कर्नाटकात बंडखोरीचे वारे; काँग्रेसचे नेते नाराज; भाजपमध्येही अनेक आमदारांना उमेदवारीस विरोध | पुढारी

कर्नाटकात बंडखोरीचे वारे; काँग्रेसचे नेते नाराज; भाजपमध्येही अनेक आमदारांना उमेदवारीस विरोध

बंगळूर : आर. एच. नटराज : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच बंडखोरीचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात सत्ताविरोधी लाट असून, काँग्रेस सत्तेत येण्याचे संकेत मतदानपूर्व चाचणीत मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसचे सरकार निश्चित आहे, असे समजणार्‍या अनेक दिग्गजांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. मात्र, अनेकांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने इच्छुक आता बंडखोरीची भाषा करू लागले आहेत. तर गेल्या महिनाभरात भाजपमधून बंडखोरी करून 16 नेते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांना बंडखोरी ग्रासत आहे.

तुमकूर शहरातून पुन्हा निवडणूक लढवू इच्छिणारे माजी आमदार रफीक अहमद यांनी तिकीट नाकारल्याबद्दल अधिकृत उमेदवाराविरोधात निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे. मोळकालमुरूमध्ये माजी आमदार रघू आचार्य यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे, तर कित्तूर येथे माजी मंत्री डी. बी. इनामदार यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

मंड्यात रविकुमार यांना तिकीट जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चिक्कमंगळूरच्या कडूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार वाय. एस. व्ही. दत्ता यांना तिकीट नाकारल्याने त्यांनीही बंडखोरी केली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत बंडाचा झेंडा फडकवण्यासाठी काँग्रेसचे नेते सज्ज झाल्यामुळे नेतृत्वाची चिंता वाढली आहे.

भाजपकडून 25 आमदारांचा पत्ता कट

उमेदवार निवडीसाठी सलग बैठका घेणार्‍या भाजप कोअर कमिटीने संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. ती यादी घेऊन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई दिल्लीत पोहोचले आहेत. पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत यादीवर चर्चा होणार असून, आठवड्याच्या शेवटी 120 ते 150 उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यादी तयार करताना भ्रष्टाचाराचे आरोप, स्थानिक जनमानसाचा रोष, वय आणि विजयाची क्षमता हे निकष लावण्यात आले आहेत. भाजप हायकमांडने सुमारे 25 विद्यमान आमदारांना तिकीट नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागलेल्या आमदारांना तिकीट गमवावे लागू शकते.

बागलकोट येथील भाजप आमदार सिद्धू सवदी यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी कार्यकर्ते निदर्शने करत आहेत. एकेकाळी त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी सामूहिक राजीनामे देण्याची भूमिका काही आमदारांनी घेतली होती. बागलकोटचे आमदार वीरेंद्र चरंतीमठ यांनी बंडखोरी केली आहे. आपल्या भावाला उमेदवारी न देता मलाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींसमोर ठेवली आहे. गुलबर्गा जिल्ह्यात अफजलपूर मतदारसंघात उमेदवारीवरून समस्या निर्माण झाली आहे. या मतदारसंघातील मालिकय्या गुत्तेदार हे उमेदवारी मिळणार असा विश्वास दाखवत आहेत. मात्र, तिथून त्यांचे सहकारी भाऊ नितेश गुत्तेदार यांनी आपणाला उमेदवारी मिळणार असा प्रचार केल्याने कुटुंबात कलह निर्माण झाला आहे.

विद्यमान आमदार एम. पी. कुमारस्वामी यांच्याविरोधात आंदोलन सुरूच आहे. विद्यमान आमदार जोतिगणेश आणि माजी आमदार सोगडू शिवण्णा यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. म्हैसूरच्या कृष्णराजनगरमध्येही आमदार के. रामदास यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी होत आहे. विशेषत: मतदारसंघात महत्त्वाचा असलेला ब्राह्मण समाज त्यांच्याविरोधात निघाला आहे. भाजपचे दिग्गज आणि आरएसएसची पार्श्वभूमी असलेल्या राजी यांना तिकीट देण्यासाठी या मतदारसंघातून दबाव निर्माण झाला आहे.

विराजपेटचे आमदार के.जी. बोपय्या यांना मतदारसंघात उमेदवारी देण्यास विरोध आहे. यलबुर्गी मतदारसंघात मंत्री आचार हलप्पा यांच्याऐवजी माजी आमदार दिवंगत एशान्ना गुळगन्नावर यांच्या मुलाला तिकीट द्यावे, अशी मागणी केली जात आहे. पुत्तूरमध्ये संजीव मतंदूर, सोरबमध्ये कुमार बंगारप्पा, हावेरीमध्ये नेहरू ओलेकार यांच्यासह अनेकांना तिकीट देण्यास पक्ष कार्यकर्त्यांनी उघडपणे विरोध केला आहे. त्याचबरोबर बंगळूरमध्ये विद्यमान आमदार रवी सुब्रमण्य, उदय गुरुडाचार, एम.कृष्णप्पा यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी कार्यकर्त्यांनी पक्षाकडे मागणी केली आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोपात भाजप आणि काँग्रेसचे आजी-माजी आमदार, इच्छुक उमेदवार रमले आहेत.

Back to top button