बेळगाव : महापौर निवडणूक आज जाहीर होणार | पुढारी

बेळगाव : महापौर निवडणूक आज जाहीर होणार

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  गेल्या सतरा महिन्यांपासून रखडलेली महापौर, उपमहापौर निवडणूक शुक्रवारी (दि. १३) जाहीर होणार आहे. या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार असून निवडणूक ३१ जानेवारीपूर्वी घेण्यात येईल. त्यादृष्टीने वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी दै. ‘पुढारी’ला दिली आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. पण, महापौर, उपमहापौर निवडणूक रखडली होती. दोन्ही पदांच्या आरक्षणाचा वाद समोर आल्यामुळे आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक रखडली होती. पण, अधिकारांविना नगरसेवकांना काम करावे लागत होते. प्रभागातील समस्या ऐकून घेण्यास अधिकारी तयार नाहीत आणि लोकांच्या समस्या सोडवता येत नाही, अशी अवस्था नगरसेवकांची झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी वारंवार प्रादेशिक आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. अखेर नगरप्रशासन खात्याने ९ जानेवारी महापौर, उपमहापौर निवडणुकीवर स्पष्टता जाहीर केली आहे. त्यानुसार महापौरपद खुल्या वर्गातील महिलेसाठी आणि उपमहापौरपद ओबीसी ब वर्गातील महिलेसाठी राखीव आहे.

आरक्षणाचा वाद संपुष्टात आल्यामुळे बुधवारी (दि. ११) नगरसेवकांनी प्रादेशिक आयुक्त हिरेमठ यांची भेट घेतली होती. तर आमदार अनिल बेनके आणि आमदार अभय पाटील यांनीही आज प्रादेशिक आयुक्त हिरेमठ यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
हिरेमठ यांनी, महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. सर्व नगरसेवकांना नोटीस देणे आणि इतर कामांसाठी अवधी लागणार आहे. त्यासाठी आधी पंधरा दिवसांचा काळ राखीव असणार आहे, अशी माहिती हिरेमठ यांनी दिली.

Back to top button