निपाणी : कोगनोळीत दरोडा; ३५ तोळे सोने लुटून दाम्‍पत्‍याला मारहाण, परिसरात खळबळ | पुढारी

निपाणी : कोगनोळीत दरोडा; ३५ तोळे सोने लुटून दाम्‍पत्‍याला मारहाण, परिसरात खळबळ

निपाणी, कोगनोळी ; पुढारी वृत्‍तसेवा कोगनोळी येथे (शनिवार) मध्यरात्री सेवानिवृत्त शिक्षणाधिकाऱ्याच्या राहत्या बंगल्यात धाडसी चोरी करून दरोडेखोरांनी सुमारे 35 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम लुटली. शिवाय घरात राहत असलेल्या दाम्‍पत्यासह बाळंतीण मुलीलाही मारहाण करण्यात आल्‍याची घटना घडली.

विशेष म्हणजे दरोडेखोरांनी गावात आणखीन पाच ते सहा ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना काय मिळून न आल्याने त्‍यांनी पळ काढला. विशेष म्हणजे गावच्या मध्यवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, जुन्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर दत्तवाडी-हणबरवाडी रोडला लागून शिक्षण खात्यात सेवा बजावलेले सेवानिवृत्त चंद्रशेखर उर्फ बबन पाटील यांचा स्वतःचा बंगला आहे. शनिवारी मध्यरात्री चार ते पाच जणांनी त्यांच्या बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी घरात असलेल्या चंद्रशेखर पाटील यांच्यासह त्यांच्या पत्नी व बाळंतीण मुलीला शस्त्रासह हाताने मारहाण करून गंभीर जखमी केले. चंद्रशेखर पाटील हे शिक्षण खात्यात सेवेत होते. त्यांनी यापूर्वी निपाणी गटशिक्षणाधिकारी कार्यालयात क्लार्क म्हणून सेवा बजावली होती. ते नुकतेच रायबाग शिक्षणाधिकारी कार्यालयातून सुपरिडेंट म्हणून सेवानिवृत्त झाले होते. ते मूळचे कोगनोळी गावचे रहिवाशी असून त्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा बजावली आहे.

दरम्यान या घटनेनंतर काही वेळाने पाटील यांनी आरडाओरडा केल्याने ही घटना शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यानुसार शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना पाचारण केले. गंभीर जखमी दांम्‍पत्यासह बाळंतीण मुलीला उपचारासाठी कागल व कोल्हापूर येथे हलवण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने चिकोडीचे उपाधीक्षक (डीएसपी) बसवराज यलीगार, सीपीआय संगमेश शिवयोगी, ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार यांनी सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासह धाव घेऊन पाहणी केली.

दरम्यान घटनास्थळी श्वानपथकासह ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले. ही दोन्हीही पथके गावात दाखल झाली असून त्या आधारे घटनेचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे गावच्या मध्यवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावात दरोडा पडल्याची माहिती समजताच घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा : 

Back to top button