बेळगाव : शरद पवारांनी घेतली निवडणुकीची माहिती | पुढारी

बेळगाव : शरद पवारांनी घेतली निवडणुकीची माहिती

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : आगामी विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांशी चर्चा केल्याचे समजते. पवार यांनी या निवडणुकीत पूर्ण लक्ष घालणार असल्याचे सांगितले असून समिती नेत्यांनीही प्रत्येक मतदारसंघात एकेकच उमेदवार देण्यात येईल, अशी ग्वाही दिली असल्याचे समजते.

बेळगाव दक्षिण, बेळगाव ग्रामीण, बेळगाव उत्तर आणि खानापूर या चार मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती तयारीने उतरणार आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील 9 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शरद पवार यांनी म. ए. समिती नेत्यांशी फोनवर संपर्क साधून सीमाभागातील हालचालींबाबत माहिती घेतली. या निवडणुकीत म. ए. समिती उमेदवारांनी विजय संपादित करावा, दोन-दोन उमेदवार जाहीर करण्यात येऊ नयेत, याबाबत सूचना केली असल्याचे समजते.

शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मोठे योगदान दिले आहे. कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात सहभागी होऊन पोलिसांचा लाठीहल्लाही झेलला आहे. सीमावाद निकालात निघावा, यासाठी वारंवार त्यांनी प्रयत्न केले आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकीकडेही त्यांची बारीक नजर आहे.

विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर भाजप उमेदवारी घोषित करणार आहे. यावेळी म. ए. समितीला पोषक वातावरण आहे. पण, आपापसातील मारामातील राष्ट्रीय पक्ष निवडून येऊ नयेत, यासाठी शरद पवार यांनी आपण या निवडणुकीत लक्ष घालणार असल्याचे सांगितले आहे. म. ए. समिती नेत्यांनीही प्रत्येक मतदारसंघात एकेकच उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी ग्वाही दिली आहे. म. ए. समिती उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठबळ देईल, असेही पवार यांनी सांगितले असल्याचे समजते.

उमेदवार निवडीकडे लक्ष

महाराष्ट्र एकीकरण समितीने लवकरात लवकर उमेदवार जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. प्रत्येक मतदारसंघात अनेकजण इच्छुक आहे. उमेदवार निवडीची प्रक्रिया आचारसंहिता जारी झाल्यानंतर जाहीर होईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे म. ए. समितीच्या उमेदवार निवडीकडे सार्‍यांचे लक्ष लागून आहे.

Back to top button