इथे लोकशाही ओशाळतेय, मताची किंमत ठरतेय..! | पुढारी

इथे लोकशाही ओशाळतेय, मताची किंमत ठरतेय..!

बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा :  मताची विक्री करायची नसते तर मत हे दान करायचे असते. त्यासाठी मतदान असे निवडणूक आयोग किती जरी ओरडून सांगत असला तरी एका मताची किंमत उमेदवार ठरवताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मतदारदेखील याची रसभरीत चर्चा करताना दिसत आहेत. गतवेळच्या निवडणुकीपर्यंत एका मताला पाचशे-हजार रुपये घेऊन मतदान केले जाते, अशी चर्चा होती. परंतु, यंदा निवडणूक जाहीर होण्याआधी ही किंमत १००० ते २००० होईल, असे वाटत असतानाच आता एका मताची किंमत ५००० रुपये अशी चर्चा रंगू लागली आहे.

जर एका मताला इतकी रक्कम देण्यास उमेदवार तयार असतील तर दोन ते अडीच लाख मतदार असणाऱ्या प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये किती रक्कम वाटावी लागेल, हे गणितच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे. स्वीप समितीची जागृती पण…. तुमचे मत तुमचा हक्क, तुमचे मत पारदर्शीपणे कोणत्याही अमिषाला बळी न  पडता करा, अशी जागृती गेला महिनाभर जिल्हा प्रशासनाची स्वीप समिती करत आहे. एकीकडे मतदानासंबंधी जागृती सुरू असताना शहरासह ग्रामीण भागात मात्र एका मताची किंमत किती? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मतदानाची किंमत नेहमीप्रमाणे ५०० ते १००० असणार अशीच चर्चा होती. परंतु, निवडणूक जाहीर होताच याच मतदानाची किंमत २ हजार झाल्याची चर्चा सुरू झाली. परंतु, मतदानाचा दिवस जसजसा जवळ येतो आहे, त्यानुसार आता एका उमेदवाराकडून एका मतासाठी ५ हजार देण्याची ग्वाही दिली जात असल्याची चर्चा अनेक मतदार संघांमध्ये आहे. ही चर्चा विरते ना विरते तोच दुसऱ्या एका उमेदवाराने तो उमेदवार देईल त्याच्या दुप्पट देण्याची ग्वाही दिल्याची चर्चा आहे.

फक्त चर्चा प्रत्यक्षात वेगळेच

मताला पाच हजार रूपये देणार, दुसरा उमेदवार म्हणतो दहा हजार रूपये देणार. परंतु, सध्या तरी या पारावर आणि कट्ट्यावर रंगणाऱ्या चर्चा आहेत. यामध्ये तथ्य काहीही नसल्याचे सांगण्यात येत आहे. उमेदवार निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, हे जरी खरे असले तरी निवडणुकीवर १०० कोटी अथवा त्याहून अधिक अब्जावधी रू. खर्च करणार नाही, हेदेखील तितकेच खरे आहे. त्यामुळे मताची किंमत अमूक इतकी या सर्व अफवा असल्याचेही सांगितले जात आहे

Back to top button