बेळगावसह कर्नाटक राज्यात पाच वर्षांनी हत्तीगणना | पुढारी

बेळगावसह कर्नाटक राज्यात पाच वर्षांनी हत्तीगणना

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  देशात सर्वाधिक हत्ती कर्नाटकात आढळून येतात. हत्तींची गणना तीन अथवा चार वर्षातून एकदा करण्यात येते. त्यानुसार राज्यातील हत्तीगणना नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. गत तीन वर्षात हत्तींनी केलेल्या हल्ल्यात ७४ जणांना जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे हत्तींचे वाढलेले संशयास्पद मृत्यूही वन्यप्राणीप्रेमींच्या चिंतेत भर टाकत आहेत. यापार्श्वभूमीवर झालेली हत्तीगणना महत्वपूर्ण मानण्यात येत आहे.

राज्यात २००७ मध्ये झालेल्या गणतीनुसार ४,०३५ हत्ती होते. २०१० मध्ये ही संख्या ६, ०७२ झाली. २०१७ च्या गणतीनुसार देशात २५ हजार हत्ती होते. त्यापैकी ६, ०४९ हत्ती कर्नाटकात होते. दक्षिण भारतात सर्वाधिक हत्ती असून याठिकाणी सुमारे १५ हजार हत्तींची नोंद होती. यंदा राज्यात दांडेली, धारवाड, बेळगावसह दांडेली, हल्याळ, बंडीपूर, बंगळूर ग्रामीण, बन्नेरघट्टा, भ्रद्रा, जीआरटी, कावेरी, चिक्कमगळूर, हासन, हुसनूर, कोळेगाल, मडीकेरी, मंड्या, म्हैसूर, नागरहोळे, रामनगर, विराजपेठ, तुमकूर, हावेरी, यल्लापूर, भद्रावती, कोप्पळ, कुदरेमुख, कुंदापूर, मंगळूर, शिमोग्गा, सागर याठिकाणी हत्तीगणना झाली.

हत्ती गणना तीन दिवस चालली. पहिल्या दिवशी सुमारे ५०० चौरस किमी वन्यप्रदेशांत फिरुन ब्लॉक काउंटनुसार गणती करण्यात आली. ५० टक्के वन्यप्रदेशात किमान १५ किमी फिरून आढळून आलेल्या हत्तींची गणना करण्यात आली. दुसऱ्या दिवशी वन्यप्रदेशात फिरुन गणतीबरोबरच हत्तींच्या विष्ठेची माहिती जमा करण्यात आली. तिसऱ्या दिवशी व्याघ्र संरक्षित क्षेत्रातील एकूण १३५ तलाव, ओढे, नाले याठिकाणी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या कालावधीत बसून पाणी पिण्यासाठी येणाऱ्या हत्तींची नोंद करण्यात आली. गणनेत ४०० हून अधिक अधिकारी सहभागी झाले होते.

एकूण ५०० चौ. किमी अंतर फिरुन गणती करण्यात आली.

२०१७ मध्ये झालेल्या गणतीनुसार बंडीपूर भद्रा अभयारण्यात हत्तींची संख्या अधिक होती. यावेळी केलेल्या अधिकाऱ्यांना विशेष नागरहोळेत गणतीसाठी नेमणूक प्रशिक्षण देण्यात आले होते. ८ विभागातील ९१ पथकांमध्ये सहाय्यक वन्य संरक्षणाधिकारी, विभागीय वनाधिकारी, उपविभागीय वनाधिकारी, वनरक्षक आणि पर्यवेक्षकांचा समावेश होता. याबाबतचा अहवाल दीड महिन्यात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Back to top button