचा वरील हॉल कट झाल्यानंतर स्फोट होऊ शकतो, हे लक्षात घेऊन तातडीने निपाणी पोलीस, अग्निशमन दल व रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने वेळीच घटनास्थळी धाव घेऊन महामार्गावरील अपघातग्रस्त ट्रकसह रस्त्यावर पडलेल्या टाक्या बाजूला करेपर्यंत पहाटे ५ ते सकाळी ११ या वेळेत सहा तास वाहतूक रोखून धरल्याने मोठी दुर्घटना टळली. याबद्दल जिल्हा पोलीस प्रशासनाने निपाणी पोलिसांसह, अग्निशामन व रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक करून आभार मानले.

हेही वाचा : 

Back to top button