निपाणीत आमदारकीचे काऊंटडाऊन सुरू, आज मतदान | पुढारी

निपाणीत आमदारकीचे काऊंटडाऊन सुरू, आज मतदान

निपाणी; राजेश शेडगे : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. आमदार कोण होणार, यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. चिकोडी विभागातील 7 मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस उमेदवारांमध्येच दुरंगी टक्कर दिसत आहे. निपाणी विधानसभा मतदारसंघात मात्र भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिरंगी लढत होत आहे. बुधवारी होणार्‍या मतदानातून कोण बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.

निपाणी, चिकोडी, कुडची, कागवाड, अथणी, रायबाग, हुक्केरी व यमकनमर्डी विधानसभा मतदार संघांनी बेळगाव जिल्ह्या अर्धा अधिक प्रदेश व्यापला आहे. काँग्रेस व भाजपमध्ये प्रभाव असलेले बहुतांश नेते चिकोडी विभागातीलच आहेत. यंदाच्या निवडणुकीतील जबरदस्त चुरस पाहता दोन्ही पक्षातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत निजदने प्रचारला जोर केलेला दिसून आला नाही. निपाणी सोडून उर्वरित मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजपचे उमेदवार एकमेकांना भिडले आहेत. त्यांनी प्रचारसभा, पदयात्रा, कोपरासभा, प्रचारफेरी घेऊन प्रचाराचे रान मोठ्या प्रमाणावर उठविले. त्यातून उमेदवारांनी काय कमावले आणि काय गमावले, याचा फैसला निकालानंतर शनिवारी निकालानंतर समोर येणार आहे. निपाणी मतदारसंघात भाजपच्या शशिकला जोल्लेे, काँग्रेेस उमेदवार काकासाहेेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उत्तम पाटील यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. चिकोडी मतदारसंघात काँग्रेसचेे गणेश हुक्केरी, भाजपचे रमेश कत्ती यांच्यामध्ये लढत होत आहे. कागवाड मतदार संघात भाजपचे श्रीमंत पाटील व काँग्रेसचे राजू कागे, अथणी मतदार संघात भाजपचे महेश कुमठळ्ळी विरुद्ध काँग्रेसचे लक्ष्मण सवदी, रायबाग येथे भाजपचे दुर्योधन ऐहोळे, काँग्रेसचे महावीर मोहिते, निजदचे प्रदीपकुमार माळगी व अपक्ष उमेदवार शंभू कल्लोळीकर यांच्यामध्ये लढत होत आहे. हुक्केरती भाजपचे निखिल कत्ती व काँग्रेसचे ए. बी. पाटील, कुडची मतदारसंघात भाजपचेे पी. राजीव, काँग्रेसचे महेंद्र तमन्नावर, निजदचे आनंद माळगी, यमकनमर्डी मतदारसंघात काँग्रेसचे सतीश जारकीहोळी, भाजपचे बसवराज हुंद्री, निजदचे मारुती अष्टगी व मारुती नाईक यांच्यामध्ये लढत होत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच स्टार प्रचारकांनी हायटेक प्रचारावर जोर दिला. त्यानिमित्ताने भाजप, काँग्रेस व निजदने आपल्या नेत्यांना आणून स्थानिक मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्र व राज्यातील नेते, मंत्री यांनी हजेरी लावत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर माहोल निर्माण केल्याने ही निवडणूक संस्मरणीय ठरली आहे . या निवडणुकीत महाराष्ट्रातील नेत्यांची क्रेझ प्रचारात दिसून आली. प्रचाराच्या रणधुमाळीमुळे मतदार संघातील राजकारण ढवळून निघाले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. आता कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारासाठी जास्तीतजास्त मतदान करून घेण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. ईर्ष्येमुळे मतदारसंघात चुरशीने मतदान होणार आहे.

मतदारांचा कौल कोणाला?

निपाणी मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निपाणी विधानसभा मतदार संघात उमेदवार निश्चिती अगोदर राजकीय वातावरण तापले होते. भाजप उमेदवार शशिकला जोल्ले, राष्ट्रवादीचे उमेदवार उत्तम पाटील यांनी हळदी-कुंकू व होम मिनिस्टरच्या माध्यमातून मतदारापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. विविध कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. काँग्रेसची उमेदवारी काकासाहेब पाटील यांना मिळाल्याने येथील लढत तिरंगी होत आहे. तीनही पक्षाच्या उमेदवारांनी नेटका प्रचार करून निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या बाजूने आपला कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button