बेळगाव : विधानसभा निवडणूक तयारीला लागा : आयुक्त मनोजकुमार मिना | पुढारी

बेळगाव : विधानसभा निवडणूक तयारीला लागा : आयुक्त मनोजकुमार मिना

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा :  विधानसभा निवडणुकीचे आता वारे वाहू लागले असून, निवडणूक आयोगाने बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्व तहसीलदारांची बैठक घेऊन व्हिडीओ कॉन्फरन्सवर निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या सूचना केल्या. कर्नाटक निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त मनोजकुमार मिना यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधून हा आदेश दिला.

बैठकीला जिल्हधिकार नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील, निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी आदी उपस्थित होते. मनोजकुमार मिना म्हणाले, येत्या दोन महिन्यानंतर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. सर्व अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे.

तहसीलदरांनी आपापल्या क्षेत्रातील मतदार यादी अद्ययावत करुन घ्यावी. मतदान केंद्राची पाहणी करुन करुन त्याच्या सज्जतेसाठी उपाययोजना करण्यात यावी. काही दुरुस्तीची गरज असल्यास ती करुन घेण्यात यावी. अठरा वर्षे पूर्ण झालेले कोणताही युवक मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाला लवकरच प्रारंभ होणार आहे. सीमेलगतच्या नाके उभारणीसाठी आतापासून काम सुरु करण्यात यावे, आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. गेल्या वर्षीचा अनुभव पाहून त्यातील त्रुटी दूर करण्यात यावेत. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या तयारीची माहिती दिली. बैठकीला निवडणूक तहसीलदार प्रशांत पाटील, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी आदी उपस्थित होते.

Back to top button