बेळगाव : ‘मिशन मार्कंडेय’सुरू, ‘पुढारी’च्या योगदानाचे कौतुक | पुढारी

बेळगाव : ‘मिशन मार्कंडेय’सुरू, ‘पुढारी’च्या योगदानाचे कौतुक

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  मार्कंडेय नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘मिशन मार्कंडेय 2.0’ मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेत दै. ‘पुढारी’चे योगदान महत्त्वाचे आहे. नदीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात काम होऊ शकते. पावसाळा तोंडावर असल्यामुळे शक्य तितके काम वेगाने काम पूर्ण करण्याकडे आपला कल आहे, अशी माहिती जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी दिली. मार्कंडेय नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण केले जावे. सर्वांनी एकत्रित येऊन हे कार्य पूर्णत्वास न्यावे, असे आवाहनही भोयर यांनी केले. कंग्राळी बुद्रूक येथून मार्कंडेय नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मिशन मार्कंडेय 2.0 मोहिमेला गुरुवारी भोयर यांच्या हस्ते चालना देण्यात आली.

मार्कंडेय नदीचे पात्र कसे आकसत चाललेय, यावर ‘पुढारी’ने 18 मे रोजी सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर यांनी मिशन मार्कंडेय 2.0 मोहीम आजपासून राबवण्यास सुरुवात केली. त्याआधी मंगळवारी (दि. 23) या विषयावर सविस्तर बैठक घेऊन अधिकारी आणि नदी परिसरातील ग्रामपंचायत विकास अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले होते.

भोयर म्हणाले, मार्कंडेय नदीचा विकास करण्याचे नियोजन आहे. रोजगार हमी योजनेतून हे काम करण्यासाठी खूप वाव आहे. पण, सध्या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. शिवाय ‘पुढारी’ने नमूद केल्याप्रमाणे नदीतील गाळ काढून तो काठावर न टाकता त्याची अन्यत्र विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. त्याद़ृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी मजुरांची कमतरता आहे. त्यामुळे इतर ठिकाणाचे मजूर वापरण्याचेही नियोजन आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.

काठावरची सारीच गावे

कंग्राळी बुद्रूक ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातून मिशन मार्कंडेय 2.0 ला सुरुवात झाली. मोहिमेत बिजगर्णी, बेळगुंदी, तुरमुरी, बेकिनकेरे, उचगाव, बेनकनहळ्ळी, सुळगा, हिंडलगा, हंदिगनूर, आंबेवाडी, अगसगा, केदनूर, बंबरगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रूक, कडोली, काकती आणि होनगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रोहयो मजुराला काम उपलब्ध करून दिले जावे. प्राधान्याने हे मिशन पूर्ण केले जावे, असे आवाहन भोयर यांनी केले.

रोहयो मजुरांना टी-शर्ट, टोप्या आणि प्रथमोपचार किट वितरित करण्यात आले. तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर, सहायक संचालक राजेंद्र मोरबद, रोहयोचे जिल्हा संचालक एन. बसवराज, जिल्हा आयईसी संयोजक प्रमोद गोडेकर, तांत्रिक संयोजक नागराज यरगुद्दी, कंग्राळी बुद्रूक पीडीओ जी. आय. बरगी आदी उपस्थित होते.

Back to top button