राज्यातील 24 साखर कारखान्यांना नोटिसा; खुलासा न दिल्यास कारवाईचा साखर आयुक्तांचा इशारा | पुढारी

राज्यातील 24 साखर कारखान्यांना नोटिसा; खुलासा न दिल्यास कारवाईचा साखर आयुक्तांचा इशारा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील 24 सहकारी साखर कारखान्यांनी आर्थिक वर्ष 2021-22 मधील वैधानिक लेखापरीक्षण अहवाल (स्टॅट्युरी ऑडिट रिपोर्ट) दिलेल्या मुदतीत प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय आणि साखर आयुक्तालयास दाखलच केलेले नाहीत. सहकार कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणार्‍या या कारखान्यांनी सात दिवसांत खुलासा सादर न केल्यास संंबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाने दिला आहे.

साखर संचालक (प्रशासन) उत्तम इंदलकर यांनी याबाबत संबंधित कारखान्यांना नोटीस काढून कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलमांन्वये लेखापरीक्षण पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संंबंधित कारखान्याची आहे. साखर आयुक्तालयाने पत्राद्वारे कारखान्यांना सन 2021-22 अखेरील वैधानिक लेखापरीक्षण अहवाल दिलेल्या कालमर्यादेत सादर करण्याबाबत कळविले होते.

कोव्हिड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 29 सप्टेंबर 2022 नुसार सुधारणा करून त्यानुसार 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत लेखापरीक्षण पूर्ण करणे अनिवार्य केले होते व वार्षिक सर्वसाधारण सभा 31 डिसेंबर 2022 पर्यंत घेण्यास मुदतवाढ दिली होती. त्यानुसारचा वाढीव कालावधी संपुष्टात येऊनही कारखान्यांचे वैधानिक लेखापरीक्षण अहवाल मिळाले नसल्यानेच ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले.

लेखापरीक्षकांवरही कारवाईची टांगती तलवार
साखर कारखान्याच्या नेमणूक केलेल्या लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षण पूर्ण केले नसल्यास प्राधिकृत सनदी लेखपालांची फर्म, सनदी लेखापाल यांना सहकार विभागाच्या नामतालिकेवरून (पॅनेल) कमी करण्याची तरतूद आहे. त्यानुसार संबंधित कारखान्यांच्या लेखापरीक्षकांनाही नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यामुळे लेखापरीक्षकांवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर कारखान्यांनी दिलेल्या मुदतीत लेखापरीक्षण पूर्ण न केल्यास कारखान्याची जबाबदार समिती संचालकांना अपात्र ठरविण्याची तरतूद असून, कार्यकारी संचालक, अधिकार्‍यास पाच हजार रुपये दंडाचीदेखील तरतूद आहे. संस्था लेखापरीक्षणासाठी जाणीवपूर्वक रेकॉर्ड पुरवित नसल्यास ही बाब अपराध ठरून त्याबद्दल जबाबदार संचालक, अधिकार्‍यांना शिक्षेची तरतूद आहे.

असे आहेत जिल्हानिहाय कारखाने..
नोटीस काढण्यात आलेल्या जिल्हानिहाय सहकारी साखर कारखान्यांची संख्या पुढीलप्रमाणे. बीड 6, सोलापूर 2, जळगाव 1, औरंगाबाद 4, कोल्हापूर 2, सांगली 6, उस्मानाबाद 1, सातारा 2 मिळून एकूण 24 कारखान्यांचा समावेश आहे.

Back to top button