Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवने केला नवा विश्वविक्रम, ‘असं’ करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज | पुढारी

Suryakumar Yadav New Record: सूर्यकुमार यादवने केला नवा विश्वविक्रम, ‘असं’ करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav New Record : भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. ओपनिंग सोडून त्याच्या खालच्या क्रमांकाला येत तीन शतके झळकावणारा सूर्या हा जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

सूर्यकुमार यादवने राजकोटमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 45 चेंडूत शतक पूर्ण केले. तो भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सूर्यकुमारने 51 चेंडूत 112 धावा फटकावताना श्रीलंकेच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने आपल्या नाबाद खेळीत 9 षटकार आणि 7 चौकार लगावले. त्याचवेळी चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने शतक झळकावून इतिहास रचला. त्याच्याशिवाय मधल्या फळीतील इतर कोणत्याही फलंदाजाला तीन शतके झळकावता आलेली नाहीत. (Suryakumar Yadav New Record)

भारताचा मिस्टर 360 डिग्री बॅटर म्हणून ओळख असणार्‍या सूर्याच्या आधी जगात असे फक्त चार क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन किंवा त्याहून अधिक शतके झळकावली आहेत, परंतु हे सर्व खेळाडूं ओपनिंगला येत अशी कामगिरी करण्यात यशस्वी ठरले आहेत. पण सूर्याने दोनदा चौथ्या क्रमांकावर आणि एकदा तिसऱ्या क्रमांकावर वादळी फलंदाजी करून तीन आकडी धावसंख्या गाठली आहे. (Suryakumar Yadav New Record)

भारतासाठी सर्वाधिक शतके करणारा सूर्या हा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने केएल राहुलला मागे टाकले आहे. त्याच्या पुढे रोहित शर्मा आहे, ज्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार शतके झळकावली आहेत. सूर्या आता तीन शतकांसह दुसऱ्या तर केएल राहुल दोन शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांच्याशिवाय सुरेश रैना, दीपक हुडा आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी शतक झळकावले आहे.

इंग्लंड-न्यूझीलंडमध्येही शतक झळकावले

सूर्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक गेल्या वर्षी जुलैमध्ये नॉटिंगहॅमच्या मैदानावर ठोकले होते. त्यावेळी त्याने इंग्लंडविरुद्ध 117 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2022 मध्ये, सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे नाबाद 111 धावांची खेळी केली. म्हणजेच सूर्यकुमारने आधी इंग्लंडमध्ये, नंतर न्यूझीलंडमध्ये आणि आता आपल्या मायदेशात टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले आहे. सूर्या सध्या आयसीसी टी-20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे. श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावून सूर्याने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की त्याला नंबर-1 रँकिंग का मिळाले आहे.

Back to top button