बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना अटक; सीमाभागातून तीव्र संताप | पुढारी

बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना अटक; सीमाभागातून तीव्र संताप

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील नेत्यांना सीमाभागात येण्यापासून रोखून घटनात्मक अधिकारांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांकरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देण्यासाठी गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना पोलिसांनी मंगळवारी अचानक अटक केली. या कृतीविरोधात सीमाभागातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

महाराष्ट्र सरकारने नियुक्त केलेले सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि उच्चाधिकार समिती अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांचा मंगळवारी बेळगाव दौरा नियोजित होता. मात्र हा दौरा रद्द करण्यात आला. महाराष्ट्रातील नेत्यांनी बेळगावात येऊ नये, यासाठी कन्नड संघटनांनीही आंदोलने केली होती. कर्नाटक सरकारनेही दौर्‍याला विरोधाचे पत्र महाराष्ट्राला पाठवले होते. अखेर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना जिल्हाबंदी केल्याचा आदेश सोमवारी सायंकाळी बजावला होता.

जिल्हाबंदीमुळे महाराष्ट्रातील नेत्यांच्या घटनात्मक अधिकारांची पायमल्ली झाली आहे. त्यामुळे या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी याची दखल घेऊन सीमावाद तत्काळ सोडवावा, अशी मागणी करणारे पत्र जिल्हाधिकारी पाटील यांच्याकरवी पाठवण्यासाठी म. ए. समिती नेते मंगळवारी दुपारी 3.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जमले होते. त्याआधी समिती नेत्यांनी सोमवारीच या निवेदनाबाबत प्रसारमाध्यमांतून आवाहन केले होते. त्यामुळे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले जाणार आहे, ही माहिती कर्नाटकी प्रशासनालाही होती. तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांना जिल्हाधिकार्‍यांना भेटू देण्यात आले नाही.

144 आले कुठून?

प्रशासनाने बेळगावात 144 कलम लागू केले आहे. त्याचे तुम्ही उल्लंघन केले असून तुमच्यावर कारवाई करण्यात येणार आहे, असे एसीपी नारायण बरमणी यांनी जिल्हाधिकारी आवारात समिती नेत्यांना सांगितले. त्यावर बरीच वादावादी झाली.

तुम्ही महाराष्ट्रातील नेत्यांना बंदी घातली आहे. आमच्यावर कारवाई करू शकत नाही, असे समिती नेत्यांचे म्हणणे होते. पण ते ऐकून न घेता पोलिसांनी पोलिसांनी बळजबरी समिती नेत्यांना वाहनात घालून अटक केली. मध्यवर्ती म. ए. समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मालोजी अष्टेकर, सरस्वती पाटील, अ‍ॅड. राजाभाऊ पाटील, कृष्णा हुंदरे, आर. एम. चौगुले, आर. आय. पाटील, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, भागोजी पाटील, अ‍ॅड. सुधीर चव्हाण, चंद्रकांत कोंडुसकर, अ‍ॅड. एम. जी. पाटील, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, रणजीत चव्हाण-पाटील, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, मनोज पावशे, प्रवीण रेडेकर, मोतेश बार्देसकर, अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, भागोजी पाटील, रावजी पाटील, आदींना अटक करण्यात आली. या सर्वांना अटक करून वीरभद्रनगर येथील वीरभद्र मंदिरात नेण्यात आले.

तथापि,जिल्हा प्रशासनाने 144 कलम (जमावबंदी आदेश) कधी लागू केला, त्याबाबतची घोषणा कधी केली, हे कुणालाच कळलेले नाही. हे कलम लागू करताना जनतेला प्रसारमाध्यमांमधून पूर्वकल्पना दिली जाते. अचानक लागू करावे लागले तरी पोलिस वाहने रस्त्यांवर फिरून ध्वनिक्षेपकांद्वारे जमावबंदीची घोषणा करतात. मात्र बेळगाव प्रशासनाने यापैकी काहीच केले नाही. त्यामुळे 144 कलमाचा बनाव करून दडपशाही सुरू केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button