महाराष्ट्र बस फुल्ल, कर्नाटकच्या बस रिकाम्या | पुढारी

महाराष्ट्र बस फुल्ल, कर्नाटकच्या बस रिकाम्या

संबरगी; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी बस तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या बसकडे महिला प्रवाशांचा ओढा वाढला असून कर्नाटकाच्या बसना फटका बसत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कर्नाटकच्या बसला महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्रातील बसचे नियम लागू करावे, अशी मागणी होत आहे.

उत्पन्न कमी झाले तर कर्नाटकाच्या बसेस महाराष्ट्रात धावणे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. महाराष्ट्राप्रमाणेे कर्नाटक सरकारनेही प्रवासात सवलत देण्याची गरज आहे. अन्यथा प्रवासी घटल्याने कर्नाटक परिवहन महामंडळाला रोज लाखो रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. विशेष करून चिकोडी, विजापूर, बागलकोट, बेळगाव, बिदर, गुलबर्गा या विभागातील परिवहने उत्पन्न सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई या मार्गावर धावणार्‍या बसवर अवलंबून आहे. या विभागातील बसेस विशेष करून महाराष्ट्रात अधिक धावत असतात. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रात प्रवास करणार्‍या कोणत्याही राज्यातील महिलांना तिकीट 50 टक्के सवलत देण्यात आली आहे.त्यामुळे पुणे, मुंबईला जाणारे प्रवासी मिरजला येऊन महाराष्ट्र बसने जात आहेत. त्यामुळे पुणे, मुंबई, नाशिक मार्गावर धावणार्‍या कर्नाटकातील बसेस रिकाम्या धावत आहेत.

कोरोना काळात कर्नाटक-महाराष्ट्र बससेवा बंद होती. त्यावेळी उत्तर कर्नाटकातील व कल्याण कर्नाटकातील परिवहनला लाखो रुपयांचा फटका बसला होता. आता कर्नाटकाच्या शेकडो बसेस रोज महाराष्ट्रात धावत आहेत. मात्र, महाराष्ट्रातील बसमध्ये महिलांना तिकीट दरात निम्मी सवलत मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात प्रवास करणार्‍या कर्नाटकातील लाखो महिला याचा लाभ घेत आहेत.

महाराष्ट्र सरकारने तिकीट दरात वाढ केल्यानंतर त्याचा परिणाम कर्नाटकात होतो. महाराष्ट्रात जेवढा तिकीट दर वाढला आहे तेवढे तिकीट कर्नाटकातील बसेस घेतात. बेळगाव, विजापूर, चिकोडी जिल्ह्यातील लोकांचा संपर्क महाराष्ट्राशी अधिक आहे. या भागातील महिला प्रवासी कर्नाटकाच्या बसेसने महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत जाऊन तेथून महाराष्ट्र बसने प्रवास करत आहेत. याचा फटका कर्नाटकाच्या बसेसना बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारप्रमाणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.

Back to top button