सीमावाद : अखेर महाराष्ट्र- कर्नाटक आंतरराज्य बससेवा सुरू | पुढारी

सीमावाद : अखेर महाराष्ट्र- कर्नाटक आंतरराज्य बससेवा सुरू

निपाणी: पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोटवर कर्नाटकाचा दावा सांगितल्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले होते. यात अनेक ठिकाणी शिवसेनेच्या आंदोलनामुळे वातावरण चांगलेच तापले. त्यातून कर्नाटक बसेसवर जय महाराष्ट्र असे लिहून काळे फासल्याने वातावरण तंग बनले आहे. निपाणी- कर्नाटकातून होणारी आंतरराज्य बससेवा महाराष्ट्रात पुणे मुंबई येथे सुरू आहे. परंतु ही वाहतूक कोल्हापूर बाहेरून सुरू असल्याची माहिती निपाणी आगार व्यवस्थापक एस. बी. संगप्पा यांनी दिली.

दरम्यान, शुक्रवारी बंद असलेल्या कागल, राधानगरी, गारगोटी व गडहिंग्लज आगाराचीही आंतरराज्य बससेवा शनिवारी (दि.२६) दुपारी 12 नंतर पूर्ववत सुरू झाली. शुक्रवारी दिवसभर निपाणी बसस्थानकावर महाराष्ट्र बसचे दर्शन झाले नाही. त्यामुळे महाराष्ट्र आगाराची बससेवा बंद होती. दरम्यान, खबरदारी म्हणून बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

शुक्रवारी कोल्हापूर येथे कर्नाटकच्या बसेस अडवून ठेवल्या होत्या. तसेच महाराष्ट्र बसेसही कर्नाटकात येण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे दोन्ही राज्यातील बससेवा दुपारनंतर विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांसह मजूर, कामगार, विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. बेळगाव, धारवाड, हुबळी, हावेरी, राणेबेणणूर, रायचूर या आगारांच्या निपाणी, पुणे, मुंबई, सातारा, औरंगाबाद, नाशिक येथे जाणाऱ्या बसेस कोल्हापूर मार्गावरून बाहेरून सुरु ठेवल्या होत्या. तर अनेक चालक व वाहकांनी धोका पत्करण्यापेक्षा आपल्या बसेस निपाणी बस स्थानकातच थांबून ठेवल्या होत्या.

यात बेळगाव आगारातील काही चालकांनी कोल्हापूरला जाणाऱ्या बसेस निपाणीतून मागे हाकल्या. यात संकेश्वर व निपाणी पोलीस प्रशासनाने वातावरण पाहून महाराष्ट्र बसेस कर्नाटकात आणू नका, अशा सूचना महाराष्ट्रातील आगार व्यवस्थापकांना दिल्याने महाराष्ट्र बसेसची वाहतूक दिवसभर बंद ठेवली होती. त्यामुळे निपाणी आगारात महाराष्ट्र बसेस लावलेल्या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यात बससेवा बंद झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला.

बससेवा सुरळीत

शुक्रवारी निपाणी, संकेश्वर पोलीस प्रशासनाने गडहिंग्लज, कागल, गारगोटी, राधानगरी आगार व्यवस्थापकांना आंतरराज्य बस सेवा बंद ठेवा, अशा सूचना केल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी बंद असलेली आंतरराज्य बससेवा शनिवारी दुपारी बारापासून पूर्ववत सुरू ठेवण्यात आली आहे, अशी माहिती गडहिंग्लज आगार व्यवस्थापक राजेश मातले यांनी ‘दै. पुढारी’शी बोलताना दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button